Saturday, 31 December 2016

संत तुकारामांचे अभंगशतक (हितासाठी उपदेश २५)

संत हा जो उपदेश करतात, त्याचे आणखी काही पैलू तुकारामांनी एका अभंगात मांडले आहेत. ते म्हणतात :

२५
अधिकार तैसा दावियेला मार्ग | चालता हे मग कळो येते ||१||
जाळू नये नाव पावलेनि पार | मागील आधार बहुतांचा ||२||
तुका म्हणे रोग वैद्याचे अंगीं | नाही, करी जगीं उपकार ||३||
                         (अभंग क्र. ५३८)

संत सर्वांनाच उपदेश करतात, परंतु प्रत्येकाला उपदेश करण्याची त्यांची पद्धत वेगळी असते. ज्याचा जसा अधिकार असतो, जशी पात्रता असते, त्यानुसार ते त्याला कोणत्या मार्गानं जावं, त्याचा उपदेश करतात. माणूस जेव्हा त्या मार्गावरून प्रत्यक्ष चालतो, तेव्हा त्याला हा उपदेश उपयोगी पडतो. त्या वेळी त्याला या उपदेशाचं महत्त्व कळून येतं. उपदेशामुळं ज्याचं कल्याण झालेलं असतं, त्यानं संतांनी दाखविलेला मार्ग मोडू नये, त्याचं नुकसान करू नये. आपण नावेतून पलीकडं गेलो, तर पैलतीराला गेल्याच्या धुंदीत नाव जाळून टाकण्याचा कृतघ्नपणा करू नये. कारण, ती आपल्या मागून येणार्‍या खूप लोकांचा आधार असते. संत या नावेसारखेच असतात. आपल्याला त्यांच्या उपदेशाचा लाभ झाला, आता त्यांची गरज राहिली नाही, असं मानून त्यांना हानी पोचवू नये. कारण, ते इतर अनेकांचा आधार होत असतात. खरं तर संत हे एखाद्या वैद्यासारखे असतात. राेगी माणसाच्या अंगात रोग असतो. तो रोग काही वैद्याच्या अंगात नसतो. तरी देखील वैद्य त्या रोगाचा अभ्यास करतो, त्याचं निदान करतो आणि त्याच्यावर उपचार करतो. संतांचं कार्य हे असंच असतं. स्वतः त्यांच्या जीवनात जे दुःख नसतं, ते इतरांच्या जीवनातील दुःख त्यांना दिसत असतं आणि ते दूर करण्यासाठी त्यांची सगळी धडपड असते.

(संग्राहक: संजय दत्तात्रय सोमवंशी-पाटील)
९४२२३४५३६८

Friday, 30 December 2016

संत तुकारामांचे अभंगशतक (हितासाठी उपदेश २४)

    आता आपल्या ध्यानात येईल, की तुकाराम आपल्या या उद्गारांमधून एकूण सर्व संतांच्या जीवितकार्याचं स्वरूपच स्पष्ट करीत आहेत. सज्जन लोक सर्वसामान्य लोकांना सन्मार्गाचा जो उपदेश करतात,  त्यातून त्यांना स्वतःसाठी काही फायदा मिळवायचा नसतो, तर दुःखानी त्रासलेल्या लोकांचं दुःख दूर व्हावं ही तळमळच त्यामागं असते.
    संतांचं हे वागणं नेमकं कसं असतं, हे स्पष्ट करताना तुकाराम म्हणतात :

२४

काय वाणू आता ? न पुरे हे वाणी | मस्तक चरणीं ठेवीतसे ||१||
थोरीव सांडिली आपुली परिसें | नेणे सिवो कैसे लोखंडासी ||२||
जगाच्या कल्याणा संतांच्या विभूति | देह कष्टविती उपकारें ||३||
भूतांची दया हे भांडवल संतां | आपुली ममता नाही देहीं ||४||
तुका म्हणे सुख पराविया सुखें | अमृत हे मुखें स्रवतसे ||५||
                (अभंग क्र. १५१०)

