अनेकदा संतांकडून खूप चांगलं मार्गदर्शन मिळालेलं असतं, पण काही लोकांना त्याचं मोलच कळलेलं नसतं आणि त्यामुळं ते त्याची उपेक्षा करतात, त्याच्याकडं दुर्लक्ष करतात. तसं बघितलं तर प्रत्येकाच्या व्यक्तिमत्त्वात खूप काही गुणवत्ता असते, परंतु माणसाला त्याचं भानच नसतं. संत ते भान देण्याचा प्रयत्न करतात. आपण शहाणपणानं तिकडं लक्ष दिलं पाहिजे, ते स्वीकारलं पाहिजे, साकारलं पाहिजे. हे सगळं स्पष्ट करताना तुकाराम महाराज एका अभंगात म्हणतात :
२७
मृगाचिये अंगी कस्तुरीचा वास | असे ज्याचा त्यास नसे ठावा ||१||
भाग्यवंत घेती वेचूनिया मोलें | भारवाही मेले वाहता ओझे ||२||
चंद्रामृतें तृप्तिपारणे चकोरा | भ्रमरासी चारा सुगंधाचा ||३||
अधिकारी येथे घेती हातवटी | परीक्षवंता दृष्टी रत्न जैसे ||४||
तुका म्हणे काय अंधळिया हाती | दिले जैसे मोती वाया जाय ||५||
(अभंग क्र. ४३०८)
कस्तुरीमृगाच्या शरीरातच कस्तुरी असते आणि तिचा सुगंध दरवळत असतो. परंतु त्या मृगाला तिचा ठावठिकाणा माहीत नसतो, ती आपल्याच ठायी आहे हे त्याला माहीत नसतं. जे लोक सफल होणारे असतात, आपल्या हिताविषयी जागरूक असतात, ते अशा गोष्टी अगदी किंमत मोजून वेचून घेतात. याउलट, ज्यांना आपल्याकडं असलेल्या अशा गोष्टींचं भान नसतं, ते भारवाही नुसतंच ओझं वाहून मरतात. चंद्राच्या किरणातून ते अमृत स्रवतं, त्यामुळं चकोराची तृप्ती होते, ते त्याचं पारणं असतं. तो त्या अमृताचा लाभ घेतो, असा त्याचा अर्थ होतो. फुलांमधे सुगंध असतो आणि भुंग्याला ते कळत असल्यामुळं तो त्या सुगंधाचा चारा चाखतो. जे तज्ञ असतात, त्या त्या गोष्टीचे जाणकार अधिकारी असतात, ते आपल्याकडं असलेल्या हातोटीमुळं, कौशल्यामुळं आपल्याला हवी ती गोष्ट बरोबर मिळवतात. जो खराखुरा पारखी असतो, त्याच्या दृष्टीला रत्न पडलं, की तो त्याचं योग्य मोल देऊन ते नक्कीच मिळवतो. मोती हे एक असंच मौल्यवान रत्न आहे. परंतु ते आंधळ्याच्या म्हणजेच पारख नसलेल्या माणसाच्या हाती पडलं, तर ते वायाच जातं. कारण, त्याला त्याचं मोल कळत नसतं. सज्जनांचा उपदेश देखील कस्तुरीसारखा, चंद्रकिरणांतील अमृतासारखा, रत्नासारखा असतो. ज्याला त्याचं मोल कळतं, तो त्याचा लाभ घेऊन आपल्या आयुष्याचं कल्याण करतो आणि ज्याला त्याचं मोल कळत नाही, तो स्वतःच्याच हिताला मुकतो.
(संग्राहक: संजय दत्तात्रय सोमवंशी-पाटील)
९४२२३४५३६८