Thursday, 2 February 2017

संत तुकारामांचे अभंगशतक (अनुभव ४०)

ऐकीव माहिती, काल्पनिक कथा यांसारख्या गोष्टींपेक्षा अस्सल अनुभवाला महत्त्व देणं, हे तुकारामांच्या विचारसरणीचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य होतं. एका अभंगात ते म्हणतात,

४०

नका दंतकथा येथे सांगो कोणी ! कोरडे ते मानी बोल कोण ? !!१!!
अनुभव येथे व्हावा शिष्टाचार ! न चलती चार आम्हांपुढे !!२!!
निवडी वेगळे क्षीर आणि पाणी ! राजहंस दोन्ही वेगळाली !!३!!
तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे ! येरा गाबाळाचे काम नाही !!४!!
                     (अभंग क्र. ३१२८)

इथं कुणी दंतकथा सांगू नका. अनुभवाचा आधार नसलेल्या दंतकथांमधील कोरडे बोल कोण मान्य करणार ? या जगात अनुभव हाच शिष्टाचार व्हायला हवा. अनुभवाचं पाठबळ नसलेले चाळे आमच्यापुढं चालणार नाहीत. अस्सल अनुभव कोणता आणि निराधार दंतकथा कोणती, हे विवेकी माणसाला नक्कीच ओळखता येतं.  दूध आणि पाणी एकत्र मिसळून आलं, तरी राजहंस त्यांना वेगळं करून योग्य ती निवड करतो, तसंच विवेकी माणसाचं असतं. अस्सल अनुभव जगणाऱ्या विवेकी, जातिवंत माणसांकडूनच खऱ्या-खोट्याचा योग्य निवाडा केला जातो. ज्यांच्याकडं विवेक नसतो, अशा भ्रमांवर जगणाऱ्या गबाळ्या लोकांना असा निवाडा करता येत नाही, हे त्यांचं काम नव्हे.


(संग्राहक:  संजय दत्तात्रय सोमवंशी-पाटील)
९४२२३४५३६८
 

No comments:

Post a Comment