संतांकडं परोपकाराची जी वृत्ती असते तिचं वर्णन करणंही अवघड आहे, ते वर्णन करण्यासाठी आपल्याकडं शब्द नाहीत, असं तुकाराम अगदी भारावलेल्या मनानं म्हणत आहेत. शब्दांना माघार घ्यावी लागत असल्यामुळं आपण संतांच्या चरणांवर मस्तक ठेऊन आपली कृतज्ञता व्यक्त करीत आहोत, असं ते म्हणत आहेत. संतांच्या उदात्त कार्यपद्धतीचं रूप स्पष्ट करण्यासाठी ते एक दृष्टांत देत आहेत. आपल्या स्पर्शानं लोखंडाचं सोनं करावं, असं परिसाला वाटत असतं. आपण लोखंडाला शिवण्याचा कमीपणा कसा पत्करायचा, असं तो मानत नाही. आपला मोठेपणा बाजूला ठेवून तो स्वतःहून लोखंडाला स्पर्श करतो. संत देखील नेमकं असंच वागतात. त्यांचं सगळं वैभव, व्यक्तिमत्त्व, कर्तत्व हे लोकांच्या कल्याणासाठी असतं, ते त्यांच्यावर उपकार करण्याच्या कामातच आपलं शरीर राबवितात. प्राणिमात्रांवर दया दाखवणं, हेच त्यांचं भांडवल असतं. ते स्वतःच्या देहाची, सुखाची काळजी करीत नसतात. त्यांना दुसऱ्यांच्या सुखानं सुख मिळत असतं आणि त्या इतर लोकांना सुख मिळावं, म्हणूनच त्यांच्या मुखातून उपदेशाचं अमृत स्रवत असतं, प्रकट होत असतं.

(संग्राहक: संजय दत्तात्रय सोमवंशी-पाटील)
९४२२३४५३६८

Saturday, 24 December 2016

संत तुकारामांचे अभंगशतक (हितासाठी उपदेश २३)

    परोपकार करू इच्छिणाऱ्या संतांच्या मनातील तळमळ स्पष्ट करण्यासाठी तुकारामांनी आणखी एका अभंगात कडूलिंबाचं उदाहरण दिलं आहे. ते म्हणतात:

२३

पुढिलिया सुखें निंब देता भले ! बहुत वारले होय दु:ख !!१!!
हे तो वर्म असे माउलीचे हाती ! हाणी मारी प्रीती हितासाठी !!२!!
खेळता विसरे भूक तान घर ! धरूनिया कर आणी बळें !!३!!
तुका म्हणे पाळी तोंडीचिया घासें ! उदार सर्वस्वें सर्वकाळ !!४!!
                              (अभंग क्र. २१४८)

        आजारी माणसाला औषध म्हणून कडूलिंब देणं, हे त्याच्या पुढच्या सुखाच्या दृष्टीने सुखकारक असतं. त्यामुळं त्याचं खूपसं दु:ख दूर होतं. मुलाच्या बाबतीत आईचं जे वागणं असतं, त्यामधून हे रहस्य नेमकेपणानं व्यक्त होतं. ती प्रसंगी त्याला मारहाण करते, पण हे तिचं त्याच्यावरचं प्रेमच असतं, ती हे त्याच्या हितासाठी करत असते. मूल खेळण्यात रममाण झालं, की ते तहान-भूक विसरून जातं, त्याला घरी येण्याचं भानही रहात नाही. मग आई जबरदस्तीनं त्याचा हात धरून त्याला घरी आणते. ती आपल्या तोंडचा घास भरवून त्याचं पोषण करते. ती सर्व प्रकारे सदैव त्याच्या बाबतीत उदारच असते. आई जशी मुलाच्या हितासाठी त्याच्यावर अशी जबरदस्ती करते, तशीच संतही दु:खी-कष्टी लोकांना काहीशा जबरदस्तीनं सन्मार्गावर आणण्यासाठी उपदेश करतात.

