Tuesday, 24 January 2017

संत तुकारामांचे अभंगशतक (शब्द ३४)

शब्द हे साधन अतिशय प्रभावी आहे, ते शास्त्रही आहे आणि म्हणूनच ते अतिशय जपून, काळजीपूर्वक आणि विवेकानं वापरलं पाहिजे, हा तुकारामांचा आग्रह होता. म्हणूनच शब्दप्रयोगाच्या बाबतीत ते समाजाला वारंवार मार्गदर्शन करीत असत. कुणी अर्थहीन, कठोर, भावशून्य आणि प्रसंगी दुसऱ्याच्या काळजाला जखमा करणारं बोलत असेल, तर आपण त्यापासून दूर रहावं, नाही तर तसं बोलण्याची आपल्यालाही सवय लागू शकते, हे समजावून सांगताना ते म्हणतात,

३४
फट्याचे बडबडे चवी ना सवाद ! आपुला चि वाद आपणासी !!१!!
कोणे या शब्दाचे मरावे घसणी ! अंतरे शाहाणी राहिजे हो !!२!!
गाढवाचा भुंक आइकता कानीं ! काय कोडवाणी ऐसियेचे ? !!३!!
तुका म्हणे ज्यासी करावे वचन ! त्याचे येती गुण अंगास ते !!४!!
                            (अभंग क्र. ४२०६)

एखादा मनुष्य मागचा पुढचा विचार न करता फटाफट बडबड करतो, त्याच्या बोलण्याला ना चव असते, ना स्वाद असतो. ते बोलणं काही हितकारक नसतं. असं बोलणं ऐकत बसण्यापेक्षा आपण अंतर्मुख होऊन आपल्याच विश्वात मग्न होणं चांगलं. आपण आपला स्वतःशीच वाद करावा, संवाद करावा. या आत्मवादातून, आत्मसंवादातून आपल्याला स्वतःचाच शोध घेता येईल. त्यातून आपल्याला आपले गुणदोष समजतील आणि आपण स्वतःचं शुद्धीकरण करू शकू, आपला विकास साधू शकू. दुसऱ्याचे नको असलेले शब्द ऐकून त्याच्याशी वाद घालण्याची घासाघीस करीत बसणं म्हणजे एक प्रकारचं मरणंच होय. असं उगीचच कुणी कशाला मरावं ? त्यापेक्षा आपल्या आत डोकावून पहावं, आपल्या आतच असलेल्या सुखाच्या भांडाराचा शोध घ्यावा, हेच शहाणपणाचं होय. गाढवाचं ओरडणं हे काही गोडव्यानं भरलेलं नसतं. आपण कानांनी ते ऐकलं, तर आपल्याला काही आनंद होत नाही, त्याचं कोडकौतुक वाटत नाही, आपण काही त्याचं ओरडणं ऐकून त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करीत नाही. हा सावधपणा आवश्यक आहे. कारण आपण ज्याच्याबरोबर बोलतो, संवाद करतो, त्याचे गुण आपल्या अंगाला चिकटतात.


(संग्राहक:- संजय दत्तात्रय सोमवंशी-पाटील)
९४२२३४५३६८
 

1 comment:

  1. The Casino Directory | JtmHub
    The Casino jancasino.com Directory is a complete directory for casino and sportsbook operators goyangfc in Ireland septcasino and Portugal. Jtm's comprehensive directory www.jtmhub.com provides หาเงินออนไลน์ you with more than 150

    ReplyDelete