कित्येकदा खूप सुखं
आपल्या वाट्याला येऊ लागल्याचं जाणवतं, परंतु ती आपल्या पदरात पडेपर्यंत अनेक अडचणी
येतात आणि मग ज्यांची चाहूल लागलेली असते, अशी कित्येक सुखं आपल्यापर्यंत पोचतच
नाहीत. या वास्तवाचं भान असलं, की
माणसाला अपेक्षाभंगाचं दुःख भोगावं लागत नाही. झाडाला येणाऱ्या मोहराचं उदाहरण देऊन
तुकारामांनी हे अतिशय अर्थपूर्ण रीतीनं समजावलं आहे. ते म्हणतात,
५२
महुरा ऐसी फळे नाही ! आली काही गळती !!१!!
पक्वदशे येती थोडी ! नास आढी वेचे तों !!२!!
विरळा पावे विरळा पावे ! अवघड गोवे सेवटाचे !!३!!
उंच निंच परिवार देवी ! धन्या ठावी चाकरी !!४!!
झळके तेथे पावे आणी ! ऐसे क्षणीं बहु थोडे !!५!!
पावेल तो पैल थडी ! म्हणो गडी आपुला !!६!!
तुका म्हणे उभाऱ्याने ! कोण खरे मानितसे ? !!७!!
(अभंग क्र. १२९०)
माणसाच्या मनामधे स्वप्नं
निर्माण करण्याची अपार क्षमता असली, तरी त्यानं निर्माण केलेल्या असंख्य, अनंत स्वप्नांपैकी मोजकी स्वप्नंच
वास्तवात साकार होत असतात, हा
एक कठोर, निर्दय अनुभव
तुकारामांनी या अभंगात मांडला आहे.
झाडावर मोहर जितका येतो,
तितकी फळं येत नाहीत. मोहराच्या बाबतीत
अनेकदा मनामधे असा विचार येऊन जातो, की निसर्ग हा फार उधळपट्टी करणारा आहे. झाडाची फांदी न् फांदी, डहाळी न डहाळी जेव्हा मोहरून येते,
तेव्हा असं वाटतं, की त्यानं ओंजळी भरभरून फळांचे बीजभूत अणुरेणू त्या झाडावर विनाकारण उधळले आहेत. इतक्या मोहराची गरज नव्हती, असंही वाटतं. पण बारकाईनं पाहिलं, की त्याच्या या उधळपट्टीचं रहस्य समजतं. मोहरल्यापासून फलधारणेपर्यंतच्या प्रवासात जे अनंत आघात होतात, त्याचा अनुभव असल्यामुळंच तो ही स्वैर उधळण करीत असतो. अशी प्रचंड उधळण केल्यावर त्या अनंत मोहरकणांपैकी मोजके का होईना सर्व आघातांमधून, सर्व अपघातांमधून वाचून फळांमधे रूपांतरित होतील, हे ओळखून त्यानं असं केलेलं असतं. वादळवारं, गारांचा वर्षाव, कीड इ. प्रकारची अनेक संकटं वाटेत येतात. त्यांना झुकांडी देऊन, त्यांची नजर चुकवून, त्यांचे वार झेलून, त्यांचं प्रतिकार करून काही मोहरकण त्यांच्या तडाख्यातून निसटतात आणि त्यांची फळं बनतात. बाकीचे असंख्य कण गळून जातात, आघातांपुढं शरणागती पत्करतात, प्रवासाच्या प्रारंभीच आपली जीवनयात्रा संपवितात. यानंतरचा प्रवासही सुखरूप नसतो. मोहराची जी फळं बनलेली असतात, त्यापैकी काही फळं लहान असतानाच गळतात. त्यालाही अशाच प्रकारची काही संकटं कारणीभूत होतात. त्यातून जी वाचतात, त्यापैकी थोडीच पक्वदशेला येतात, पाद लागेपर्यंत टिकतात. पाडाला आल्यानंतर शेतकरी फळं झाडावरून उतरवून घेतो आणि चांगली पिकविण्यासाठी त्यांची आढी लावतो. ती फळं पिकत घालतो. पण जितकी फळं आढीला लावली जातात, तितकी सगळी उत्तम रीतीनं पिकून तयार होत नाहीत. काही नासतात. काही इतर कारणांनी खराब होतात. झाडावरून काढताना जमिनीवर आपटलेली वा फुटलेली फळं नीट पिकत नाहीत. उष्णता वगैरेंचं प्रमाण योग्य साधलं नाही, तर काही फळं नासतात. आणि एवढं सगळं घडून गेल्यावर बाकीची फळं आस्वाद घेण्याला योग्य म्हणून तयार होतात. शेतकरी त्यांतील काहींचा आपल्या कुटुंबियांसह आस्वाद घेतो. काही शेजाऱ्यापाजाऱ्यांना व आप्तेष्टांना देतो. काही बाजारात विकतो.
