Wednesday, 11 January 2017

संत तुकारामांचे अभंगशतक (हितासाठी उपदेश ३१)

संतांचं जीवन लोकांवर उपकार करण्यासाठी असतं, या गोष्टीचा तुकारामांच्या मनावर फार मोठा प्रभाव पडलेला होता. हा प्रभाव त्यांच्या अस्तित्वाच्या अगदी गाभ्यापर्यंत पोचला होता आणि त्यामुळं ते स्वतः परोपकारी संत बनून गेले होते. त्यांनी स्वतःच आपल्या या उन्नत अवस्थेचं अतिशय समाधानानं, तृप्त मनानं आकलन केलं होतं आणि त्या प्रसन्न मनःस्थितीमधे त्यांच्या तोंडून स्वतःविषयीच पुढील उद्गार बाहेर पडले होते,

३१
अणुरेणुया थोकडा ! तुका आकाशाएवढा !!१!!
गिळूनि सांडिले कळिवर ! भव भ्रमाचा आकार !!२!!
सांडिली त्रिपुटी ! दीप उजळला घटीं !!३!!
तुका म्हणे आता ! उरलो उपकारापुरता !!४!!
            (अभंग क्र. ९९३)

बाह्य सृष्टीची असोत, की मानवाच्या अंतःसृष्टीची असोत, दोन परस्परविरुद्ध टोकं असतात. एका बाजूला अतिशय सूक्ष्म असे अणु-रेणू असतात, तर दुसऱ्या बाजूला सर्वव्यापी आकाश असते. समतेच्या अनुभवामुळं माणसाची अंतःसृष्टी जेव्हा बाह्य सृष्टीशी एकरूप होऊन जाते, तेव्हा मनुष्य एका बाजूला स्वतः अणु-रेणूंशी एकरूप असण्याचा अनुभव घेतो, किंबहुना त्यांच्यापेक्षाही सूक्ष्म असल्याची प्रचीती त्याला घेता येते. दुसऱ्या बाजूला आपण आकाशाइतके विशाल असल्याचा अनुभवही त्याला येतो. तुकारामांनी नेमकी हीच अवस्था अनुभवली होती. ही एक असाधारण अवस्था आहे. या अवस्थेमधे सर्व विश्वाशी एकरूप झालेला मनुष्य जणू काही स्वतःचं शरीर गिळून त्याचं अस्तित्व संपवून टाकतो. आपला अवघा मीपणा, सगळा अहंकार टाकून देतो. संसारामधे मनात भ्रम निर्माण करणाऱ्या जितक्या गोष्टी असतात, त्या सगळ्या बाजूला करतो. तुकाराम आपल्या माधुर्यानं ओतप्रोत भरलेल्या या उत्कट अनुभवाला शब्दरूप देत आहेत. आपल्या शरीरात दीप उजळला आहे, असं ते म्हणतात. जो अनुभव शब्दांत पकडणं भल्याभल्यांना जमणार नाही, तो अनुभव तुकारामांनी अतिशय सहजतेनं आणि तितक्याच सौंदर्यानं केवळ तीन शब्दांत आपल्या काळजापर्यंत पोचवला आहे. या उजळलेल्या प्रकाशमय अवस्थेत त्रिपुटी सांडल्याचं ते म्हणत आहेत. त्रिपुटी म्हणजे तीन गोष्टींचा समुदाय. या तीन गोष्टी कोणत्या याचा अभ्यासकांनी, पंडितांनी, तत्त्वज्ञानाच्या अभ्यासकांनी जरूर शोध घ्यावा. परंतु तुकारामांच्या हृदयाची उजळलेली अवस्था शब्दांच्या आधाराविना ज्यांच्या हृदयात आपोआपच प्रवेश करते, त्यांना त्रिपुटीचा शब्दार्थ शोधण्याची गरज नाही. ते सर्व प्रकारचा आपपरभाव, मी-तूपणा दूर करून सर्व प्राणीमात्रांशी, सर्व सृष्टीशी एकरूप झाले आहेत, हाच अर्थ आपल्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. त्यासाठी काही प्राप्त करावं, असं आता त्यांच्या जीवनात काही उरलेलंच नाही. त्यांचं अवघं अस्तित्व आता इतरांना कल्याणाचा मार्ग दाखविण्यासाठी आहे. तुकारामांनी आपल्या अंतःकरणातील निरपेक्ष करुणा व्यक्त करताना शब्दांना जे लावण्य दिलं आहे, त्याला त्यांच्याच सांगायचं झालं, तर 'अंतपार नाही' !


