Tuesday, 30 August 2022

संत तुकारामांचे अभंगशतक ( आघात ६५ )

                  (आघात ६५)

आपलं मनुष्यत्व उन्नत करण्यासाठी आघात पचवणं महत्त्वाचं असतं, हे तुकारामांनी आणखी एका अभंगात अनेक उदाहरणं देऊन स्पष्ट केलं आहे. ते म्हणतात,

६५ 
तापल्यावाचून नव्हे अळंकार । पिटूनिया सार उरले ते ।। १ ।। 
मग कदाकाळी नव्हे शुद्ध जाति । नासें शत्रु होती मित्र ते चि ।। २ ।। 
कळिवर बरे भोगू द्यावे भोगा । फांसिले ते रोगा हाती सुटे ।। ३ ।। 
तुका म्हणे मन करावे पाठेळ । साहावे चि जाळ सिजेवरि ।। ४ ।। 

(अभंग. क्र. २४००)

       जगभरच्या लोकांना सोन्याच्या दागिन्यांचं आकर्षण असतं, हे प्रसिद्धच आहे. सोनं हा धातू खरोखरच देखणा असून, तो माणसाचं मूळचं सौंदर्य खुलवतो. पण सोन्यापासून दागिना बनविण्याची प्रक्रिया सोन्याच्या दृष्टीनं मात्र तशी सुखाची नसते. त्याला तापवल्याशिवाय, उष्णतेनं भाजून काढल्याशिवाय त्याचा अलंकार घडत नाही. त्याला नुसतं तापवलंच जात नाही, तर सोनार आपल्या हत्यारानं त्याला वेगवेगळ्या अंगानं ठोकतही राहतो. या प्रक्रियेमुळे सोन्यामधे काही हिणकस भाग मिसळलेला असला, तर तो बाजूला होतो आणि अस्सल, सारभूत सोनं उरतं. त्याचा दागिना बनतो. माणसाचंही असंच आहे, असं तुकारामांना सुचवायचं आहे. आघात सोसले नाहीत, सोसण्याची ही प्रक्रिया नष्ट केली, आघात झाल्याबरोबर तीव्र द्वेषाची भावना निर्माण झाली, तर जे मित्र असतात तेच शत्रू होतात. शरीराच्या वाट्याला जे भोग आलेले असतात, ते त्याला भोगू द्यावेत, त्यांना धैर्यानं सामोरं जावं. शरीरात काही गंभीर रोग झाला असला, तर फासण्या टाकल्यानंतरच म्हणजेच एक प्रकारची शस्त्रक्रिया केल्यानंतरच शरीराची त्या रोगातून सुटका होते. त्या फासण्या सोसायलाच हव्यात. जीवनाच्या प्रवासात माणसानं हे सगळं शिकून घेतलं पाहिजे. संकटं, दुःखं, प्रतिकूल परिस्थिती, शत्रुत्व अशा अनेक गोष्टी आपल्या वाट्याला येतात. पण या बाबतीत आपण खंबीर होऊन त्या सगळ्या गोष्टी झेलाव्यात. पाठेळ म्हणजे ओझं वाहणारं जनावर जसं खूप काही सोसतं, तसं आपल्या मनाला पाठेळ बनवावं. जोपर्यंत पदार्थ शिजत नाही, तोपर्यंत त्यानं जाळ सोसलाच पाहिजे. तसंच जीवनात जोपर्यंत परिपक्वता लाभत नाही, तोपर्यंत आघात सोसायलाच हवेत आणि एकदा परिपक्वता लाभली, की त्यानंतर आघात पचवण्याचं सामर्थ्य प्राप्त झालेलंच असतं.

डॉ. आ. ह. साळुंखे सर

(संग्राहक: संजय दत्तात्रय सोमवंशी पाटील)
९४२२३४५३६८

संत तुकारामांचे अभंगशतक (आघात ६४ )

                 आघात (६४)

        प्रत्येक माणसाच्या आयुष्यात केव्हा ना केव्हा कोणत्या ना कोणत्या प्रकारची संकटं येतातच. जो मनुष्य आतून कणखर असतो, मनानं खंबीर असतो, संकटाचे आघात पचवण्याची ज्याची ताकद असते, तो मनुष्य जगाच्या मानसन्मानाला पात्र होतो. परंतु ज्याचं व्यक्तिमत्त्व कसदार नसतं, कचखाऊ असत, तो आघात पचवू शकत नाही. तुकारामांनी एका अभंगात या सत्याचं दर्शन अचूकपणे घडवलं आहे. ते म्हणतात,

