Saturday, 31 December 2016

संत तुकारामांचे अभंगशतक (हितासाठी उपदेश २५)

संत हा जो उपदेश करतात, त्याचे आणखी काही पैलू तुकारामांनी एका अभंगात मांडले आहेत. ते म्हणतात :

२५
अधिकार तैसा दावियेला मार्ग | चालता हे मग कळो येते ||१||
जाळू नये नाव पावलेनि पार | मागील आधार बहुतांचा ||२||
तुका म्हणे रोग वैद्याचे अंगीं | नाही, करी जगीं उपकार ||३||
                         (अभंग क्र. ५३८)

संत सर्वांनाच उपदेश करतात, परंतु प्रत्येकाला उपदेश करण्याची त्यांची पद्धत वेगळी असते. ज्याचा जसा अधिकार असतो, जशी पात्रता असते, त्यानुसार ते त्याला कोणत्या मार्गानं जावं, त्याचा उपदेश करतात. माणूस जेव्हा त्या मार्गावरून प्रत्यक्ष चालतो, तेव्हा त्याला हा उपदेश उपयोगी पडतो. त्या वेळी त्याला या उपदेशाचं महत्त्व कळून येतं. उपदेशामुळं ज्याचं कल्याण झालेलं असतं, त्यानं संतांनी दाखविलेला मार्ग मोडू नये, त्याचं नुकसान करू नये. आपण नावेतून पलीकडं गेलो, तर पैलतीराला गेल्याच्या धुंदीत नाव जाळून टाकण्याचा कृतघ्नपणा करू नये. कारण, ती आपल्या मागून येणार्‍या खूप लोकांचा आधार असते. संत या नावेसारखेच असतात. आपल्याला त्यांच्या उपदेशाचा लाभ झाला, आता त्यांची गरज राहिली नाही, असं मानून त्यांना हानी पोचवू नये. कारण, ते इतर अनेकांचा आधार होत असतात. खरं तर संत हे एखाद्या वैद्यासारखे असतात. राेगी माणसाच्या अंगात रोग असतो. तो रोग काही वैद्याच्या अंगात नसतो. तरी देखील वैद्य त्या रोगाचा अभ्यास करतो, त्याचं निदान करतो आणि त्याच्यावर उपचार करतो. संतांचं कार्य हे असंच असतं. स्वतः त्यांच्या जीवनात जे दुःख नसतं, ते इतरांच्या जीवनातील दुःख त्यांना दिसत असतं आणि ते दूर करण्यासाठी त्यांची सगळी धडपड असते.

(संग्राहक: संजय दत्तात्रय सोमवंशी-पाटील)
९४२२३४५३६८

Friday, 30 December 2016

संत तुकारामांचे अभंगशतक (हितासाठी उपदेश २४)

    आता आपल्या ध्यानात येईल, की तुकाराम आपल्या या उद्गारांमधून एकूण सर्व संतांच्या जीवितकार्याचं स्वरूपच स्पष्ट करीत आहेत. सज्जन लोक सर्वसामान्य लोकांना सन्मार्गाचा जो उपदेश करतात,  त्यातून त्यांना स्वतःसाठी काही फायदा मिळवायचा नसतो, तर दुःखानी त्रासलेल्या लोकांचं दुःख दूर व्हावं ही तळमळच त्यामागं असते.
    संतांचं हे वागणं नेमकं कसं असतं, हे स्पष्ट करताना तुकाराम म्हणतात :

२४

काय वाणू आता ? न पुरे हे वाणी | मस्तक चरणीं ठेवीतसे ||१||
थोरीव सांडिली आपुली परिसें | नेणे सिवो कैसे लोखंडासी ||२||
जगाच्या कल्याणा संतांच्या विभूति | देह कष्टविती उपकारें ||३||
भूतांची दया हे भांडवल संतां | आपुली ममता नाही देहीं ||४||
तुका म्हणे सुख पराविया सुखें | अमृत हे मुखें स्रवतसे ||५||
                (अभंग क्र. १५१०)

संतांकडं परोपकाराची जी वृत्ती असते तिचं वर्णन करणंही अवघड आहे, ते वर्णन करण्यासाठी आपल्याकडं शब्द नाहीत, असं तुकाराम अगदी भारावलेल्या मनानं म्हणत आहेत. शब्दांना माघार घ्यावी लागत असल्यामुळं आपण संतांच्या चरणांवर मस्तक ठेऊन आपली कृतज्ञता व्यक्त करीत आहोत, असं ते म्हणत आहेत. संतांच्या उदात्त कार्यपद्धतीचं रूप स्पष्ट करण्यासाठी ते एक दृष्टांत देत आहेत. आपल्या स्पर्शानं लोखंडाचं सोनं करावं, असं परिसाला वाटत असतं. आपण लोखंडाला शिवण्याचा कमीपणा कसा पत्करायचा, असं तो मानत नाही. आपला मोठेपणा बाजूला ठेवून तो स्वतःहून लोखंडाला स्पर्श करतो. संत देखील नेमकं असंच वागतात. त्यांचं सगळं वैभव, व्यक्तिमत्त्व, कर्तत्व हे लोकांच्या कल्याणासाठी असतं, ते त्यांच्यावर उपकार करण्याच्या कामातच आपलं शरीर राबवितात. प्राणिमात्रांवर दया दाखवणं, हेच त्यांचं भांडवल असतं. ते स्वतःच्या देहाची, सुखाची काळजी करीत नसतात. त्यांना दुसऱ्यांच्या सुखानं सुख मिळत असतं आणि त्या इतर लोकांना सुख मिळावं, म्हणूनच त्यांच्या मुखातून उपदेशाचं अमृत स्रवत असतं, प्रकट होत असतं.

