Sunday, 12 March 2017

संत तुकारामांचे अभंगशतक (संसार ५०)

श्रम न करता कोणाकडून फसवून वा लुबाडून काही घेणं आणि या मार्गानं श्रीमंत बनणं वा आपला संसार समृद्ध करणं तुकारामांना मान्य नव्हतं. एका अभंगात ते म्हणतात,
५०

चाकरीवाचून ! खाणे अनुचित वेतन !!१!!
धणी काढोनिया निजा ! करील ये कामाची  पूजा !!२!!
उचितावेगळे ! अभिलाषे तोंड काळे !!३!!
सांगे तरी तुका ! पाहा लाज नाही लोकां !!४!!
                 (अभंग क्र. २२१३)

ज्या कामासाठी वेतन घ्यायचं, ते काम न करता वेतन घेणं हे अनुचित होय. कुणीही कामचुकारपणा करू नये, हे समाजव्यवस्थेच्या निकोप धारणेसाठी आवश्यक असतं. परंतु अनेकदा समाजामधे वेगळं चित्र दिसतं. अनेकांना कष्ट नको असतात आणि सुखोपभोग मिळविण्याची मोठी लालसा मात्र असते. व्यक्तिगतदृष्ट्या हे अनैतिक असतं आणि समाजहिताच्या दृष्टीनंही घातक असतं. तुकारामांनी या अभंगाद्वारा तमाम लोकांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून दिली आहे. मालकाला जे काम करून घ्यायचं असतं, ते काम झाल्यानंतर तो काम करणाऱ्याच्या कामाची पूजा करतो. परंतु, जो या उचित पद्धतीपेक्षा वेगळं करतो आणि काम न करता वेतनाची अभिलाषा करतो, त्यांचं तोंड काळं होय. याचा अर्थ कामचुकारपणा करून वेतन घेणाऱ्याची अखेरीस अपकीर्तीच होते, तो लोकांच्या नजरेतून उतरतो, लोक त्याला ऐतखाऊ म्हणतात आणि खरं काम करण्याचा जो आनंद असतो, त्या आनंदालाही तो मुकतो. तुकाराम हे आग्रहानं सांगत असतानाही काही लोकांवर त्यांचा योग्य परिणाम होत नव्हताच, त्यांचा अनुकूल प्रतिसाद मिळत नव्हताच, त्यांच्यामधे परिवर्तन होत नव्हतंच. कितीही सांगितलं, तरी त्याकडं लक्ष न देणाऱ्या या लोकांना तुकाराम काहीशा त्राग्यानं निलाजरे म्हणतात.

(संग्राहक: संजय दत्तात्रय सोमवंशी-पाटील)
९४२२३४५३६८

Saturday, 11 March 2017

संत तुकारामांचे अभंगशतक (संसार ४९)

काम टाळण्याची प्रवृत्ती असलेले लोक कशा प्रकारे सबबी सांगतात, ते काहीशा विनोदी पद्धतीनं तुकारामांनी एका अभंगात पुढीलप्रमाणे नोंदविलं आहे:

४९
ढालतलवारें गुंतले हे कर ! म्हणे मी जुंझार कैसा झुंजो !!१!!
पेटी पडदळे सिले टोप ओझे ! हे तो जाले दुजे मरणमूळ !!२!!
बैसविले मला येणें अश्वावरी ! धावू पळू तरी कैसा आता ? !!३!!
असोनि उपाय म्हणे हे अपाय ! म्हणे हायहाय काय करू !!४!!
तुका म्हणे हा तो स्वयें परब्रह्म ! मूर्ख नेणे वर्म संतचरण !!५!!
                       (अभंग क्र. ४३४८)

         स्वतःला पराक्रमी समजणारा एक योद्धा म्हणतो, "मी झुंजार आहे, परंतु माझे हे हात ढाल आणि तलवार धरण्यात गुंतले आहेत, मग मी कसा झुंजू ? पोटावर तलवार अडकवण्यासाठी पट्टा आहे, हत्यारं आहेत, डोक्यावर जिरेटोप आहे. हे ओझं तर मरणाचं दुसरं कारण झालं आहे. यानं मला घोड्यावर बसविलं आहे. मी आता धावू-पळू तरी कसा ?" अशा रीतीनं उपाय ठरणाऱ्या गोष्टींना तो अपाय म्हणत आहे. तो 'हाय हाय, मी काय करू ?' असं म्हणत आहे. तुकाराम म्हणतात, "खरं तर हा स्वतः परब्रह्म आहे. परंतु, हे कळण्यासाठी संतांच्या चरणाजवळ बसलं पाहिजे, हे रहस्य या मूर्खाला कळत नाही."
         ज्या गोष्टी यशाचं साधन बनू शकतात, त्या गोष्टीच आपल्या यशाच्या मार्गातील अडथळा आहेत, असं सांगून काम टाळणाऱ्या लोकांचं हे वर्णन वरवर पाहता अतिशयोक्तीचं वाटलं, तरी प्रत्यक्षात अशा सबबी सांगण्याची प्रवृत्ती आपल्याला सर्रास आढळते. माणसाकडं मोठमोठी कामं करण्याची प्रचंड शक्ती असते. परंतु अनेकदा त्याला स्वतःकडं असलेल्या त्या शक्तीचं भान नसतं. तो प्रेरणा देणाऱ्या लोकांच्या सहवासात राहिला असता, त्याला आपल्या या शक्तीचं भान येऊ शकतं. तो त्यांच्याकडून स्फूर्ती घेवू शकतो. परंतु लोक अशी स्फूर्ती घेण्याऐवजी काम टाळण्यासाठी कुठली ना कुठली निमित्तं सांगत बसतात. त्यामुळं ती स्वतःचंच सुख गमावून बसतात. संत तुकारामांनी कामचुकार लोकांच्या विशिष्ट प्रवृत्तीवर अचूक बोट ठेवलं असून ती प्रवृत्ती दूर ठेवण्याची दृष्टी दिली आहे.

