Friday, 9 December 2016

संत तुकारामांचे अभंगशतक (संत १२)

अशा व्यापक आचारविचारांच्या संताची अवहेलना करायची आणि धर्माच्या नावाखाली देवाची पूजा करायची, हा खरा धर्म नव्हे, असं तुकारामांना वाटत असे, ते म्हणतात,

१२
संताचा अतिक्रम | देवपूजा तो अधर्म ||१||
येती दगड तैसे वरी | मंत्रपुष्पे देवा शिरीं ||२||
अतीतासि गाळी | देवा नैवेद्यासी पोळी ||३||
तुका म्हणे देवा | ताडण भेदकांची सेवा ||४||
                           (अभंग क्र. २७९)

      संताचं उल्लंघन करुन देवपूजा करणं, हा अधर्म होय. अशी पूजा करताना म्हटलेले मंत्र, वाहिलेली फुलं ही दगड पडावेत तसे देवाच्या मस्तकावर येतात. आपल्याकडं आलेल्या अतिथीला शिवी द्यायची आणि नैवेद्याची पोळी घेऊन जायचं, हाही तुकारामांना अधर्म वाटतो. माणसामाणसांत भेदभाव करणाऱ्यांनी केलेली देवाची सेवा ही देवाच्या दृष्टीनं मारहाण असते. कारण, खरा देव मूर्ती वगैरेंमधे नसतो, तर सज्जनांच्या ठायी असतो.

(संग्राहक: संजय दत्तात्रय सोमवंशी-पाटील)
९४२२३४५३६८

Thursday, 8 December 2016

संत तुकारामांचे अभंगशतक (संत ११)

    जो सर्व प्राणिमात्रांच्या कल्याणाची काळजी वाहतो, तोच संत या नावाला साजेसा असतो, हे सांगताना तुकाराम महाराज म्हणतात,

११
देवाची पूजा हे भूताचे पाळण | मत्सर तो सीण बहुतांचा ||१||
रुसावे फुगावे आपुलियावरि | उरला तो हरि सकळ ही ||२||
तुका म्हणे संतपण या चि नावे | जरि होय जीव सकळांचा ||३||
                  (अभंग क्र. ३८५४)

प्राणिमात्रांचं पालन करणं, हीच देवाची पूजा होय. याउलट इतरांचा मत्सर करणं, हा आनंद नसून शीणच होय. माणसाला जे काही रुसायचं फुगायचं असेल, ते त्यानं स्वतःच्या बाबतीत करावं, स्वतःचे दोष दूर करण्यासाठी स्वतःविरुद्ध तक्रार करावी, स्वतःविरुद्ध बंड करावं, पण इतरांशी मात्र आपुलकीनं वागावं. मग आपल्या बाहेरचं सर्व जग म्हणजे ईश्वर आहे, असा अनुभव घेता येतो. इतर सर्वांचा जीव म्हणजे आपणच, त्यांचा जीव हा आपलाच जीव, अशी भावना बनली, असं वर्तन घडलं, तरच संत हे नाव धारण करण्यास तो मनुष्य पात्र ठरतो.

(संग्राहक: संजय दत्तात्रय सोमवंशी-पाटील)
९४२२३४५३६८

Tuesday, 6 December 2016

संत तुकारामांचे अभंगशतक (संत १०)

संत

आपल्या अंतःकरणातील कळवळ्यापोटी संत कसे वागतात, ते उपमांद्वारे स्पष्ट करताना तुकाराम म्हणतात,

अभंग १०

अर्भकाचे साटी | पंतें हाती धरिली पाटी ||१||
तैसे संत जगीं | क्रिया करुनी दाविती अंगीं ||२||
बालकाचे चाली | माता जाणुनि पाउल घाली ||३||
तुका म्हणे नाव | जनासाठी उदकीं ठाव ||४||

                      (अभंग क्र. ४०८२)

लोकांच्या कल्याणासाठी संत नेहमी चांगल्या वागणुकीचा उपदेश करीत असतात. परंतु, हा उपदेश करण्याचा अधिकार त्यांनी स्वतःच्या चारित्र्यानं प्राप्त केलेला असतो. लोकांना जे सांगायचं, ते आपण आधी करुन दाखवायचं, ही त्यांच्या जगण्याची रीत असते. मुलानं हातात पाटी कशी धरावी, पेन्सिलीनं अक्षर कसं गिरवावं, हे त्याला शिकवताना शिक्षक आधी स्वतःच्या हातात पाटी घेतो. आई मुलाला चालायला शिकवताना स्वतः एक एक पाऊल चालून त्याला पावलं टाकायला शिकविते. नाव स्वतः पाण्यात वावरते, ती स्वतःसाठी नव्हे, तर लोकांना पैलतीराला नेण्यासाठी. संतांचं कार्य हे असंच लोकांच्या कल्याणासाठी असतं.