(संग्राहक: संजय दत्तात्रय सोमवंशी-पाटील)
९४२२३४५३६८

Saturday, 24 December 2016

संत तुकारामांचे अभंगशतक (हितासाठी उपदेश २३)

    परोपकार करू इच्छिणाऱ्या संतांच्या मनातील तळमळ स्पष्ट करण्यासाठी तुकारामांनी आणखी एका अभंगात कडूलिंबाचं उदाहरण दिलं आहे. ते म्हणतात:

२३

पुढिलिया सुखें निंब देता भले ! बहुत वारले होय दु:ख !!१!!
हे तो वर्म असे माउलीचे हाती ! हाणी मारी प्रीती हितासाठी !!२!!
खेळता विसरे भूक तान घर ! धरूनिया कर आणी बळें !!३!!
तुका म्हणे पाळी तोंडीचिया घासें ! उदार सर्वस्वें सर्वकाळ !!४!!
                              (अभंग क्र. २१४८)

        आजारी माणसाला औषध म्हणून कडूलिंब देणं, हे त्याच्या पुढच्या सुखाच्या दृष्टीने सुखकारक असतं. त्यामुळं त्याचं खूपसं दु:ख दूर होतं. मुलाच्या बाबतीत आईचं जे वागणं असतं, त्यामधून हे रहस्य नेमकेपणानं व्यक्त होतं. ती प्रसंगी त्याला मारहाण करते, पण हे तिचं त्याच्यावरचं प्रेमच असतं, ती हे त्याच्या हितासाठी करत असते. मूल खेळण्यात रममाण झालं, की ते तहान-भूक विसरून जातं, त्याला घरी येण्याचं भानही रहात नाही. मग आई जबरदस्तीनं त्याचा हात धरून त्याला घरी आणते. ती आपल्या तोंडचा घास भरवून त्याचं पोषण करते. ती सर्व प्रकारे सदैव त्याच्या बाबतीत उदारच असते. आई जशी मुलाच्या हितासाठी त्याच्यावर अशी जबरदस्ती करते, तशीच संतही दु:खी-कष्टी लोकांना काहीशा जबरदस्तीनं सन्मार्गावर आणण्यासाठी उपदेश करतात.

(संग्राहक संजय दत्तात्रय सोमवंशी-पाटील)
९४२२३४५३६८

Thursday, 22 December 2016

संत तुकारामांचे अभंगशतक (हितासाठी उपदेश २२)

       तुकाराम इथं आपल्या उपदेश करण्याच्या कृतीचं एक प्रकारे समर्थन करीत आहेत, आपलं मन मोकळं करीत आहेत.
            आणखी एका अभंगात ते म्हणतात,
२२
बोलिलो ते काही तुमचिया हिता ! वचन नेणता क्षमा कीजे ||१||
वाट दावी तया न लगे रुसावे ! अतित्याई जीवें नाश पावे ||२||
निंब दिला रोग तुटाया अंतरी | पोभाळिता वरि आत चरे ||३||
तुका म्हणे हित देखण्यासि कळे | पडती आंधळे कूपा माजी ||४||
                          (अभंग क्र. १३१)

          आपण जे काही बोललो, जो काही उपदेश केला, ते सगळं तुमच्या हितासाठी होतं ; असं तुकाराम अगदी कळवळून सांगत आहेत. आपण नकळत काही दुखावणारं बोललो असेल तर क्षमा करा, असं त्यांनी अगदी विनम्रतेनं म्हटलं आहे. चुकीच्या वाटेनं चाललेल्या माणसाला कधी कधी कठोरपणानं चार गोष्टी सांगाव्या लागतात. सांगणार्‍यानं त्या कितीही सद्भावनेनं सांगितल्या असल्या, तरी ऐकणार्‍याला ते रुचतंच असं नाही. सज्जन लोक मात्र अशा लोकांनाही प्रसंगी आंजारुन-गोंजारुन,  गोड बोलून अथवा क्षमा मागूनही पुनःपुन्हा समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात. कारण जो करुणेपोटी इतरांना चांगली वाट दाखवू इच्छीत असतो, त्यानं त्यांच्यावर रुसून चालत नाही. इतरांनीही त्याच्यावर रुसू नये. आपल्या हिताचा उपदेश नाकारण्याचा आततायीपणा केला, तर जीवाचा नाश होतो. शरीरात असलेला रोग नाहीसा व्हावा, म्हणून कोणी औषध म्हणून कडूलिंब दिला, तर रोगी माणसानं तो आपल्या हितासाठी आपल्या पोटात घेतला पाहिजे. तो नुसता वरवर चोळला, तर आतल्या रोगाची वाढच होत राहणार. उपदेशाचंही तसंच आहे. तो वरवर ऐकून सोडून दिला, तर माणसाचं दुःख दूर होऊ शकत नाही. जो डोळस असतो, समंजस असतो, विवेकी असतो, त्याला आपलं हित बरोबर कळतं. परंतु ज्यांच्याकडं डोळसपणा नसतो असे आंधळे लोक विहिरीत पडतात, म्हणजेच आपली हानी करून घेतात.