(संग्राहक:  संजय दत्तात्रय सोमवंशी-पाटील)
९४२२३४५३६८
 

Friday, 6 January 2017

संत तुकारामांचे अभंगशतक (हितासाठी उपदेश ३०)

आपल्या अंतःकरणातील करुणेमुळं तुकाराम नेहमी दुःखी-कष्टी जीवांना मदत करण्याचा विचार करीत असत. लोकांनाही ते याच अर्थाचा उपदेश करीत असत. एका अभंगात ते म्हणतात,

३०
आर्तभूतां द्यावे दान ! खरे पुण्य त्या नावें !!१!!
होणार ते सुखें घडो ! लाभ जोडो महाबुद्धि !!२!!
सत्य संकल्पा च साटी ! उजळा पोटीं रविबिंब !!३!!
तुका म्हणे मनीं वाव ! शुद्ध भाव राखावा !!४!!
               (अभंग क्र. ३६५२)

दुःखानं कासावीस झालेल्या प्राण्यांना दान द्यावं, मदत करावी, या कृतीलाच खरं म्हणजे पुण्य हे नाव आहे. आपण मदत केल्यानंतर जे काही घडायचं असेल, ते खुशाल घडो. आपण त्याचा विचार करण्याचं कारण नाही. आपल्या परीनं आपल्याला शक्य आहे ते करावं, म्हणजे झालं. आपल्या महान बुद्धीनं, आपल्या श्रेष्ठ विवेकानं हाच लाभ करून घ्यावा, हे उत्तम. दुःखी-कष्टी लोकांना मदत करणं, हेच जीवनातील खरं सत्य आणि आपण त्या सत्याचाच संकल्प करावा. सूर्यबिंब उगवल्यानंतर जसं सगळं जग उजळून निघतं, तसं या संकल्पानं आपलं अंतःकरण उजळून निघावं. शुद्ध भावना जपून ठेवता यावी, यासाठी आपल्या मनामधे जागा करून घ्यावी, आपल्या अंतर्यामी शुद्ध भावनेला वाव द्यावा.


(संग्राहक: संजय दत्तात्रय सोमवंशी-पाटील) 
९४२२३४५३६८ 

Thursday, 5 January 2017

संत तुकारामांचे अभंगशतक (हितासाठी उपदेश २९)

दु:खानं व्याकूळ झालेल्या माणसाला मोठी मदत केली नाही आणि नुसता शब्दानं दिलासा दिला, तरी त्याच्या दृष्टीनं तो मोठा आधार असतो. तुकाराम म्हणतात,

२९
हा गे आलो कोणी म्हणे बुडतिया ! तेणें किती तया बळ चढे !!१!!
तुम्ही तंव भार घेतला सकळ ! आश्वासिलो बाळ अभयकरें !!२!!
भुकेलिया आस दाविता निर्धार ! किती होय धीर समाधान !!३!!
तुका म्हणे दिली चिंतामणीसाटी ! उचित कांचवटी दंडवत !!४!!
               (अभंग क्र. २५५५)