(संग्राहक संजय दत्तात्रय सोमवंशी-पाटील)
९४२२३४५३६८

Thursday, 22 December 2016

संत तुकारामांचे अभंगशतक (हितासाठी उपदेश २२)

       तुकाराम इथं आपल्या उपदेश करण्याच्या कृतीचं एक प्रकारे समर्थन करीत आहेत, आपलं मन मोकळं करीत आहेत.
            आणखी एका अभंगात ते म्हणतात,
२२
बोलिलो ते काही तुमचिया हिता ! वचन नेणता क्षमा कीजे ||१||
वाट दावी तया न लगे रुसावे ! अतित्याई जीवें नाश पावे ||२||
निंब दिला रोग तुटाया अंतरी | पोभाळिता वरि आत चरे ||३||
तुका म्हणे हित देखण्यासि कळे | पडती आंधळे कूपा माजी ||४||
                          (अभंग क्र. १३१)

          आपण जे काही बोललो, जो काही उपदेश केला, ते सगळं तुमच्या हितासाठी होतं ; असं तुकाराम अगदी कळवळून सांगत आहेत. आपण नकळत काही दुखावणारं बोललो असेल तर क्षमा करा, असं त्यांनी अगदी विनम्रतेनं म्हटलं आहे. चुकीच्या वाटेनं चाललेल्या माणसाला कधी कधी कठोरपणानं चार गोष्टी सांगाव्या लागतात. सांगणार्‍यानं त्या कितीही सद्भावनेनं सांगितल्या असल्या, तरी ऐकणार्‍याला ते रुचतंच असं नाही. सज्जन लोक मात्र अशा लोकांनाही प्रसंगी आंजारुन-गोंजारुन,  गोड बोलून अथवा क्षमा मागूनही पुनःपुन्हा समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात. कारण जो करुणेपोटी इतरांना चांगली वाट दाखवू इच्छीत असतो, त्यानं त्यांच्यावर रुसून चालत नाही. इतरांनीही त्याच्यावर रुसू नये. आपल्या हिताचा उपदेश नाकारण्याचा आततायीपणा केला, तर जीवाचा नाश होतो. शरीरात असलेला रोग नाहीसा व्हावा, म्हणून कोणी औषध म्हणून कडूलिंब दिला, तर रोगी माणसानं तो आपल्या हितासाठी आपल्या पोटात घेतला पाहिजे. तो नुसता वरवर चोळला, तर आतल्या रोगाची वाढच होत राहणार. उपदेशाचंही तसंच आहे. तो वरवर ऐकून सोडून दिला, तर माणसाचं दुःख दूर होऊ शकत नाही. जो डोळस असतो, समंजस असतो, विवेकी असतो, त्याला आपलं हित बरोबर कळतं. परंतु ज्यांच्याकडं डोळसपणा नसतो असे आंधळे लोक विहिरीत पडतात, म्हणजेच आपली हानी करून घेतात.


(संग्राहक:  संजय दत्तात्रय सोमवंशी-पाटील)
९४२२३४५३६८

Wednesday, 21 December 2016

संत तुकारामांचे अभंगशतक (हितासाठी उपदेश २१)

      ज्या लोकांच्या मनात इतरांविषयी कळवळा असतो आणि त्यांचं हित व्हावं अशी उत्कट इच्छा असते, ते लोक इतरांना जगण्याची योग्य वाट दाखवितात. असं करण्यामागं त्यांचा काही स्वार्थ नसतो. ते केवळ करुणेपोटीच लोकांना उपदेश करत असतात. अशा प्रकारच्या उपदेशाविषयी तुकारामांनी अनेक अभंग लिहिले आहेत. एका अभंगात ते म्हणतात :

२१
उपकारासाटी बोलो हे उपाय | येणेविण काय आम्हा चाड ? ||१||
बुडता हे जन न देखवे डोळां | येतो कळवळा म्हणउनि ||२||
तुका म्हणे माझे देखतिल डोळे | भोग देते वेळे येईल कळो ||३||
                    (अभंग क्र. ९४८)

     तुकाराम महाराज म्हणतात : आम्ही उपकार करण्याच्या इच्छेनं हे उपाय सांगत आहोत. खरं रहायचं, तर याविना आमचं काय अडलं आहे ? लोक बुडत आहेत, त्यांचं जीवन दुःखान्त उद्ध्वस्त होत आहे, ते मला डोळ्यांनी बघवत नाही, म्हणून माझ्या मनात कळवळा निर्माण होत आहे. यांच्यावर दुःख भोगण्याची वेळ येईल, तेव्हा त्यांना हे कळेल. त्या वेळीही माझे डोळे त्यांच्याकडं कळवळ्यानंच पाहतील

(संग्राहक : संजय दत्तात्रय सोमवंशी-पाटील)
९४२२३४५३६८

Monday, 19 December 2016

संत तुकारामांचे अभंगशतक (संगत २०)