(संग्राहक: संजय दत्तात्रय सोमवंशी-पाटील)
                              ९४२२३४५३६४

Monday, 5 December 2016

संत तुकारामांचे अभंगशतक (संत ९)

संत

तुकाराम संतांविषयीची आपल्या मनातील विलक्षण ओढ व्यक्त करताना वारंवार त्यांच्या प्रेमाची तुलना आईच्या वात्सल्याशी करतात. याचं कारणही स्पष्ट आहे. संतांच्या अंतःकरणात सर्वसामान्य लोकांविषयी आईच्या वात्सल्यासारखीच करुणा असते. सावाभाविकच, माणूस सुखदुःखाच्या प्रसंगी जसा आईकडं धाव घेतो, तशीच धाव माणसानं संतांकडंही घ्यावी, असं तुकारामांना वाटत असे. या उत्कट भावनेतूनच त्यांनी संतांविषयी अनेक अभंग लिहिले आहेत.
     संत करुणाशील असतात, हे खरंच. परंतु जगात अनेकदा संतत्वाचा मुखवटा धारण करणारे लोकही असतात. अशा लोकांपासून संतांचं वेगळेपण कळावं, म्हणून तुकारामांनी संतांची एक अचूक व्याख्याच आपल्या हाती दिली आहे. ते म्हणतात,

अभंग

जे का रंजले गांजले | त्यासि म्हणे जो आपुले ||१||
तो चि साधु ओळखावा | देव तेथे चि जाणावा ||२||
मृदु सबाह्य नवनीत | तैसे सज्जनाचे चित्त ||३||
ज्यासि आपंगिता नाही | त्यासि धरी जो ह्रदयीं ||४||
दया करणे जे पुत्रासी | ते चि दासा आणि दासी ||५||
तुका म्हणे सांगू किती ? | तो चि भगवंताची मूर्ती ||६||
           (अभंग क्र. ३४७)

        जगात अनेक माणसं दुःखीकष्टी असतात. प्रतिकूल परिस्थितीच्या रेट्यानं जेरीला आलेली असतात. आपल्या सहवासात येणारा असाच एखादा माणूस परिस्थितीनं रंजीस आलेला असतो, गांजलेला-त्रासलेला असतो. समाजात अनेक माणसं या मेटाकुटीला आलेल्या व्यक्तीची उपेक्षा करतात, त्यांच्याकडं दुर्लक्ष करतात. परंतु एखादा माणूस त्या दुःखी माणसाला जवळ करतो. तो आपला माणूस आहे, असं मानून आपलेपणानं त्याचं दुःख दूर करण्याचा प्रयत्न करतो. जो अशा दुःखी माणसाच्या बाबतीत अशी आत्मीयता दाखवतो, तोच संत वा साधू आहे, हे ओळखावं. अशा माणसाला केवळ साधू मानूनच तुकाराम थांबत नाहीत, तर देव देखील अशा माणसाच्या ठिकाणीच असतो, असं ते म्हणतात. देवाची प्राप्ती करायची असेल, तर त्याचा शोध अशा संतांच्या सहवासात घेतला पाहिजे, हा तुकारामांचा उपदेश आपण नीट समजून घेतला पाहिजे. या संतसज्जनांचं मन करुणेमुळं किती हळुवार झालेलं असतं, ते सांगताना त्यांनी अंतर्बाह्य मऊ असलेल्या लोण्याची उपमा दिली आहे. एखादा माणूस निराधार, अनाथ असतो. त्याला सांभाळणारा कोणी नसतो. परंतु, जो खराखुरा संत असतो, तो त्या निराधार माणसाला आपल्या ह्रदयाशी धरतो. आपल्या पुत्रावर जे प्रेम करायचं, तेच आपले दास आणि दासी यांच्यावरही करायचं, अशा विशाल अंतःकरणाचा मनुष्य हा खरा संत म्हटला जातो. अशा व्यक्तीचं मोठेपण पुनःपुन्हा सांगावं, असं तुकारामांना वाटतं. असा मनुष्य म्हणजे साक्षात भगवंताची मूर्ती होय, हे तुम्हांला किती वेळा सांगू, असा प्रश्नच त्यांनी लोकांना विचारला आहे. खरं तर हा प्रश्न आपल्याला पण लागू आहे, हे आपण अतिशय गंभीरपणानं समजून घेतलं पाहिजे.