पाण्यात बुडत असलेल्या माणसाला 'हा पहा, मी आलो' एवढं नुसतं तोंडानं म्हटलं, तरी त्यामुळं त्याचं बळ किती वाढतं ! संत लोकांना नेमकं हे बळच देत असतात. आपण स्वतः हा अनुभव घेतल्याचं तुकाराम सांगत आहेत. एखाद्या लहान मुलाला आपला हात उंचावून 'घाबरू नकोस' असं आश्वासन द्यावं, तसं संतांनी आपल्या बाबतीत केलं आहे आणि आपला सगळा भार स्वतःच्या अंगावर घेतला आहे, असं तुकाराम कृतज्ञतापूर्वक सांगत आहेत. एखाद्या भुकेलेल्या माणसाला नक्की भोजन देण्याची आशा दाखविली, तरी तेवढ्यानं त्याला किती धीर येतो, समाधान वाटतं. दु:खी-कष्टी माणसाला आपल्या वागण्या-बोलण्यातून दिलासा देण्याचा आनंद काही औरच असतो, हे तुकारामांनी या अभंगातून आपल्याला तळमळीनं सांगितलं आहे. जो मनुष्य असा दिलासा देतो, त्याचे उपकार मोठे असतात. संत असे उपकारकच करत असतात. आपण त्यांना दंडवत घातला, तरी त्यांच्या उपकाराची फेड होऊ शकत नाही. हे तर, एखाद्यानं आपल्याला सर्व इच्छा पूर्ण करणारं चिंतामणीसारखं रत्न द्यावं आणि आपण त्याची परतफेड म्हणून त्याला काच देण्याचा प्रयत्न करावा, तसं आहे.


(संग्राहकसंजय दत्तात्रय सोमवंशी-पाटील)
९४२२३४५३६८

संत तुकारामांचे अभंगशतक (हितासाठी उपदेश २८)

लोकांच्या हितासाठीच आपण त्यांना उपदेश करतो, हे स्पष्ट करताना त्यांनी एका अभंगात म्हटलं आहे,

२८
भूतीं भगवंत ! हा तो जाणतो संकेत !!१!!
भारी मोकलितो बाण ! ज्याचा त्यासी कळे गुण !!२!!
करावा उपदेश ! निवडोनि तरि दोष !!३!!
तुका म्हणे वाटे ! चुकता आडराने काटे !!४!!
           (अभंग क्र. ८३३)

सर्व प्राण्यांमधे भगवंत असतो, हा संकेत तर मी जाणतो, असं ते म्हणतात. इतरांनीही हे जाणावं, ही त्यांची उत्कट इच्छा होती. म्हणूनच ते त्या अर्थाचा उपदेश करीत असत. हा उपदेश करणारे शब्दांचे जबरदस्त बाण मी सोडतो आणि ज्याला ते कळायला हवं त्याला ते कळतं, असं ते म्हणतात. ज्या गोष्टीचा उपदेश करायचा, त्या गोष्टीत काही दोष असू नयेत याची काळजी घेऊन उपदेश करावा, असं तत्त्व त्यांनी सांगितलं आहे. जीवनाचा प्रवास करताना माणूस वाट चुकून आडरानाला गेला, तर त्याला काट्यांचा सामना करावा लागणार, हे उघड आहे. म्हणूनच माणसानं वाटचाल करताना आवश्यक ती काळजी घ्यावी.


(संग्राहक: संजय दत्तात्रय सोमवंशी-पाटील)
९४२२३४५३६८

संत तुकारामांचे अभंगशतक (हितासाठी उपदेश २७)

अनेकदा संतांकडून खूप चांगलं मार्गदर्शन मिळालेलं असतं, पण काही लोकांना त्याचं मोलच कळलेलं नसतं आणि त्यामुळं ते त्याची उपेक्षा करतात, त्याच्याकडं दुर्लक्ष करतात. तसं बघितलं तर प्रत्येकाच्या व्यक्तिमत्त्वात खूप काही गुणवत्ता असते, परंतु माणसाला त्याचं भानच नसतं. संत ते भान देण्याचा प्रयत्न करतात. आपण शहाणपणानं तिकडं लक्ष दिलं पाहिजे, ते स्वीकारलं पाहिजे, साकारलं पाहिजे. हे सगळं स्पष्ट करताना तुकाराम महाराज एका अभंगात म्हणतात :

२७
मृगाचिये अंगी कस्तुरीचा वास | असे ज्याचा त्यास नसे ठावा ||१||
भाग्यवंत घेती वेचूनिया मोलें | भारवाही मेले वाहता ओझे ||२||
चंद्रामृतें तृप्तिपारणे चकोरा | भ्रमरासी चारा सुगंधाचा ||३||
अधिकारी येथे घेती हातवटी | परीक्षवंता दृष्टी रत्न जैसे ||४||
तुका म्हणे काय अंधळिया हाती | दिले जैसे मोती वाया जाय ||५||

                  (अभंग क्र. ४३०८)