२०
देव होसी तरी आणिकांते करिसी | संदेह येविशी करणे न लगे ||१||
दुष्ट होसी तरी आणिकांते करिसी | संदेह येविशी  करणे न लगे ||२||
तुका म्हणे जे दर्पणीं बिंबले | ते तया बाणले निश्चयेसी ||३||
                   (अभंग क्र. ११२८)

तुकारामांनी प्रस्तुत अभंगात संगतीचा आणखी एक पैलू सांगितला आहे. दुसऱ्याच्या संगतीत आपल्यावर काय परिणाम होतात, हे जसं त्यांनी नोंदवलं आहे, तसंच आपल्या संगतीचा इतरांवर काय परिणाम होतो, तेही त्यांनी नोंदविलं आहे. त्यांनी इथं वापरलेला 'देव' हा शब्द सद्गुणांनी युक्त मनुष्य असा व्यापक अर्थ देणारा आहे. तुकाराम या अभंगात जणू काही आपल्या प्रत्येकाशी बोलत आहेत. तू जर स्वतः सद्गुणांनी युक्त सज्जन असशील तर आपल्या सहवासात येणाऱ्या इतरांना तू सज्जन बनवशील, याविषयी शंका बाळगण्याचं कारण नाही, असं ते आपल्याला म्हणत आहेत. याउलट आपण दुष्ट असू, तर इतरांनाही दुष्ट बनवू, याविषयीही शंका बाळगण्याचं कारण नाही, असं ते स्पष्टपणानं सांगत आहेत. जो जसा असतो, त्याचं प्रतिबिंबही आरशामध्ये नेमकं तसंच पडतं, त्याच पद्धतीनं माणूस जसा असतो, तसाच त्याच्या संगतीचा परिणाम होतो. म्हणून, इतरांना सद्गुणी बनवावं अशी आपली इच्छा असल्यास आधी आपण सद्गुणी असणं महत्वाचं आहे, असं तुकाराम सांगत आहेत.

(संग्राहक: संजय दत्तात्रय सोमवंशी-पाटील)
९४२२३४५३६८

Sunday, 18 December 2016

संत तुकारामांचे अभंगशतक (संगत १९)

१९
चित्ता मिळे त्याचा संग रुचिकर | क्षोभविता दूर तो चि भले ||१||
ऐसी परंपरा आलीसे चालत | भलत्याची नीत त्यागावरी ||२||
हो का पिता पुत्र बंधु कोणी तरि | विजाति संग्रही धरू नये ||३||
तुका म्हणे सत्य पाळावे वचन | अन्यथा आपण करू नये ||४||
                      (अभंग क्र. ४१०२)

       तुकाराम सामाजिक व्यवहारांचं सूक्ष्म विश्लेषण करण्याच्या बाबतीत अतिशय कुशल होते. त्यामुळे ते एकाच विषयाचे अनेक पैलू ध्यानात घेत असत. प्रस्तुत अभंगात त्यांनी संगतीचा एक वेगळाच पैलू शब्दबद्ध केला आहे. ज्याचं मन आपल्या मनाशी जुळतं, त्याचीच संगत आपल्याला आवडते,  आपल्याला आनंद देते आणि म्हणून अशा माणसांचीच संगत करावी. जो स्वतःच्या सहवासानं आपल्या मनात क्षोभ निर्माण करतो, आपलं मन अस्वस्थ करून टाकतो, त्याला दूर ठेवणं हेच चांगलं होय. परंपरा अशीच चालत आली आहे. ज्याची संगत भलती-सलती असेल, त्याच्या सहवासाचा त्याग करावा, हीच खरी नीती होय. मग अशी व्यक्ती पिता असो, पुत्र असो, बंधू असो, की आणखी कोणी असो. ज्यांचं वर्तन आपल्या मूल्यांशी जुळत नाही, त्याचा सहवास करू नये. आपण सत्य वचनाचं, नैतिकतेचं, माणूसकीचं पालन करावं, त्यापेक्षा वेगळं वागू नये. याचा अर्थ आपल्या सदाचाराच्या वागण्याला ज्याचा अडथळा होत असेल, त्याच्यापासून दूर रहावं.

(संग्राहक: संजय दत्तात्रय सोमवंशी-पाटील)
९४२२३४५३६८