(संग्राहक:  संजय दत्तात्रय सोमवंशी-पाटील)
९४२२३४५३६८

Wednesday, 21 December 2016

संत तुकारामांचे अभंगशतक (हितासाठी उपदेश २१)

      ज्या लोकांच्या मनात इतरांविषयी कळवळा असतो आणि त्यांचं हित व्हावं अशी उत्कट इच्छा असते, ते लोक इतरांना जगण्याची योग्य वाट दाखवितात. असं करण्यामागं त्यांचा काही स्वार्थ नसतो. ते केवळ करुणेपोटीच लोकांना उपदेश करत असतात. अशा प्रकारच्या उपदेशाविषयी तुकारामांनी अनेक अभंग लिहिले आहेत. एका अभंगात ते म्हणतात :

२१
उपकारासाटी बोलो हे उपाय | येणेविण काय आम्हा चाड ? ||१||
बुडता हे जन न देखवे डोळां | येतो कळवळा म्हणउनि ||२||
तुका म्हणे माझे देखतिल डोळे | भोग देते वेळे येईल कळो ||३||
                    (अभंग क्र. ९४८)

     तुकाराम महाराज म्हणतात : आम्ही उपकार करण्याच्या इच्छेनं हे उपाय सांगत आहोत. खरं रहायचं, तर याविना आमचं काय अडलं आहे ? लोक बुडत आहेत, त्यांचं जीवन दुःखान्त उद्ध्वस्त होत आहे, ते मला डोळ्यांनी बघवत नाही, म्हणून माझ्या मनात कळवळा निर्माण होत आहे. यांच्यावर दुःख भोगण्याची वेळ येईल, तेव्हा त्यांना हे कळेल. त्या वेळीही माझे डोळे त्यांच्याकडं कळवळ्यानंच पाहतील

(संग्राहक : संजय दत्तात्रय सोमवंशी-पाटील)
९४२२३४५३६८

Monday, 19 December 2016

संत तुकारामांचे अभंगशतक (संगत २०)

२०
देव होसी तरी आणिकांते करिसी | संदेह येविशी करणे न लगे ||१||
दुष्ट होसी तरी आणिकांते करिसी | संदेह येविशी  करणे न लगे ||२||
तुका म्हणे जे दर्पणीं बिंबले | ते तया बाणले निश्चयेसी ||३||
                   (अभंग क्र. ११२८)

तुकारामांनी प्रस्तुत अभंगात संगतीचा आणखी एक पैलू सांगितला आहे. दुसऱ्याच्या संगतीत आपल्यावर काय परिणाम होतात, हे जसं त्यांनी नोंदवलं आहे, तसंच आपल्या संगतीचा इतरांवर काय परिणाम होतो, तेही त्यांनी नोंदविलं आहे. त्यांनी इथं वापरलेला 'देव' हा शब्द सद्गुणांनी युक्त मनुष्य असा व्यापक अर्थ देणारा आहे. तुकाराम या अभंगात जणू काही आपल्या प्रत्येकाशी बोलत आहेत. तू जर स्वतः सद्गुणांनी युक्त सज्जन असशील तर आपल्या सहवासात येणाऱ्या इतरांना तू सज्जन बनवशील, याविषयी शंका बाळगण्याचं कारण नाही, असं ते आपल्याला म्हणत आहेत. याउलट आपण दुष्ट असू, तर इतरांनाही दुष्ट बनवू, याविषयीही शंका बाळगण्याचं कारण नाही, असं ते स्पष्टपणानं सांगत आहेत. जो जसा असतो, त्याचं प्रतिबिंबही आरशामध्ये नेमकं तसंच पडतं, त्याच पद्धतीनं माणूस जसा असतो, तसाच त्याच्या संगतीचा परिणाम होतो. म्हणून, इतरांना सद्गुणी बनवावं अशी आपली इच्छा असल्यास आधी आपण सद्गुणी असणं महत्वाचं आहे, असं तुकाराम सांगत आहेत.

(संग्राहक: संजय दत्तात्रय सोमवंशी-पाटील)
९४२२३४५३६८

Sunday, 18 December 2016

संत तुकारामांचे अभंगशतक (संगत १९)

१९
चित्ता मिळे त्याचा संग रुचिकर | क्षोभविता दूर तो चि भले ||१||
ऐसी परंपरा आलीसे चालत | भलत्याची नीत त्यागावरी ||२||
हो का पिता पुत्र बंधु कोणी तरि | विजाति संग्रही धरू नये ||३||
तुका म्हणे सत्य पाळावे वचन | अन्यथा आपण करू नये ||४||
                      (अभंग क्र. ४१०२)

       तुकाराम सामाजिक व्यवहारांचं सूक्ष्म विश्लेषण करण्याच्या बाबतीत अतिशय कुशल होते. त्यामुळे ते एकाच विषयाचे अनेक पैलू ध्यानात घेत असत. प्रस्तुत अभंगात त्यांनी संगतीचा एक वेगळाच पैलू शब्दबद्ध केला आहे. ज्याचं मन आपल्या मनाशी जुळतं, त्याचीच संगत आपल्याला आवडते,  आपल्याला आनंद देते आणि म्हणून अशा माणसांचीच संगत करावी. जो स्वतःच्या सहवासानं आपल्या मनात क्षोभ निर्माण करतो, आपलं मन अस्वस्थ करून टाकतो, त्याला दूर ठेवणं हेच चांगलं होय. परंपरा अशीच चालत आली आहे. ज्याची संगत भलती-सलती असेल, त्याच्या सहवासाचा त्याग करावा, हीच खरी नीती होय. मग अशी व्यक्ती पिता असो, पुत्र असो, बंधू असो, की आणखी कोणी असो. ज्यांचं वर्तन आपल्या मूल्यांशी जुळत नाही, त्याचा सहवास करू नये. आपण सत्य वचनाचं, नैतिकतेचं, माणूसकीचं पालन करावं, त्यापेक्षा वेगळं वागू नये. याचा अर्थ आपल्या सदाचाराच्या वागण्याला ज्याचा अडथळा होत असेल, त्याच्यापासून दूर रहावं.