(संग्राहक:  संजय दत्तात्रय सोमवंशी-पाटील)

९४२२३४५३६८

Saturday, 3 December 2016

संत तुकारामांचे अभंगशतक (आईवडील ८)

तुकारामांनी आईच्या वात्सल्याप्रमाणंच वडिलांच्या प्रेमाचाही मोठा गौरव केला आहे. ते म्हणतात,


बाप करी जोडी लेकराचे ओढी | आपुली करवंडी वाळवूनी ||१||
एकाएकी केला मिरासीचा धनी | कडिये वागवूनी भार खांदीं ||२||
लेवऊनी पाहे डोळां अळंकार | ठेवा दावी थोर करुनिया ||३||
तुका म्हणे नेदी गांजूं आणिकांसी | उदार जीवासी आपुलिया ||४||
                   (अभंग क्र.३२६८)

बाप लेकराच्या प्रेमापोटी संपत्ती जमवत राहतो. त्यासाठी कष्ट करतो, पोट खनपटीला जाईपर्यंत उपासमार सहन करतो. त्याला कडेवर घेतो, खांद्यावर बसवतो आणि मग एकदम आपल्या सगळ्या वैभवाचा, साधनसामग्रीचा मालक बनवून टाकतो. आपल्या कष्टातून मिळवलेलं सगळं त्याला आयतं देतो. त्याच्या अंगावर दागिने घालतो आणि आपल्या डोळ्यांनी ते दृश्य पाहून त्याला डोळ्यांचं पारणं फिटल्यासारखं समाधान होतं. आपल्याकडच्या संपत्तीचं भांडार जेवढं वाढवता येईल, तेवढं वाढवून तो ते त्याला दाखवतो, त्याच्या स्वाधीन करतो. तो स्वतःच्या जीवावर उदार होतो, आपल्या प्राणांची पर्वा करीत नाही, पण दुसर्‍या कोणाला आपल्या लेकराच्या वाटेला जाऊ देत नाही, त्याचा छळ करु देत नाही.
        आईवडील आणि मुलं यांच्या या अतिशय जिव्हाळ्याच्या नात्याचा विचार करताना दोन पैलूंकडे आपण सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे. आपण मुलांसाठी इतकं सारं केलं आहे, म्हणून त्यांनी सदैव आपल्या मुठीत राहिलं पाहिजे, आपण म्हणू ते ऐकलं पाहिजे, आपण सांगू तसंच वागलं पाहिजे, असा हट्ट धरुन आईवडिलांनी मुलांचं स्वातंत्र्य कदापि हिरावून घेता कामा नये. त्यांना पंख द्यायचे, ते पंख बळकट करण्यासाठी त्यांना सर्व प्रकारची मदतही करायची, परंतु त्याबरोबरच त्यांना उड्डाणाचं स्वातंत्र्यही द्यायचं, तरच आपण त्यांच्यासाठी घेतलेल्या कष्टांचं खऱ्या अर्थाने चीज होतं.
       दुसऱ्या बाजूनं मुलांनीही आईवडिलांनी आपल्यासाठी जे काही केलं आहे त्याची जाण सदैव ठेवली पाहिजे. त्यांच्याविषयी अपार कृतज्ञता बाळगली पाहिजे. कृतज्ञता हा माणसाच्या काळजाचा सुगंध असतो, असं म्हणतात. मुलांनी आईवडिलांच्या बाबतीत हे वचन सदैव स्मरणात ठेवावं. काही बाबतीत त्यांच्याशी मतभेद होऊ शकतात आणि तसे मतभेद होणं हा काही त्यांचा अनादर नव्हे. परंतु मतभेद होणं ही गोष्ट वेगळी आणि कृतघ्न बनणं ही गोष्ट वेगळी. आपल्या जीवनाचे निर्णय प्रसंगी त्यांच्या विरोधात जाऊनही घ्यावे लागले, तर ते जरुर घ्यावेत. परंतु तसं करताना त्यांनी आपल्यासाठी जे काही केलेलं असतं, त्यासाठी आयुष्यभर त्यांच्याविषयी कृतज्ञ मात्र जरुर रहावं.