(संग्राहकसंजय दत्तात्रय सोमवंशी-पाटील )
९४२२३४५३६८
 

Saturday, 25 February 2017

संत तुकारामांचे अभंगशतक (संसार ४८)

मनुष्य कोणता का व्यवसाय करीत असेना, तो जर प्रामाणिकपणे कष्ट करीत असेल, तर धनसंपत्ती त्याच्याकडं आपोआप चालून येते, हे व्यापाराचं उदाहरण देऊन तुकारामांनी एका अभंगात स्पष्ट केलं आहे. ते म्हणतात,

४८

धनवंता घरीं ! करी धन चि चाकरी !!१!!
होय बैसल्या व्यापार ! न लगे सांडावे चि घर !!२!!
रानीं वनीं द्वीपीं ! असती ती होती सोपी !!३!!
तुका म्हणे मोल ! देता काही नव्हे खोल !!४!!
                  (अभंग क्र. २७९९)

ज्यानं प्रयत्न करून धन मिळवलेलं असतं, त्याच्या घरी धनच चाकरी करू लागतं. व्यापाराचं उदाहरण घेतलं, तरी हे स्पष्ट होतं. व्यापार घरबसल्या होत असतो. ग्राहक व्यापाऱ्याकडं येत असल्यामुळं व्यापाऱ्याला घर सोडावं लागतच नाही. मनुष्य रानात असो, वनात असो अथवा बेटावर असो, त्याच्याकडं धन असलं, की त्याची सगळी कामं सोपी होतात. त्याला जे काही हवं असतं, त्याची किंमत मोजली, की त्याला सर्व काही मिळतं, त्याच्या दृष्टीने काही अवघड रहात नाही. संसार सुखाचा करू इच्छिणाऱ्या माणसानं धनाचा द्वेष करू नये, कोणता ना कोणता उद्योग नीट करून धन मिळवावं आणि त्याच्या आधारे आपलं जीवन सफल करावं, हा तुकारामांचा मोलाचा सल्ला आहे.

(संग्राहक संजय दत्तात्रय सोमवंशी-पाटील)
९४२२३४५३६८
 

Saturday, 18 February 2017

संत तुकारामांचे अभंगशतक (संसार ४७)

संसार
      संसार यशस्वी कसा करावा, याचं अगदी व्यावहारिक आणि तरीही सैद्धांतिक स्वरूपाचं वर्णन करणारा त्यांचा एक अभंग अतिशय विख्यात आहे. त्यामधे ते म्हणतात,

४७

जोडोनिया धन उत्तम वेव्हारें ! उदास विचारें वेच करी !!१!!

उत्तम चि गती तो एक पावेल ! उत्तम भोगील जीव खाणी !!२!!

परउपकारी नेणे परनिंदा ! परस्त्रिया सदा बहिणी माया !!३!!

भूतदया गाईपशूचे पालन ! तान्हेल्या जीवन वनामाजी !!४!!

शांतिरूपे नव्हे कोणाचा वाईट ! वाढवी महत्त्व वडिलांचे !!५!!

तुका म्हणे हे चि आश्रमाचे फळ ! परमपद बळ वैराग्याचे !!६!!
                          (अभंग क्र. २८६४)