६४ 
हिरा ठेविता ऐरणीं । वांचे मारिता जो घणी ॥१॥
तोचि मोल पावे खरा । करणीचा होय चुरा ॥२॥
 मोहरा होय तोचि अंगे । सूत न जळे ज्याचे संगें ॥३॥
तुका म्हणे तोचि संत । सोसी जगाचे आघात ॥४॥ 

(अभंग. क्र.५०)

          नैसर्गिक स्थितीत सापडलेला हिरा पैलू पाडल्याशिवाय खऱ्या अर्थानं सुंदर आणि आकर्षक होत नाही. परंतु पैलू पाडायचे, तर त्याला ऐरणीवर ठेवून, घणाचे आघात करून त्याचं मूळचं रूप खुलवावं लागतं. जो अस्सल हिरा असतो, तो हे घणाचे आघात झाले तरी फुटत नाही. त्याचा नको असलेला भाग तेवढा अलग होतो आणि बाकीचा भाग शाबूत राहतो. जो हिरा असा असेल, त्यालाच बाजारात किंमत मिळते. याउलट, हिऱ्यासारखा दिसणारा पण हिऱ्याचा अस्सलपणा नसलेला पदार्थ घणाचा तडाखा सोसू शकत नाही, त्याचा चुरा होतो. मोहरा नावाचं एक रत्न असल्याचं मानलं जातं. जे अस्सल रत्न असतं, त्याच्या जवळ ठेवलेलं सूत आगीनं जळत नाही, असं म्हणतात. या वचनाच्या वाच्याथपिक्षा त्याचा व्यंग्यार्थ महत्त्वाचा आहे. हिऱ्याचं उदाहरण असो वा मोहरा या रत्नाचं असो, ते माणसाच्या व्यक्तिमत्त्वालाही लागू पडतं. स्वार्थी, विकारग्रस्त, दुर्जन मनुष्य असहिष्णू असतो; परंतु, जे खरे संत असतात, महामानव असतात, ते जगाचे आघात सोसूनही अविचल राहतात.

डॉ. आ. ह. साळुंखे सर

(संग्राहक: संजय दत्तात्रय सोमवंशी पाटील)
९४२२३४५३६८

संत तुकारामांचे अभंगशतक ( प्रयत्न ६३ )

                     प्रयत्न  (६३)

         प्रयत्नाच्या बाबतीत आणखी एका अभंगात ते म्हणतात, 

६३ 
निवडावे खड़े । तरी दळण बोजे घडे ॥१॥
नाही तर नासोनि जाय । कारण आळस उरे हाय ॥२॥
निवडावे तन । सेतीं करावे राखण ॥३॥
तुका म्हणे नीत । न विचारिता नव्हे हित ॥४॥

 (अ.क्र. २१३७)

          शेतातून आणलेलं धान्य दळण्यासाठी जसंच्या तसं जात्याकडं नेलं जात नाही. मळणी करताना धान्यामधे मातीचे खडे मिसळलेले असतात. स्वाभाविकच, असं धान्य दळण्यापूर्वी निवडावं लागतं. त्यातील खडे वेचून बाजूला काढावे लागतात. तरच ते दळण चांगलं होतं. नाही तर धान्याबरोबर खड्यांचंही पीठ होतं आणि मग त्या मातीची खस भाकरी, चपाती, पोळी वगैरेंना लागते. त्यांची चव बिघडते. स्वयंपाक नासून गेल्यासारखं होतं. खडे निवडण्याच्या बाबतीत आळस केला, तर हाय हाय करण्याची वेळ येते. धान्य निर्माण होण्याच्या आधी शेतामधे पीक असतानाही आळस झटकून अशीच काळजी घ्यावी लागते. तण वेचून काढावं लागतं. कधी खुरप्यानं भांगलण करून, कधी कोळप्याने कोळपण करून, तर कधी हातानं उपटून तण नाहीसं करावं लागतं. पिकाचं रक्षण करावं लागतं. व्यापक जीवनातही हीच रीत असते. जे चांगलं आहे, ते पुरेपूर वाढावं पक्व व्हावं, असं वाटत असेल, तर त्याच्या वाटेत अडथळा निर्माण करणारं, त्याला आडवं येणारं जे वाईट असेल, ते उपटून फेकावं लागतं. त्याचं निर्मूलन करावं लागतं. सज्जनांचं रक्षण करायचं असेल, तर दुष्टांचं निर्दालन करावं लागतं. हीच वागण्याची योग्य नीती होय. ही नीती समजून न घेता, तिचा विचार न करता कोणी वागू लागला, तर ते त्याच्या दृष्टीनं हितकारक नव्हे. व्यक्तीच्या कुटुंबाच्या आणि समाजाच्या निकोप वाढीसाठी समाजातील अनिष्ट प्रवृत्ती उखडून टाकल्या, तरच तो समाज खऱ्या अर्थानं उमलू फुलू शकतो, हे तणाच्या दाखल्यावरून चांगलं स्पष्ट होतं.

