Saturday, 21 January 2017

संत तुकारामांचे अभंगशतक (शब्द ३३)

शब्दरूपी साधन कसं वापरावं, याविषयी तुकारामांनी आपल्याला नाना मार्गांनी सल्ला दिला आहे. ते म्हणतात,

३३
वचन ते नाही तोडीत शरीरा ! भेदत अंतरा वज्राऐसे !!१!!
काही न सहावे काशा ही कारणें ! संदेह निधान देह बळी !!२!!
नाही शब्द मुखीं लागत तिखट ! नाही जड होत पोट तेणें !!३!!
तुका म्हणे जरी गिळे अहंकार ! तरी वसे घर नारायण !!४!!
                   (अभंग क्र. २४४०)
एखादा मनुष्य जेव्हा दुसऱ्याला दुखावणारं काही तरी बोलतो, तेव्हा ते बोलणं काही ऐकणाऱ्याच्या शरीराला तोडत नाही. पण ते बोलणं वज्राप्रमाणं त्याच्या अंतःकरणाला भेदत जातं. अशा प्रकारे बोलणारा तापट माणूस कुठल्याही कारणानं काहीही सहन करीत नाही. एखाद्या बाबतीत त्याला काही संदेह, संशय असलाच, तर तो त्याचा देह बळी गेल्यानंतरच म्हणजे त्याच्या मृत्यूनंतरच दूर होतो. याचा अर्थ त्याला लागट बोलण्याची जी सवय लागलेली असते, ती तो हयात असेपर्यंत सुटत नाही. मरेपर्यंत तो त्याच पद्धतीनं बोलत राहतो. अशा प्रकारे बोलणारा मनुष्य जेव्हा काही शब्द उच्चारतो, तेव्हा ते शब्द काही त्याच्या तोंडात तिखट लागत नाहीत किंवा अशा शब्दामुळं काही त्याचं व ऐकणाराचं पोट जड होत नाही, त्यामुळं आपल्या बोलण्याचा काय परिणाम होतो , हे त्याला कळत नाही. परंतु या प्रकारातून घरात मात्र दुःखाचा कल्लोळ निर्माण होतो. खरं तर माणसानं जर अहंकार गिळला, तर घरामधे साक्षात ईश्वर वास्तव्य करू लागतो.


(संग्राहक :- संजय दत्तात्रय सोमवंशी-पाटील)
९४२२३४५३६८

 

No comments:

Post a Comment