मोहरापासून सुरु झालेला प्रवास आस्वाद्य अवस्थेच्या अंतिम टप्प्यापर्यंत पूर्ण करणारी फळं थोडीच असतात. प्रचंड प्रमाणात निर्माण झालेला मोहर बघून शेतकऱ्याच्या मनात जी अनंत स्वप्नं निर्माण झालेली असतात, त्यांपैकी कित्येकांचा चुराडा झाल्याचं त्याला पहावं लागतं. शेतकऱ्याच्या जीवनात येणाऱ्या स्वप्नभंगाच्या या वेदना कमालीच्या क्लेशकारक असतात. इतर क्षेत्रांतील कोणा व्यक्तींच्या वाट्याला अशा वेदना क्वचितच येत असतील. उत्तम मशागत करावी, तर पेरणीसाठी पाऊस वेळेवर पडत नाही. पाऊस वेळेवर पडून पेरणी उत्तम झाली, तर नंतर पाऊस ओढ देतो आणि आलेले अंकुर कोमेजून जातात. पुढं तण वगैरे काढून पीक जोमात आल्यामुळं मन हरखून जावं, तोवर टोळधाड वा किडीचा प्रादुर्भाव होतो. त्यातून वाचून कणसं छानपैकी फुलोऱ्यावर आली, तर धोधो पाऊस पडून फुलोरा झडतो आणि पिशा उरतात. प्रत्येक पिकाच्या बाबतीत केव्हा ना केव्हा असंच काही तरी घडतं. किती वेळा स्वप्नं हिरवळतात आणि पुन्हा कोमेजतात. आपण जेवढी स्वप्नं पाहतो, तेवढी कधीही सफल होत नसतात; म्हणून स्वप्नं पहायचं बंदही करायचं नाही आणि स्वप्नभंग झाला म्हणून खचायचंही नाही, हे चित्त स्थिर ठेवण्याचं तत्त्वज्ञान समाजाच्या सर्व घटकांना शेतकऱ्याकडून शिकता येतं. तुकारामांनी ते या अभंगात अतिशय प्रभावी रीतीनं मांडलं आहे.
मोहरापासून अखेरच्या उत्तम अवस्थेपर्यंत जशी थोडीच फळं पोचतात, तसंच मानवी जीवनात हाती घेतलेलं काम मधे येणाऱ्या सर्व संकटांवर मात करून तडीला नेणारे लोकही विरळेच असतात. अनेक जण वाटेत अडखळतात, मरगळतात, थकतात आणि हार मान्य करून प्रवास थांबवतात. शेवटचं 'गोवे' म्हणजे ठिकाण वा मुक्काम गाठणारे बहाद्दर फार थोडे असतात. त्या मुक्कामापर्यंत पोचणं हे फार अवघड असतं. देवाजवळ उच्च, नीच अशा सर्व लोकांचा परिवार असतो. पण सगळे जण सारखी भक्ती करणारे नसतात. खरी भक्ती करणारे, भक्तीचा अत्युच्च टप्पा गाठणारे मोजकेच असतात. एखाद्या धन्याकडं अनेक जण चाकरी करीत असतात. पण त्यांतील प्रामाणिक कोण आणि अप्रामाणिक कोण, हे त्या धन्याला कळत असतं. जो आपल्या कर्तृत्वानं, निष्ठेनं, प्रामाणिकपणानं झळकतो, त्याच्याजवळच मालक जातो, त्याला जवळ करतो. परंतु असे लोक फार थोडे असतात.
कोणत्याही क्षेत्रात वाटचाल करताना येणाऱ्या सर्व अडथळ्यांना ओलांडून पैल थडीला पोचणारा एखादाच असतो. तो खरा आपला गडी होय. तो खरा कर्तृत्ववान, पराक्रमी, शूर होय. पिकून तयार होणारं फळ हे जसं खरं फळ, तसा हा खरा माणूस होय. असं कर्तृत्व नसताना नुसती बाह्य उभारी दाखविणारे, उसनं अवसान आणणारे, फुशारकी मारणारे लोक हे कसोटीवर टिकत नाहीत. त्यांना कोणी खरा मान देत नाही.
(संग्राहक: संजय दत्तात्रय सोमवंशी-पाटील)
९४२२३४५३६८