डॉ. आ. ह. साळुंखे सर

(संग्राहक: संजय दत्तात्रय सोमवंशी पाटील)
९४२२३४५३६८

संत तुकारामांचे अभंगशतक ( प्रयत्न ६२ )

                      प्रयत्न (६२)

           प्रयत्नाच्या बाबतीत काही महत्त्वाचे पैलू तुकारामांनी एका अभंगात नोंदविले आहेत. ते म्हणतात,

६२ 
उभा ऐल थडी तेणें घालू नये उड्डी ॥ १ ॥ 
पुढे गेल्याचे उपाय करावे ते केले काय ॥ २ ॥
दिसते आहारी। नये जाऊ ऐशावरी ॥ ३ ॥
अळसाची धाडी तुका म्हणे बहु नाडी ॥ ४ ॥ (अ.क्र. ३२२२) 

         नदी तरून पलीकडं जायचं असेल, तर माणसाकडं हिंमत असावी लागते. जीवनातील विविध प्रसंगांनाही हे लागू पडतं. पलीकडं तर जायचं आहे, पण धाडस नाही म्हणून जो मनुष्य अलीकडच्या काठावरच उभा असतो, त्यानं पाण्यात उडी मारू नये. कारण, त्यासाठी त्याचं मन तयार नसतं. पाण्यात उडी मारायचीच नाही, असा याचा अर्थ नाही. योग्य ती तयारी करून उडी जरूर मारायची. आपल्या अगोदर पाण्यात उडी मारून जे यशस्वी रीतीनं पैलतीराला पोचले आहेत, त्यांनी काय काय प्रयत्न केले, ते समजून घ्यावं आणि त्याच्या आधारे आपणही तसे प्रयत्न करून पैलतीराला पोचावं. अशी तयारी करायची नाही आणि पैलतीर आपल्या आवाक्यात आहे अशी समजूत करून घेऊन पाण्यात उडी मारायची, हा योग्य मार्ग नव्हे. परंतु त्याबरोबरच निष्क्रिय न होण्याचा सावधपणाही बाळगायचा. आळसात पडून रहायचं नाही. आळसानं आपल्यावर धाड घातली, तर तो आपली मोठी हानी करतो. तात्पर्य, जीवनाचा प्रवास करताना सर्व प्रकारे काळजी घेऊन आणि जागरूक राहून वाटचाल करावी.

डॉ. आ. ह. साळुंखे सर
(संग्राहक: संजय दत्तात्रय सोमवंशी पाटील)
९४२२३४५३६८

संत तुकारामांचे अभंगशतक ( प्रयत्न ६१ )

                       प्रयत्न  (६१)

         आणखी एका अभंगात त्यांनी प्रयत्नाचा गौरव करताना म्हटलं आहे,

६१ 
दधिमाझी लोणी जाणती सकळ । ते काढी निराळे जाणे मथन ॥ १ ॥ 
अग्नि काष्ठामाजी ऐसे जाणे जन मथिलियाविण कैसा जाळी ?॥ २ ॥
तुका म्हणे मुख मळीण दर्पणीं । उजळिल्यावाचूनि कैसे भासे ? ।। ३ ।।

(अभंग. क्र. २८०७) 

        दह्यामधे लोणी असतं, हे सर्वजण जाणतात. परंतु, ज्याला दही घुसळण्याचं ज्ञान असतं, तोच दह्यातून लोणी वेगळं काढून घेतो. लाकडामधे अग्नी असतो, हे लोकांना ठाऊक असतं. पण, दोन लाकडं एकमेकांवर घासली नाहीत, तर तो अग्नी निर्माण कसा होणार आणि ज्वलनाचं कार्य कसं करणार ? आरसा जर मळलेला असला, तर तो पुसला पाहिजे, स्वच्छ केला पाहिजे, तसं न करता त्याच्यामधे आपला चेहरा जसाच्या तसा कसा दिसू शकेल ? ही सगळी उदाहरणं तुकाराम आपल्याला प्रयत्नांची प्रेरणा देण्यासाठी देत आहेत. फळं मिळू शकतात, ती कित्येकदा आपल्या आसपासच असतात, आपल्या आवाक्यात असतात, परंतु ती मिळवण्यासाठी आवश्यक ती धडपड मात्र जरूर केली पाहिजे, हे त्यांना सांगायचं आहे.