(संग्राहक:- संजय दत्तात्रय सोमवंशी-पाटील ९४२२३४५३६८)

Friday, 2 December 2016

संत तुकारामांचे अभंगशतक (आईवडील ७)

गर्भवती स्त्रीला होणारं सोलीव सुख तिच्या डोहाळ्यांमधून कसं प्रकट होतं, त्याचं भावस्पर्शी वर्णन तुकारामांनी एका अभंगात केलं आहे. ते म्हणतात,


आवडी येते गुणें | कळो, चिन्हे उमटती ||१||
पोटीचे ओठीं उभे राहे | चित्त साहे मनासी ||२||
डोहोळियाची भूक गर्भा | ताटीं प्रभा प्रतिबिंबे ||३||
तुका म्हणे मानोन घ्यावे | वाटे खावे वाटते ||४||

                            (अभंग क्र. ३२७६)

       गर्भवतीच्या वागण्यातून जे गुण प्रकट होतात, त्यावरुन तिला काय आवडतं, म्हणजेच तिला कोणते डोहाळे लागले आहेत, ते कळून येतं. तिच्या अंगी त्याची चिन्ह उमटतात. तिच्या पोटात तिची आणि गर्भाची जी इच्छा निर्माण झालेली असते, ती तिच्या ओठांवर येते, ती आपल्या तोंडानं ती इच्छा बोलून दाखवते. तिच्या मनात जी इच्छा उद्भवलेली असते, ती स्पष्टपणे बोलून दाखविण्यास तिचं चित्त तिच्या मनाला साहाय्य करतं. तिची चिंतनशक्ती मनातील इच्छेला शब्दरुप देते. गर्भाची जी भूक असते, जी इच्छा असते, ती डोहाळ्याच्या रुपानं व्यक्त होते. चंद्राच्या वा सूर्याच्या बिंबाची प्रभा पाण्यानं भरलेल्या ताटात प्रतिबिंबित व्हावी, तशीच गर्भाची इच्छा आईच्या डोहाळ्यामधे प्रतिबिंबित होते. म्हणूनच, गर्भवतीला जे काही खावंसं वाटतं, ते तिनं विनासंकोच मागून घ्यावं, असं तुकाराम महाराज म्हणतात. अर्थात, घरच्या लोकांनीही तिची इच्छा पूर्ण करावी, हे ओघानंच आलं.

(संग्राहक:- संजय दत्तात्रय सोमवंशी-पाटील ९४२२३४५३६८)

Thursday, 1 December 2016

संत तुकारामांचे अभंगशतक (आईवडील ५,६)

          संतांबरोबरचं आपलं जिव्हाळ्याचं नातं स्पष्ट करताना तुकारामांना अनेकदा मायलेकरांच्या नात्याची आठवण होते. ते म्हणतात,

मातेचिये चित्तीं | अवघी बाळकाची व्याप्ति ||१||
देह विसरे आपुला | जवळीं घेता सीण गेला ||२||
दावी प्रेमभाते | आणि अंगावरि चढते ||३||
तुका संतांपुढे | पायीं झोंबे लाडें कोडें ||४||
                          (अभंग क्र. २७७६)

लेकराचे हित | वाहे माउलीचे चित्त ||१||
ऐसी कळवळ्याची जाती | करी लाभेंविण प्रीती ||२||
पोटीं भार वाहे | त्याचे सर्वस्व ही साहे ||३||
तुका म्हणे माझे | तैसे तुम्हा संतां ओझे ||४||

                     (अभंग क्र. १७४१)

आईच्या मनामधे इथून-तिथून बाळ व्यापून राहते. त्याचा विचार करताना ती आपलं देहभान विसरुन जाते. त्याला जवळ घेतल्यावर तिचा शीण जातो. तिनं मायेनं त्याला खाऊ दाखवला,  की ते तिच्या अंगावर झेपावतं. आपण या मुलाप्रमाणं संतांच्या पायांना लाडानं, कोडकौतुक करुन घेण्याच्या इच्छेनं झोंबतो, असं तुकाराम म्हणतात.
   लेकराचं हित व्हावं, हाच विचार माउलीच्या मनामधे असतो. तिच्या मनातील या कळवळ्याची जातकुळी अक्षरशः जगावेगळी असते. कसल्याही फायद्याची, परतफेडीची अपेक्षा न बाळगता प्रेम करणं म्हणजे काय, याचं आईच्या प्रेमाइतकं दुसरं उत्तम उदाहरण असू शकत नाही. आधी ती आपल्या उदरात त्याचा भार वाहते आणि नंतर आयुष्यभर त्याचं सर्व काही सहन करते. तुकारामांच्या दृष्टीनं संत हे आईसारखे असल्यामुळं ते त्यांना आपला भार वाहण्याची विनंती करीत आहेत.