Sunday, 18 September 2022

संत तुकारामांचे अभंगशतक ( शुद्धता ७४ )

                     (शुद्धता  ७४)

जगात ज्या गोष्टी वाईट असतात, ज्या गोष्टी आपल्याला आवडत नाहीत, त्या देखील आपल्यावर उपकार करतात, असा एक आगळा विचार तुकारामांनी एका अभंगात मांडला आहे. ते म्हणतात,

७४ 
वाइटाने भले हीनें दाविले चांगले ।।१।। एकाविण एका कैचे मोल होते फुका ।।२।।
विधे दाविले अमृत कडू गोड घाते हित ॥३॥
काळिमेने ज्योती दिवस कळो आला राती ॥४॥
उंच निंच गारा हिरा परिस मोहरा ॥५॥
तुका म्हणे भले ऐसे नष्टांनी कळले ॥६॥ 
(अभंग.क्र. १७२२)

जे वाईट आहे, त्याचा अनुभव घेतला, की जगात चांगलं काय आहे ते कळतं. म्हणजे वाईट गोष्टच आपल्याला चांगल्या गोष्टीची ओळख करून देते. जे हिणकस आहे, त्याच्याकडं पाहिलं, की दर्जेदार आणि अस्सल काय असतं, ते खऱ्या अर्थानं कळतं. जगात वाईट गोष्ट असल्याशिवाय चांगल्या गोष्टीची किंमत कळत नाही. ती गोष्ट अतिशय मौल्यवान असूनही फुकट मिळण्यासारखी आहे, असं लोकांना वाटतं. विषामुळे अमृताचं मोल कळतं, कडू पदार्थामुळं गोड पदार्थाची किंमत कळते घात करणारी गोष्ट अनुभवली, की हितकारक गोष्टीचं महत्त्व समजतं. काळिमा लावणाऱ्या गोष्टीमुळे ज्योतीचं खरं स्वरूप कळतं. रात्रीमुळे दिवसाचं महत्व समजतं. ओबडधोबड गारगोटीमुळं हिरा, परीस, मोहरा यांचं महत्त्व कळतं. अशा रीतीनं दुर्जनांमुळं सज्जनांचं महत्त्व कळतं.

डॉ. आ. ह. साळुंखे सर
(संग्राहक: संजय दत्तात्रय सोमवंशी पाटील)
९४२२३४५३६८

No comments:

Post a Comment