Friday, 2 September 2022

संत तुकारामांचे अभंगशतक (आघात ६६ )

                   आघात ६६

          अनेक प्रकारचे आघात पचविल्यानंतर माणसाचं व्यक्तिमत्व परिपक्व बनतं, हा आशय मांडताना जनावराला माणसाळविण्याच्या प्रक्रियेचा दाखला तुकारामांनी एका अभंगात फार सुरेख रीतीनं दिला आहे. एका अभंगात ते म्हणतात,

६६ 
पाठेळ करिता न साहावे वारा। साहेलिया ढोरा गोणी चाले ।। १ ।। 
आपणा आपण हे चि कसवटी । हर्षामर्थ पोटी विरो धावे ।। २ ।। 
नवनीत तोंवरी कडकडी लोणी । निश्चळ होऊनी राहे मग ॥ ३ ॥
तुका म्हणे जरी जग टाकी घाया । त्याच्या पडे पायां जन मग ॥ ४ ॥

(अभंग. क्र. २४०१)

एखादं ओझ्याचं जनावर जोपर्यंत नीट माणसाळलेलं नसतं, अगदी तरुण आणि अप्रशिक्षित असतं, तोपर्यंत त्याच्या ठिकाणी एक अनिर्बंध असा बेफामपणा असतो. त्याच्या पाठीवर ओझं ठेवण्याची गोष्ट दूरच, वाऱ्याचा स्पर्श झाला तरी ते थयथयाट करू लागतं. वाराही सहन न होण्याइतका त्याचा स्वभाव त्यावेळी उद्दाम असतो. पण तेच जनावर एकदा का नीट माणसाळलं, की मग मात्र त्याच्या पाठीवर मालानं भरलेल्या गोण्या टाकल्या, तरी ते यत्किंचितही प्रतिकार न करता, कसलीही खळखळ न करता निमूटपणे त्या गोण्या वाहून नेतं. जणू काही दोन ध्रुवांमधे असावं, इतकं अंतर त्याच्या वागण्यात निर्माण होतं. एखाद्या खोडाला जेव्हा पहिल्यांदा बैलगाडी, कुळव, नांगर वगैरे औताला जुंपलं जातं, तेव्हा तो प्रसंग एका परीनं शेतकऱ्याची परीक्षा घेणाराच असतो. तो खोड आपल्या ताकदीच्या जोरावर आपल्या जोडीच्या बैलालाही हवं तिकडं खेचून बैलगाडी वा औत उधळून टाकतो. एखादा अपघात घडवितो. पण हळूहळू तो रुळतो आणि पुढं खांद्याला घट्टे पडल्यानंतर मानेवर कितीही जड जू ठेवलं, तरी कुठलाही गोंधळ न घालता शांतपणे शेतकऱ्याला सहकार्य करतो. हा शेतकऱ्याच्या जीवनात येणारा नेहमीचा अनुभव आहे.

           जीवनाचा प्रवास करणाऱ्या प्रत्येक माणसानं या घटनेवरून बोध घ्यावा, असं तुकारामांना वाटतं. तरुण वयात मनामधे एक प्रकारचं उतावळेपण असतं. कोणालाही न जुमानण्याची, कोणाचंही काही न ऐकण्याची, स्वच्छंदी आणि प्रसंगी उद्धट अशी मनोवृत्ती माणसाच्या ठिकाणी असते. ज्याला आपलं जीवन यशस्वी व्हावं असं वाटतं, त्यानं आपल्या अवखळपणाला आवर घातला पाहिजे. स्वतःच स्वतःला काही कसोटी लावली पाहिजे. काही नियमांत बांधून घेतलं पाहिजे. आपल्या ठिकाणी वादळाप्रमाणं घोंघावणारे हर्ष, क्रोम यांसारखे विकार आपल्या आतच विरू दिले पाहिजेत. त्यांना योग्य पद्धतीनं नियंत्रित केलं पाहिजे. थोडक्यात म्हणजे आपल्या भावभावना, इच्छा आकांक्षा यांना योग्य वळण लावलं पाहिजे. त्यांच्यावर संयम ठेवला पाहिजे.
             तरुणपणात विकारांच्या आहारी जाणारा मनुष्य आणि क्रमशः स्वतःवर विजय मिळवून परिपक्व झालेला मनुष्य यांच्यामधे असलेलं अंतर स्पष्ट करण्यासाठी तुकारामांनी लोण्याचं उदाहरण दिलं आहे. दैनंदिन जीवनातील अत्यंत सामान्य घटनेच्या सूक्ष्म निरीक्षणातून तुकाराम कवित्वाची कोवळी पालवी कशी निर्माण करीत असत, याचा हा उत्तम पुरावा होय. लोणी कढविण्यासाठी त्याला उष्णता दिली, की जोपर्यंत त्याचा 'लोणीपणा' संपत नाही, तोपर्यंत ते कडकडतं. या रूपानं ते जणू काही आपली उच्छृंखलता प्रकट करतं. पण एकदा का त्याचं तुपात रूपांतर झालं, की मग ते निशळ होऊन राहतं, जणू काही शांत, निर्विकार बनतं. त्याचा कच्चेपणा लोप पावतो. जो दगड टाकीचे घाव सोसूनही टिकून राहतो, त्याला देव मानून लोक त्याच्या पाया पडतात.

डॉ. आ. ह. साळुंखे सर

(संग्राहक: संजय दत्तात्रय सोमवंशी पाटील)
९४२२३४५३६८

No comments:

Post a Comment