(संग्राहक: संजय दत्तात्रय सोमवंशी-पाटील)
९४२२३४५३६८

Saturday, 17 December 2016

संत तुकारामांचे अभंगशतक (संगत १८)

१८
तृषाकाळीं उदकें भेटी | पडे मिठी आवडीचा ||१||
ऐसियाचा हो का संग | जिवलग संतांचा ||२||
मिष्टान्नाचा योग भुते | म्हणता चुके पुरेसे ||३||
तुका म्हणे माते बाळा | कळवळा भेटीचा ||४||
                   (अभंग क्र. १३०१)

आपल्याला तहान लागलेली असावी आणि त्या वेळी आपल्याला नेमकं पाणी भेटावं, हा प्रसंग मोठा आनंदाचा असतो. ही घटना आपल्याला आवडणारी, आपल्या मनाला सुखावून टाकणारी असते. तहानेच्या क्षणी पाणी भेटल्यामुळं जो आनंद लाभतो, तसाच आनंद जिवलग संतांच्या संगतीमुळंही लाभतो. म्हणून, प्रत्येकानं अशी संगत लाभण्याची इच्छा करावी आणि ती प्राप्त करण्यासाठी योग्य ते प्रयत्नही करावेत. आपल्याला भूक लागलेली असावी आणि त्या वेळी आपल्याला मिष्टान्न प्राप्त व्हावं आणि तेही विपुल प्रमाणात ! अशा वेळी त्या पक्वान्नाचा जितका आस्वाद घेता येईल, तितका घ्यावा. बाळ आणि आई यांच्या भेटीमधे जी कळवळ्याची, वात्सल्याची उत्कटता असते, तीच सर्वसामान्य माणसाच्या आणि संतांच्‍या भेटीमधे असते.

(संग्राहक: संजय दत्तात्रय सोमवंशी-पाटील)
९४२२३४५३६८

Friday, 16 December 2016

संत तुकारामांचे अभंगशतक (संगत १७)

१७
अमृताची फळे अमृताची वेली | ते चि पुढे चाली बीजाची ही ||१||
ऐसियांचा संग देई नारायणा | वोलावा वचना जयांचिया ||२||
उत्तम सेवन सितळ कंठासी | पुष्टी कांती तैसी दिसे वरी ||३||
तुका म्हणे तैसे होइजेत संगें | वास लागे अंगें चंदनाच्या ||४||
             (अभंग क्र. ३०४५)

अमृताच्या वेलीला अमृताचीच फळं लागावीत आणि त्या फळांमधून निघणारी बीजं अमृताचा वारसा चालवणारीच निघावीत, तसं संतांच्या संगतीचं आहे. ज्याला स्वतःचं खरंखुरं कल्याण करायचं असेल, त्यानं आपली संगत मोठ्या विवेकानं निवडली पाहिजे. कठोर, निर्दय, संवेदनाहीन आणि स्वार्थी व्यक्तीच्या संगतीपासून दूर राहणं, हेच आपल्या हिताचं असतं. ज्यांच्या बोलण्यामधे ओलावा आहे, म्हणजेच करुणा आहे, अशा लोकांचीच संगत आपल्याला लाभावी, अशी तुकारामांची उत्कट इच्छा आहे. उत्तम पदार्थांचं सेवन केलं असता, ते आपल्या कंठालाही शीतलता देतात आणि त्यांच्या सेवनामुळं शरीर पुष्ट होऊन त्याच्यावर उत्तम कांतीही येते. सज्जनांची संगत ही अशा उत्तम पक्वान्नांसारखी असते. ती सुखाचा गोडवाही देते आणि आपलं जीवन समृद्धही करते. चंदनाचा स्पर्श झाला असता त्याचा सुगंध आपल्या अंगालाही लागतो, त्याप्रमाणं सज्जनाच्या संगतीत आपलं जीवनही सद्गुणांच्या सुगंधानं गंधित होऊन जातं.

(संग्राहक: संजय दत्तात्रय सोमवंशी-पाटील)
९४२२३४५३६८

Wednesday, 14 December 2016

संत तुकारामांचे अभंगशतक (संगत १६)

                      संगत

  प्रत्येक मनुष्य समाजात वावरताना अनेक कारणांनी इतरांच्या सहवासात येत असतो. अशा वेळी तो ज्यांच्या संपर्कात येतो, त्यांच्या गुणदोषांचा प्रभाव त्याच्यावरही पडत असतो. आपलं जीवन अधिकाधिक सफल व्हावं, अशी आपली इच्छा असते. आपली ही इच्छा पूर्ण व्हायची असेल, तर आपण चांगल्या माणसांच्या संगतीत रहायला हवं, संतांची संगत आपल्या आयुष्याचं सोनं करते, असं तुकाराम आग्रहपूर्वक सांगत असत. ते म्हणतात,

१६
कस्तुरी भिनली जये मृत्तिके | तयेसी आणिके कैसी सरी ? ||१||
लोखंडाचे अंगीं लागला परिस | तया आणिकास कैसी सरी ? ||२||
तुका म्हणे मी न वजे यातीवरी | पूज्यमान करी वैष्णवांसी ||३||
               (अभंग क्र. १७८८)