कस्तुरीमृगाच्या शरीरातच कस्तुरी असते आणि तिचा सुगंध दरवळत असतो. परंतु त्या मृगाला तिचा ठावठिकाणा माहीत नसतो, ती आपल्याच ठायी आहे हे त्याला माहीत नसतं. जे लोक सफल होणारे असतात, आपल्या हिताविषयी जागरूक असतात, ते अशा गोष्टी अगदी किंमत मोजून वेचून घेतात. याउलट, ज्यांना आपल्याकडं असलेल्या अशा गोष्टींचं भान नसतं, ते भारवाही नुसतंच ओझं वाहून मरतात. चंद्राच्या किरणातून ते अमृत स्रवतं, त्यामुळं चकोराची तृप्ती होते, ते त्याचं पारणं असतं. तो त्या अमृताचा लाभ घेतो, असा त्याचा अर्थ होतो. फुलांमधे सुगंध असतो आणि भुंग्याला ते कळत असल्यामुळं तो त्या सुगंधाचा चारा चाखतो. जे तज्ञ असतात, त्या त्या गोष्टीचे जाणकार अधिकारी असतात, ते आपल्याकडं असलेल्या हातोटीमुळं, कौशल्यामुळं आपल्याला हवी ती गोष्ट बरोबर मिळवतात. जो खराखुरा पारखी असतो, त्याच्या दृष्टीला रत्न पडलं, की तो त्याचं योग्य मोल देऊन ते नक्कीच मिळवतो. मोती हे एक असंच मौल्यवान रत्न आहे. परंतु ते आंधळ्याच्या म्हणजेच पारख नसलेल्या माणसाच्या हाती पडलं, तर ते वायाच जातं. कारण, त्याला त्याचं मोल कळत नसतं. सज्जनांचा उपदेश देखील कस्तुरीसारखा, चंद्रकिरणांतील अमृतासारखा, रत्नासारखा असतो. ज्याला त्याचं मोल कळतं, तो त्याचा लाभ घेऊन आपल्या आयुष्याचं कल्याण करतो आणि ज्याला त्याचं मोल कळत नाही, तो स्वतःच्याच हिताला मुकतो.

(संग्राहक: संजय दत्तात्रय सोमवंशी-पाटील)
९४२२३४५३६८

Tuesday, 3 January 2017

संत तुकारामांचे अभंगशतक (हितासाठी उपदेश २६)

संत स्वतःच्या परोपकारी वृत्तीमुळं दु:खी लोकांचं दु:ख दूर करण्याचा स्वतःहून प्रयत्न करतात, हे त्यांचं मोठेपण होय. परंतु, जो दु:खी असतो, त्यानं संतांची वाट पहात बसण्याऐवजी स्वतः त्यांच्याकडं जावं, आपलं दु:ख त्यांच्यापुढं मांडावं आणि ते दूर करण्याचा उपाय जाणून घ्यावा, असं तुकारामांना वाटतं. जणू काही आपल्याला काही गरजच नाही आणि उपदेश करण्याविना संतांचच काही तरी अडलेलं आहे, अशा समजुतीत राहू नये, हे अतिशय प्रभावी शब्दात नोंदवताना तुकारामांनी एका अभंगात काही मार्मिक उदाहरणं दिली आहेत. ते म्हणतात,

२६
मुंगीचिया घरा कोण जाय मूळ ? ! देखोनिया गूळ धाव घाली !!१!!
याचकाविण काय खोळंबला दाता ? ! तोचि धावे हिता आपुलिया !!२!!
उदक अन्न काये म्हणे मज खा ये ? ! भुकेला तो जाये चोजवीत !!३!!
व्याधी पिडिला धावे वैद्याचिया घरा ! दु:खाच्या परिहारा आपुलिया !!४!!
तुका म्हणे जया आपुले स्वहित ! करणे तो चि प्रीत धरी कथे !!५!!

