लोकांची फसवणूक करणाऱ्या चमत्कारासारख्या नाना प्रकारच्या चुकीच्या आणि घातक समजुती, प्रथा इत्यादींना तुकारामांचा कमालीचा विरोध होता. आपली ही भूमिका त्यांनी एका अभंगात अनेक उदाहरणांनी स्पष्ट केली आहे. आपल्या गोरगरीब लोकांनी अशा प्रथांसाठी आपलं धन, आपला वेळ, आपले श्रम वाया घालवू नयेत, हा तुकारामांच्या मिळणारा संदेश आपल्याला सदैव मार्गदर्शन करणारा आहे. ते म्हणतात,
४३
कपट काही एक ! नेणे भुलवायाचे लोक !!१!!
तुमचे करितो कीर्तन ! गातो उत्तम ते गुण !!२!!
दाऊ नेणे जडीबुटी ! चमत्कार उठाउठी !!३!!
नाही शिष्यशाखा ! सांगो अयाचित लोकां !!४!!
नव्हे मठपति ! नाही चाहुरांची वृत्ती !!५!!
नाही देवार्चन ! असे मांडिले दुकान !!६!!
नाही वेताळ प्रसन्न ! काही सांगो खाण खुण !!७!!
नव्हे पुराणिक ! करणे सांगणे आणीक !!८!!
नेणे वाद घटा पटा ! करिता पंडित करंटा !!९!!
नाही जाळीत भणदी ! उदो म्हणोनि आनंदी !!१०!!
नाही हालवीत माळा ! भोवते मेळवुनि गबाळा !!११!!
आगमीचे कुडे नेणे ! स्तंभन मोहन उच्चाटणे !!१२!!
नव्हे यांच्या ऐसा ! तुका निरयवासी पिसा !!१३!!
(अभंग क्र. २७२)
मी लोकांना भुलवण्याचं कोणतंही कपट जाणत नाही. मी तुमचं कीर्तन करतो आणि उत्तम गुण गातो. मी जडीबुटी दाखवणं जाणत नाही. मी आकस्मिक म्हणजेच निसर्गातील कारणकार्यसंबंधाच्या विरोधात जाणारे चमत्कार दाखवणं जाणत नाही. माझी शिष्यशाखा नाही. मी बोलावलेले नसताना कोणी लोक आले, तर त्यांना काही सांगतो, इतकंच. मी मठपती नाही. मी उदरनिर्वाहासाठी कुणाकडं चाहूरभर जमीन मागत नाही. मी देवपूजा करण्याचं दुकान मांडलेलं नाही. लोकांना काही खाणाखुणा सांगण्यासाठी मला वेताळ प्रसन्न नाही. मी करायचं वेगळं आणि सांगायचं वेगळं असं करणारा पुराणिक नाही. करंट्या पंडितासारखा घटा-पटाचा वाद करणं मी जाणत नाही. मी 'उदो' म्हणून आनंदानं धूप जाळत नाही. मी गबाळ्या म्हणजेच भोळ्या लोकांना भोवती जमवून माळा हलवीत नाही. मी धर्मशास्त्रातील कोड्यासारख्या गूढ गोष्टी जाणत नाही. मी व्यक्तीला जागच्या जागी थांबवणं, तिला मोहिनी घालणं, तिचं उच्चाटन करणं, अशा वेदातील म्हणजेच या संदर्भात अथर्ववेदातील विद्या जाणत नाही. तुका नरकात वास्तव्य करणाऱ्या म्हणजे दुर्गतीला जाणाऱ्या या लोकांसारखा वेडा नाही.
(संग्राहक: संजय दत्तात्रय सोमवंशी-पाटील)
९४२२३४५३६८
No comments:
Post a Comment