   ज्या मातीमधे कस्तुरी भिनलेली असते, ती स्वतःही कस्तुरीसारखीच सुगंधानं दरवळते. ज्या मातीला असा स्पर्श झालेला नसतो, ती माती कस्तुरी भिनलेल्या मातीशी कधीही बरोबरी करु शकत नाही. ज्या लोखंडाला परिसाचा स्पर्श झालेला नसतो, ते लोखंड परिसाचा स्पर्श झालेल्या लोखंडाची बरोबरी करु शकत नाही. याचा अर्थ असा, की ज्याला संतांचा सहवास मिळालेला नसतो, तो मनुष्य संतांचा सहवास मिळालेल्या माणसाशी कधीही बरोबरी करु शकत नाही. ज्याला संतांचा सहवास मिळालेला असतो, त्याचं जीवन आरपार बदलून जातं, ते अधिक उन्नत होतं, विशुद्ध होतं. ते संत कोणत्या जातीचे आहेत याचा आपण विचार करीत नाही, त्यांच्या जातीला महत्त्व देत नाही, तर ते वैष्णव म्हणजेच नीतिमान भक्त आहेत एवढंच पाहून त्यांना पूज्य मानतो, अशी तुकारामांची भूमिका आहे. या अभंगात तुकारामांनी संतांच्या संगतीचा गौरवही केला आहे आणि माणसामाणसांमधील समतेचं महत्त्वही लोकांच्या मनावर बिंबविण्याचा प्रयत्न केला आहे.

(संग्राहक:  संजय दत्तात्रय सोमवंशी-पाटील) ९४२२३४५३६८

Tuesday, 13 December 2016

संत तुकारामांचे अभंगशतक (संत १५)

अशा संतांच्‍या ऋणातून मुक्त होणंही अशक्य, असं तुकारामांना वाटतं. ते म्हणतात,

१५
काय सांगो आता संतांचे उपकार ? | मज निरंतर जागविती ||१||
काय द्यावे त्यांचे व्हावे उतराई ? | ठेविता हा पायीं जीव थोडा ||२||
सहज बोलणे हितउपदेश | करूनि सायास शिकविती ||३||
तुका म्हणे वत्स धेनुवेचा चित्तीं | तैसे मज येती सांभाळीत ||४||
                  (अभंग क्र. ३६५६)

     अखंडपणे सावध करणाऱ्या, जागृतीचा संदेश देणाऱ्या संतांचे जे उपकार आहेत, त्यांचं वर्णन करणंही अशक्य आहे, असं तुकारामांना वाटतं. काय दिलं असता त्यांच्या ऋणातून उतराई होता येईल, असा त्यांना प्रश्न पडला आहे. संतांच्या पायांवर जीव ठेवला, तरी त्यामुळं ऋण फिटणार नाही, ती कृती थिटीच ठरेल, असं त्यांचं मन म्हणत आहे. सहवासात असताना संत जे सहजपणानं बोलतात, तो ऐकणाऱ्याच्या दृष्टीनं हिताचा उपदेश ठरतो. ते मोठे प्रयत्न करून, कष्ट करून शिकवतात. गायीच्या चित्तामधे ज्याप्रमाणं तिच्या वासराची काळजी असते, त्याप्रमाणं संत आपली काळजी करतात, जीवनातील सर्व प्रसंगात सांभाळतात, असं तुकारामांनी अतिशय कृतज्ञतेनं नोंदविलं आहे.

(संग्राहक: संजय दत्तात्रय सोमवंशी-पाटील)
९४२२३४५३६८

Monday, 12 December 2016

संत तुकारामांचे अभंगशतक (संत १३, १४)

संतांचा सहवास माणसाचं जीवन आरपार बदलून टाकतो. म्हणूनच संतांची भेट हा आपल्या जीवनातील मोठा आनंदसोहळा वा सण असल्याचं तुकारामांना वाटतं. ते म्हणतात,

१२
धन्य आजि दिन | जाले संतांचे दर्शन ||१||
जाली पापातापा तुटी | दैन्य गेले उठाउठी ||२||
जाले समाधान | पायीं विसावले मन ||३||
तुका म्हणे आले घरा | तो चि दिवाळीदसरा ||४||
                   (अभंग क्र. ९९४)

१३
धन्य काळ संतभेटी | पायीं मिठी पडिली तो ||१||
संदेहाची सुटली गाठी | जाले पोटीं शीतळ ||२||
भवनदीचा जाला तारा | या उत्तरा प्रसादें ||३||
तुका म्हणे मंगळ आता | कोण दाता याहूनि ? ||४||
                   (अभंग क्र. ८८१)

आज संतांचं दर्शन झालं, हा धन्यतेचा दिवस होय. आता सगळी पापं, सगळे ताप नाहीसे झाले. भेटीबरोबर ताबडतोब जीवनातील दीनवाण्या सर्व गोष्टी दूर झाल्या. संतांच्या पायी मन विसावलं आणि त्यामुळं समाधान झालं, जीव सुखावला. आपल्याकडं जे अनेक सण आहेत, त्यांमधे दिवाळी आणि दसरा हे सण सगळ्यात मोठे मानले जातात. तुकाराम मात्र काही वेगळाच विचार करतात. संत घरी येणं, हाच आपल्या दृष्टीनं खराखुरा दिवाळीदसरा आहे, असं त्यांना वाटतं. संतांची भेट होणं, त्यांच्या पाया पडणं, हा काळ तुकारामांच्या दृष्टीनं जीवन कृतार्थ करणारा झाला. त्यांच्या मनातील संदेहाची गाठ सुटली. मनातील सर्व शंका दूर झाल्या. अंतर्यामी शीतलता निर्माण झाली. संतांच्या उपदेशाचा प्रसाद मिळाला आणि तो संसाररुपी नदी तरुन जाण्यासाठी नाव बनला. या जगामधे मंगल, हितकारक, कल्याणकारक गोष्टी देणारा यांच्याखेरीज दुसरा कोण दाता मिळेल बरं, असा प्रश्न तुकारामांनी विचारला आहे. संतांसारखा आपल्या आयुष्याला मंगलमय करुन टाकणारा दुसरा कोणी नाही, ही भावना त्यांनी यातून व्यक्त केली आहे.

