Monday, 6 February 2017

संत तुकारामांचे अभंगशतक (अनुभव ४२)

जो मनुष्य स्वानुभवाच्या आधारे डोळस बनतो, चोखंदळ बनतो, त्याच्यापुढं कुणाची ढोंगबाजी चालत नाही, हे स्पष्ट करण्यासाठी त्यांनी एका अभंगात अनेक उदाहरणं दिली आहेत. ते म्हणतात,

४२

तांबियाचे नाणे न चले खऱ्या मोलें ! जरी हिंडविले देशोदेशीं !!१!!
करणीचे काही न मने सज्जना ! यावे लागे मना वृद्धांचिया !!२!!
हिरियासारिखा दिसे शिरगोळा ! पारखी ते डोळां न पाहाती !!३!!
देऊनिया भिंग कामाविले मोती ! पारखिया हातीं घेता नये !!४!!
तुका म्हणे काय नटोनिया व्यर्थ ? ! आपुले हे चित्त आपणा ग्वाही !!५!!
                              (अभंग क्र. ४१०१)

तांब्याचं नाणं वेगवेगळ्या देशांत नेऊन चालविण्याचा प्रयत्न केला, तरी ते खऱ्या (सोन्याचा) नाण्याच्या मोलानं चालत नाही. चुकीचं वागणं सज्जनाच्या मनाला आवडत नाही. आपलं वागणं अनुभवी माणसांच्या मनाला पटायला हवं. गारगोटी हिऱ्यासारखी दिसते, परंतु हिऱ्याची पारख असलेले लोक तिच्याकडं नजरही टाकत नाहीत. काच देऊन मोती घेण्याचा प्रयत्न केला, तर पारख असलेले लोक ती काच हातातही घेत नाहीत. तुकाराम म्हणतात, उगाच नटून काय उपयोग ? आपण कसे आहोत, याला आपलं मन साक्षी असतं.

(संग्राहक:  संजय दत्तात्रय सोमवंशी-पाटील)
९४२२३४५३६८
 

No comments:

Post a Comment