डॉ. आ. ह. साळुंखे सर

(संग्राहक: संजय दत्तात्रय सोमवंशी पाटील)
९४२२३४५३६८

संत तुकारामांचे अभंगशतक ( प्रयत्न ६० )

        तुकाराम प्रयत्नवादाचे फार मोठे पुरस्कर्ते होते. त्यांनी आपल्या अनेक अभंगांतून दैनंदिन जीवनातील उदाहरणं देऊन प्रयत्नाचं महत्त्व आपल्या मनावर बिंबवलं आहे. एका अभंगात ते म्हणतात,

६० 
ओले मूळ भेदी खडकाचे अंग । आभ्यासासी सांग कार्यसिद्धि ।। १ ।। 
नव्हे ऐसे काही नाही अवघड नाही कईवाड तोंच वरि ॥ २ ॥ 
दोरें चिरा कापे पडिला कांचणी । अभ्यासें सेवनीं विष पडे ॥ ३ ॥
तुका म्हणे कैचा बैसण्यासी ठाव । जठरीं बाळा वाव एकाएकी ? ।। ४ ।।

(अभंग. क्र. १४००)

          ओलं मूळ खडकाचं अंग भेटू शकतं. अभ्यासामुळं, म्हणजेच सततच्या सरावामुळे माणसाला सर्व अंगांनी परिपूर्ण अशी कार्यसिद्धी प्राप्त होते. होऊ शकत नाही, इतकं अवघड जगात काही नाही. जोपर्यंत आपण एखादं कार्य करण्याचा निश्चय करीत नाही, तोपर्यंतच ते अवघड वाटतं. दोरा जर एखाद्या दगडावर विशिष्ट पद्धतीनं घासला, तर त्या घर्षणानं त्या दगडाला कच पडतो आणि तो दगडही कापला जातो. अभ्यासामुळं विषही पचनी पडू शकतं. गर्भस्थ लहान मूल आईच्या उदरात स्वतः साठी प्रयत्नपूर्वक जागा निर्माण करतं. या सर्व उदाहरणांतून तुकारामांनी प्रयत्नाचं व अभ्यासाचं महत्त्व जोरदारपणे मांडलं आहे.

डॉ. आ. ह. साळुंखे सर

(संग्राहक: संजय दत्तात्रय सोमवंशी पाटील)
९४२२३४५३६८

संत तुकारामांचे अभंगशतक ( प्रयत्न ५९ )

                     प्रयत्न

         जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक असतं, यावर तुकारामांनी अतिशय भर दिला होता. एका विख्यात अभंगात ते म्हणतात,

५९ 
साधूनी बचनाग खाती तोळा तोळा । आणिकाते डोळां न पाहवे ।। १ ।। 
साधूनी भुजंग धरितील हातीं । आणिके कापती देखोनिया ।। २ ।। 
असाध्य ते साध्य करिता सायास । कारण अभ्यास तुका म्हणे ।। ३ ।। 
(अभंग. क्र. २९८)

         सरावामुळं अगदी अशक्य वाटणाऱ्या गोष्टी देखील माणसाच्या आवाक्यात येतात. जालीम विष प्याल्यास माणसाला प्राण गमवावे लागतात. पण विषाचा थोडाथोडा अंश पिण्याचा सराव करत जाणारे लोक क्रमाक्रमानं तो अंश वाढवत नेऊन तोळा तोळा विष देखील पचवू लागतात.
          सराव न केलेल्या इतरांना त्यांचं विष पिण्याचं दृश्य डोळ्यांनी बघवतही नाही. विषारी सापाचा दंश माणसाच्या मृत्यूला कारणीभूत होतो, परंतु काही लोक सरावानं सापांना आपल्या हातात पकडतात. त्यांच्यासारखा सराव न केलेले इतर लोक ते दृश्य पाहूनच थरथर कापू लागतात. माणसाच्या जीवनात इतर क्षेत्रांत नेमकं असंच घडत असतं. एखादी गोष्ट असाध्य आहे, ती प्राप्त करणं कदापि शक्य होणार नाही, असं तिच्याविषयी वाटत असतं. परंतु एखादा प्रयत्नवादी मनुष्य खटपट करतो, धडपडतो, यातायात करतो आणि प्रारंभी असाध्य वाटणारी ती गोष्टही त्याच्या दृष्टीनं साध्य होते. हे घडू शकतं, ते अभ्यासामुळं, सरावामुळं, कठोर परिश्रमामुळं, प्रयत्नामुळं.

डॉ. आ. ह. साळुंखे सर

(संग्राहक: संजय दत्तात्रय सोमवंशी पाटील)
९४२२३४५३६८