(संग्राहक:  संजय दत्तात्रय सोमवंशी-पाटील)
९४२२३४५३६८

Friday, 9 December 2016

संत तुकारामांचे अभंगशतक (संत १२)

अशा व्यापक आचारविचारांच्या संताची अवहेलना करायची आणि धर्माच्या नावाखाली देवाची पूजा करायची, हा खरा धर्म नव्हे, असं तुकारामांना वाटत असे, ते म्हणतात,

१२
संताचा अतिक्रम | देवपूजा तो अधर्म ||१||
येती दगड तैसे वरी | मंत्रपुष्पे देवा शिरीं ||२||
अतीतासि गाळी | देवा नैवेद्यासी पोळी ||३||
तुका म्हणे देवा | ताडण भेदकांची सेवा ||४||
                           (अभंग क्र. २७९)

      संताचं उल्लंघन करुन देवपूजा करणं, हा अधर्म होय. अशी पूजा करताना म्हटलेले मंत्र, वाहिलेली फुलं ही दगड पडावेत तसे देवाच्या मस्तकावर येतात. आपल्याकडं आलेल्या अतिथीला शिवी द्यायची आणि नैवेद्याची पोळी घेऊन जायचं, हाही तुकारामांना अधर्म वाटतो. माणसामाणसांत भेदभाव करणाऱ्यांनी केलेली देवाची सेवा ही देवाच्या दृष्टीनं मारहाण असते. कारण, खरा देव मूर्ती वगैरेंमधे नसतो, तर सज्जनांच्या ठायी असतो.

(संग्राहक: संजय दत्तात्रय सोमवंशी-पाटील)
९४२२३४५३६८

Thursday, 8 December 2016

संत तुकारामांचे अभंगशतक (संत ११)

    जो सर्व प्राणिमात्रांच्या कल्याणाची काळजी वाहतो, तोच संत या नावाला साजेसा असतो, हे सांगताना तुकाराम महाराज म्हणतात,

११
देवाची पूजा हे भूताचे पाळण | मत्सर तो सीण बहुतांचा ||१||
रुसावे फुगावे आपुलियावरि | उरला तो हरि सकळ ही ||२||
तुका म्हणे संतपण या चि नावे | जरि होय जीव सकळांचा ||३||
                  (अभंग क्र. ३८५४)

प्राणिमात्रांचं पालन करणं, हीच देवाची पूजा होय. याउलट इतरांचा मत्सर करणं, हा आनंद नसून शीणच होय. माणसाला जे काही रुसायचं फुगायचं असेल, ते त्यानं स्वतःच्या बाबतीत करावं, स्वतःचे दोष दूर करण्यासाठी स्वतःविरुद्ध तक्रार करावी, स्वतःविरुद्ध बंड करावं, पण इतरांशी मात्र आपुलकीनं वागावं. मग आपल्या बाहेरचं सर्व जग म्हणजे ईश्वर आहे, असा अनुभव घेता येतो. इतर सर्वांचा जीव म्हणजे आपणच, त्यांचा जीव हा आपलाच जीव, अशी भावना बनली, असं वर्तन घडलं, तरच संत हे नाव धारण करण्यास तो मनुष्य पात्र ठरतो.

(संग्राहक: संजय दत्तात्रय सोमवंशी-पाटील)
९४२२३४५३६८

Tuesday, 6 December 2016

संत तुकारामांचे अभंगशतक (संत १०)

संत

आपल्या अंतःकरणातील कळवळ्यापोटी संत कसे वागतात, ते उपमांद्वारे स्पष्ट करताना तुकाराम म्हणतात,

अभंग १०

अर्भकाचे साटी | पंतें हाती धरिली पाटी ||१||
तैसे संत जगीं | क्रिया करुनी दाविती अंगीं ||२||
बालकाचे चाली | माता जाणुनि पाउल घाली ||३||
तुका म्हणे नाव | जनासाठी उदकीं ठाव ||४||

                      (अभंग क्र. ४०८२)

लोकांच्या कल्याणासाठी संत नेहमी चांगल्या वागणुकीचा उपदेश करीत असतात. परंतु, हा उपदेश करण्याचा अधिकार त्यांनी स्वतःच्या चारित्र्यानं प्राप्त केलेला असतो. लोकांना जे सांगायचं, ते आपण आधी करुन दाखवायचं, ही त्यांच्या जगण्याची रीत असते. मुलानं हातात पाटी कशी धरावी, पेन्सिलीनं अक्षर कसं गिरवावं, हे त्याला शिकवताना शिक्षक आधी स्वतःच्या हातात पाटी घेतो. आई मुलाला चालायला शिकवताना स्वतः एक एक पाऊल चालून त्याला पावलं टाकायला शिकविते. नाव स्वतः पाण्यात वावरते, ती स्वतःसाठी नव्हे, तर लोकांना पैलतीराला नेण्यासाठी. संतांचं कार्य हे असंच लोकांच्या कल्याणासाठी असतं.