                                    (अभंग क्र. २३८०)

 गूळ हे मुंगीचं खाद्य असतं. पण गुळाच्या वतीनं कुणी मुंगीला ' ये आणि गूळ खा ' असं निमंत्रण पाठवलेलं नसतं. गुळाला गरज नसते, तर मुंगीलाच गरज असते. मुंगीलाही आपली गरज कळते आणि ती गूळ पाहून तो खाण्यासाठी त्याच्याकडे धाव घेते. याचक आणि दाता यांच्या बाबतीतही हीच स्थिती असते. दाता काही याचकाविना खोळंबून बसलेला नसतो. याचकाला आपलं हित कळतं आणि तो आपल्या हितासाठी दात्याकडं धाव घेतो. पाणी काही ' या आणि मला प्या ' असं म्हणत नाही. अन्न काही ' या आणि मला खा ' असं म्हणत नाही. ज्याला तहान लागलेली असते, तोच शोध घेत पाण्याकडं जातो. ज्याला भूक लागलेली असते, तोच शोध घेत अन्नाकडं जातो. ज्याला रोगाची पीडा झालेली असते, तो आपलं दु:ख दूर करण्यासाठी वैद्याच्या घराकडे धाव घेतो. तुकाराम महाराजांनी ही सर्व उदाहरणं संतांच्या उपदेशाविषयी सांगितली आहेत. संत कथेमधून, प्रवचनामधून लोकांना त्यांच्या हिताचा उपदेश करीत असतात. ज्याला आपलं हित करून घ्यायचं असतं, त्यानं स्वतःहून त्या उपदेशाची गोडी मनात बाळगून तिचा लाभ घ्यायला हवा, असा त्यांचा सल्ला आहे.


(संग्राहक: संजय दत्तात्रय सोमवंशी-पाटील)
९४२२३४५३६८

Saturday, 31 December 2016

संत तुकारामांचे अभंगशतक (हितासाठी उपदेश २५)

संत हा जो उपदेश करतात, त्याचे आणखी काही पैलू तुकारामांनी एका अभंगात मांडले आहेत. ते म्हणतात :

२५
अधिकार तैसा दावियेला मार्ग | चालता हे मग कळो येते ||१||
जाळू नये नाव पावलेनि पार | मागील आधार बहुतांचा ||२||
तुका म्हणे रोग वैद्याचे अंगीं | नाही, करी जगीं उपकार ||३||
                         (अभंग क्र. ५३८)

संत सर्वांनाच उपदेश करतात, परंतु प्रत्येकाला उपदेश करण्याची त्यांची पद्धत वेगळी असते. ज्याचा जसा अधिकार असतो, जशी पात्रता असते, त्यानुसार ते त्याला कोणत्या मार्गानं जावं, त्याचा उपदेश करतात. माणूस जेव्हा त्या मार्गावरून प्रत्यक्ष चालतो, तेव्हा त्याला हा उपदेश उपयोगी पडतो. त्या वेळी त्याला या उपदेशाचं महत्त्व कळून येतं. उपदेशामुळं ज्याचं कल्याण झालेलं असतं, त्यानं संतांनी दाखविलेला मार्ग मोडू नये, त्याचं नुकसान करू नये. आपण नावेतून पलीकडं गेलो, तर पैलतीराला गेल्याच्या धुंदीत नाव जाळून टाकण्याचा कृतघ्नपणा करू नये. कारण, ती आपल्या मागून येणार्‍या खूप लोकांचा आधार असते. संत या नावेसारखेच असतात. आपल्याला त्यांच्या उपदेशाचा लाभ झाला, आता त्यांची गरज राहिली नाही, असं मानून त्यांना हानी पोचवू नये. कारण, ते इतर अनेकांचा आधार होत असतात. खरं तर संत हे एखाद्या वैद्यासारखे असतात. राेगी माणसाच्या अंगात रोग असतो. तो रोग काही वैद्याच्या अंगात नसतो. तरी देखील वैद्य त्या रोगाचा अभ्यास करतो, त्याचं निदान करतो आणि त्याच्यावर उपचार करतो. संतांचं कार्य हे असंच असतं. स्वतः त्यांच्या जीवनात जे दुःख नसतं, ते इतरांच्या जीवनातील दुःख त्यांना दिसत असतं आणि ते दूर करण्यासाठी त्यांची सगळी धडपड असते.

(संग्राहक: संजय दत्तात्रय सोमवंशी-पाटील)
९४२२३४५३६८