(संग्राहक: संजय दत्तात्रय सोमवंशी-पाटील)
                              ९४२२३४५३६४

Monday, 5 December 2016

संत तुकारामांचे अभंगशतक (संत ९)

संत

तुकाराम संतांविषयीची आपल्या मनातील विलक्षण ओढ व्यक्त करताना वारंवार त्यांच्या प्रेमाची तुलना आईच्या वात्सल्याशी करतात. याचं कारणही स्पष्ट आहे. संतांच्या अंतःकरणात सर्वसामान्य लोकांविषयी आईच्या वात्सल्यासारखीच करुणा असते. सावाभाविकच, माणूस सुखदुःखाच्या प्रसंगी जसा आईकडं धाव घेतो, तशीच धाव माणसानं संतांकडंही घ्यावी, असं तुकारामांना वाटत असे. या उत्कट भावनेतूनच त्यांनी संतांविषयी अनेक अभंग लिहिले आहेत.
     संत करुणाशील असतात, हे खरंच. परंतु जगात अनेकदा संतत्वाचा मुखवटा धारण करणारे लोकही असतात. अशा लोकांपासून संतांचं वेगळेपण कळावं, म्हणून तुकारामांनी संतांची एक अचूक व्याख्याच आपल्या हाती दिली आहे. ते म्हणतात,

अभंग

जे का रंजले गांजले | त्यासि म्हणे जो आपुले ||१||
तो चि साधु ओळखावा | देव तेथे चि जाणावा ||२||
मृदु सबाह्य नवनीत | तैसे सज्जनाचे चित्त ||३||
ज्यासि आपंगिता नाही | त्यासि धरी जो ह्रदयीं ||४||
दया करणे जे पुत्रासी | ते चि दासा आणि दासी ||५||
तुका म्हणे सांगू किती ? | तो चि भगवंताची मूर्ती ||६||
           (अभंग क्र. ३४७)

        जगात अनेक माणसं दुःखीकष्टी असतात. प्रतिकूल परिस्थितीच्या रेट्यानं जेरीला आलेली असतात. आपल्या सहवासात येणारा असाच एखादा माणूस परिस्थितीनं रंजीस आलेला असतो, गांजलेला-त्रासलेला असतो. समाजात अनेक माणसं या मेटाकुटीला आलेल्या व्यक्तीची उपेक्षा करतात, त्यांच्याकडं दुर्लक्ष करतात. परंतु एखादा माणूस त्या दुःखी माणसाला जवळ करतो. तो आपला माणूस आहे, असं मानून आपलेपणानं त्याचं दुःख दूर करण्याचा प्रयत्न करतो. जो अशा दुःखी माणसाच्या बाबतीत अशी आत्मीयता दाखवतो, तोच संत वा साधू आहे, हे ओळखावं. अशा माणसाला केवळ साधू मानूनच तुकाराम थांबत नाहीत, तर देव देखील अशा माणसाच्या ठिकाणीच असतो, असं ते म्हणतात. देवाची प्राप्ती करायची असेल, तर त्याचा शोध अशा संतांच्या सहवासात घेतला पाहिजे, हा तुकारामांचा उपदेश आपण नीट समजून घेतला पाहिजे. या संतसज्जनांचं मन करुणेमुळं किती हळुवार झालेलं असतं, ते सांगताना त्यांनी अंतर्बाह्य मऊ असलेल्या लोण्याची उपमा दिली आहे. एखादा माणूस निराधार, अनाथ असतो. त्याला सांभाळणारा कोणी नसतो. परंतु, जो खराखुरा संत असतो, तो त्या निराधार माणसाला आपल्या ह्रदयाशी धरतो. आपल्या पुत्रावर जे प्रेम करायचं, तेच आपले दास आणि दासी यांच्यावरही करायचं, अशा विशाल अंतःकरणाचा मनुष्य हा खरा संत म्हटला जातो. अशा व्यक्तीचं मोठेपण पुनःपुन्हा सांगावं, असं तुकारामांना वाटतं. असा मनुष्य म्हणजे साक्षात भगवंताची मूर्ती होय, हे तुम्हांला किती वेळा सांगू, असा प्रश्नच त्यांनी लोकांना विचारला आहे. खरं तर हा प्रश्न आपल्याला पण लागू आहे, हे आपण अतिशय गंभीरपणानं समजून घेतलं पाहिजे.

(संग्राहक:  संजय दत्तात्रय सोमवंशी-पाटील)

९४२२३४५३६८

Saturday, 3 December 2016

संत तुकारामांचे अभंगशतक (आईवडील ८)

तुकारामांनी आईच्या वात्सल्याप्रमाणंच वडिलांच्या प्रेमाचाही मोठा गौरव केला आहे. ते म्हणतात,


बाप करी जोडी लेकराचे ओढी | आपुली करवंडी वाळवूनी ||१||
एकाएकी केला मिरासीचा धनी | कडिये वागवूनी भार खांदीं ||२||
लेवऊनी पाहे डोळां अळंकार | ठेवा दावी थोर करुनिया ||३||
तुका म्हणे नेदी गांजूं आणिकांसी | उदार जीवासी आपुलिया ||४||
                   (अभंग क्र.३२६८)

बाप लेकराच्या प्रेमापोटी संपत्ती जमवत राहतो. त्यासाठी कष्ट करतो, पोट खनपटीला जाईपर्यंत उपासमार सहन करतो. त्याला कडेवर घेतो, खांद्यावर बसवतो आणि मग एकदम आपल्या सगळ्या वैभवाचा, साधनसामग्रीचा मालक बनवून टाकतो. आपल्या कष्टातून मिळवलेलं सगळं त्याला आयतं देतो. त्याच्या अंगावर दागिने घालतो आणि आपल्या डोळ्यांनी ते दृश्य पाहून त्याला डोळ्यांचं पारणं फिटल्यासारखं समाधान होतं. आपल्याकडच्या संपत्तीचं भांडार जेवढं वाढवता येईल, तेवढं वाढवून तो ते त्याला दाखवतो, त्याच्या स्वाधीन करतो. तो स्वतःच्या जीवावर उदार होतो, आपल्या प्राणांची पर्वा करीत नाही, पण दुसर्‍या कोणाला आपल्या लेकराच्या वाटेला जाऊ देत नाही, त्याचा छळ करु देत नाही.
        आईवडील आणि मुलं यांच्या या अतिशय जिव्हाळ्याच्या नात्याचा विचार करताना दोन पैलूंकडे आपण सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे. आपण मुलांसाठी इतकं सारं केलं आहे, म्हणून त्यांनी सदैव आपल्या मुठीत राहिलं पाहिजे, आपण म्हणू ते ऐकलं पाहिजे, आपण सांगू तसंच वागलं पाहिजे, असा हट्ट धरुन आईवडिलांनी मुलांचं स्वातंत्र्य कदापि हिरावून घेता कामा नये. त्यांना पंख द्यायचे, ते पंख बळकट करण्यासाठी त्यांना सर्व प्रकारची मदतही करायची, परंतु त्याबरोबरच त्यांना उड्डाणाचं स्वातंत्र्यही द्यायचं, तरच आपण त्यांच्यासाठी घेतलेल्या कष्टांचं खऱ्या अर्थाने चीज होतं.
       दुसऱ्या बाजूनं मुलांनीही आईवडिलांनी आपल्यासाठी जे काही केलं आहे त्याची जाण सदैव ठेवली पाहिजे. त्यांच्याविषयी अपार कृतज्ञता बाळगली पाहिजे. कृतज्ञता हा माणसाच्या काळजाचा सुगंध असतो, असं म्हणतात. मुलांनी आईवडिलांच्या बाबतीत हे वचन सदैव स्मरणात ठेवावं. काही बाबतीत त्यांच्याशी मतभेद होऊ शकतात आणि तसे मतभेद होणं हा काही त्यांचा अनादर नव्हे. परंतु मतभेद होणं ही गोष्ट वेगळी आणि कृतघ्न बनणं ही गोष्ट वेगळी. आपल्या जीवनाचे निर्णय प्रसंगी त्यांच्या विरोधात जाऊनही घ्यावे लागले, तर ते जरुर घ्यावेत. परंतु तसं करताना त्यांनी आपल्यासाठी जे काही केलेलं असतं, त्यासाठी आयुष्यभर त्यांच्याविषयी कृतज्ञ मात्र जरुर रहावं.

(संग्राहक:- संजय दत्तात्रय सोमवंशी-पाटील ९४२२३४५३६८)

Friday, 2 December 2016

संत तुकारामांचे अभंगशतक (आईवडील ७)

गर्भवती स्त्रीला होणारं सोलीव सुख तिच्या डोहाळ्यांमधून कसं प्रकट होतं, त्याचं भावस्पर्शी वर्णन तुकारामांनी एका अभंगात केलं आहे. ते म्हणतात,


आवडी येते गुणें | कळो, चिन्हे उमटती ||१||
पोटीचे ओठीं उभे राहे | चित्त साहे मनासी ||२||
डोहोळियाची भूक गर्भा | ताटीं प्रभा प्रतिबिंबे ||३||
तुका म्हणे मानोन घ्यावे | वाटे खावे वाटते ||४||

                            (अभंग क्र. ३२७६)

       गर्भवतीच्या वागण्यातून जे गुण प्रकट होतात, त्यावरुन तिला काय आवडतं, म्हणजेच तिला कोणते डोहाळे लागले आहेत, ते कळून येतं. तिच्या अंगी त्याची चिन्ह उमटतात. तिच्या पोटात तिची आणि गर्भाची जी इच्छा निर्माण झालेली असते, ती तिच्या ओठांवर येते, ती आपल्या तोंडानं ती इच्छा बोलून दाखवते. तिच्या मनात जी इच्छा उद्भवलेली असते, ती स्पष्टपणे बोलून दाखविण्यास तिचं चित्त तिच्या मनाला साहाय्य करतं. तिची चिंतनशक्ती मनातील इच्छेला शब्दरुप देते. गर्भाची जी भूक असते, जी इच्छा असते, ती डोहाळ्याच्या रुपानं व्यक्त होते. चंद्राच्या वा सूर्याच्या बिंबाची प्रभा पाण्यानं भरलेल्या ताटात प्रतिबिंबित व्हावी, तशीच गर्भाची इच्छा आईच्या डोहाळ्यामधे प्रतिबिंबित होते. म्हणूनच, गर्भवतीला जे काही खावंसं वाटतं, ते तिनं विनासंकोच मागून घ्यावं, असं तुकाराम महाराज म्हणतात. अर्थात, घरच्या लोकांनीही तिची इच्छा पूर्ण करावी, हे ओघानंच आलं.

(संग्राहक:- संजय दत्तात्रय सोमवंशी-पाटील ९४२२३४५३६८)