            उत्तम व्यवहार करून धन जोडावं. याचा अर्थ ते गैरमार्गानं मिळवू नये. कुणाला फसवून, कुणाला लुबाडून मिळवू नये. दुसऱ्याच्या कष्टाचं फळ आपण ओरबडून घेऊ नये. कष्ट करावेत. राबावं. घाम गाळावा. शहाणपणानं नेटका, निर्दोष व्यवहार करावा आणि या पद्धतीनं धन मिळवावं. समृद्धी उभी करावी. अशा नैतिक मार्गानं मिळवलेलं जे धन असेल, त्याच्या मोहात मात्र अडकू नये. त्याची आसक्ती धरू नये. त्याचा योग्य उपयोग जरूर करावा, पण तो काहीसा तटस्थपणानं, अलिप्त वृत्तीनं करावा. संपत्तीच्या बाबतीत अत्यंत संतुलित भूमिका तुकारामांनी इथं मांडल्याचं आढळतं. जो मनुष्य इतक्या विचारी पद्धतीनं वर्तन करील, तो उत्तम गतीच प्राप्त करील. त्याचं कल्याण होईल. इथं परंपरागत पद्धतीनं पारलौकिक गतीही तुकारामांना अभिप्रेत असली, तरी ते ऐहिक गतीलाही अचूकपणे लागू पडतं, यात शंका नाही.
           वर्तनाचे आणखीही काही नियम तुकारामांनी इथं सांगितले आहेत. माणसानं दुसऱ्यावर उपकार करावा. अडीअडचणीत असलेल्या, गोरगरीब, दुःखीकष्टी माणसांना मदत करावी. या उपदेशानुसार वागणारा हा मनुष्य दुसऱ्याची निंदाही करीत नाही. याचा अर्थ दुसऱ्याचा मत्सर करण्याची, द्वेष करण्याची त्याची वृत्ती नसते. परस्त्रियांना तो मायबहिणींप्रमाणं मानतो. याचा अर्थ तो आपलं शील जपतो. पत्नीची अवहेलना करीत नाही. तिच्याशी सुखसमाधानानं संसार करतो. त्याच्या अंगी भूतदया असते. प्राणिमात्रांविषयी कणव असते. आपलेपणा असतो. त्यांच्या सुखदुःखांत सहभागी होण्याची वृत्ती असते. तो गाईंचं व इतर गुरांचं नीट पालन करतो. त्यांची काळजी घेतो. त्याद्वारे घरात दूधदुभतं भरपूर मिळेल, अशी व्यवस्था करतो. रानावनात कोणी तहानलेला असेल, तर त्याला पाणी देतो. याचा अर्थ कोणी संकटात असला, तर त्याला मदतीचा हात देतो. त्याच्याशी बेपर्वाईनं वागत नाही. त्याची उपेक्षा करीत नाही. त्याच्याशी आपलं काय देणं-घेणं आहे, अशी भूमिका घेत नाही. तो आपली मनःशांती ढळू देत नाही. माणसाच्या जीवनात अनेकदा अस्वस्थ होण्यासारखे प्रसंग येतात. संकटांचे आघात होतात. निंदा-टीका पचवण्याचे प्रसंग येतात. परंतु हे सर्व शांतपणे झेलण्याची मनोवृत्ती त्यांच्याकडं असते. तो अशा प्रसंगांमुळं खचून जात नाही. आपला तोल जाऊ देत नाही. मनःशांती ढळू देत नाही. तो कुणाचंही वाईट चिंतत नाही. दुसऱ्याचं नुकसान व्हावं, म्हणून त्यांच्या मार्गात काटे पेरण्याचा दुष्टावा करीत नाही. अशा प्रकारच्या वर्तनामुळं तो आपल्या वडिलांचं महत्त्व वाढवतो. आपल्या वाडवडिलांचा, पूर्वजांचा लौकिक वाढवतो. अमुक-अमुक दांपत्याचा मुलगा असा विवेकी, निःस्पृह, संयमी, समंजस, कर्तबगार आहे, असं लोक म्हणतात, तेव्हा त्याच्या आईवडिलांचा गौरव होतो. अशा प्रकारचं अत्यंत समाधानी, तृप्त, निरामय जीवन हेच गृहस्थाश्रमाचं फळ होय. संसार करायचा, तो अशा प्रकारचं आनंदी जीवन भोगण्यासाठीच होय. संपत्तीची हाव धरून, त्यासाठी अनिष्ट मार्ग पत्करून, इतरांना लुबाडून, अन्याय करून वैभव उभं करणं आणि विलासात, सुखोपभोगात लोळणं, हे काही गृहस्थाश्रमाचं प्रयोजन नव्हे. संसारात राहून संयत जीवन जगणं, ही खरं तर वैराग्याची सर्वोच्च अवस्था म्हटली पाहिजे, हे वैराग्याचं सामर्थ्य म्हटलं पाहिजे. वैराग्य अनुभवण्यासाठी बैरागी होण्याची वा संन्यास घेण्याची गरज नाही. संसारात राहून, संयमपूर्वक अनुरागी बनूनही वैराग्याचा अनुभव घेता येतो, यात शंका नाही.

(संग्राहक: संजय दत्तात्रय सोमवंशी-पाटील)
९४२२३४५३६८
 

Monday, 13 February 2017

संत तुकारामांचे अभंगशतक (चमत्कार ४६)

तुकारामांच्या ईश्वरविषयक धारणा अतिशय वस्तुनिष्ठ होत्या. ईश्वर आपल्या स्वतःच्या जवळच असतो, त्याला इतरत्र शोधणं व्यर्थ आहे, अशी त्यांची भावना होती. एका अभंगात ते म्हणतात,

४६

देहीं असोनिया देव ! वृथा फिरतो निर्दैव !!१!!
देव आहे अंतर्यामीं ! व्यर्थ हिंडे तीर्थग्रामीं !!२!!
नाभी मृगाचे कस्तुरी ! व्यर्थ हिंडे वनांतरीं !!३!!
साखरेचे मूळ ऊस ! तैसा देहीं देव दिसे !!४!!
दुधीं असता नवनीत ! नेणे तयाचे मथित !!५!!
तुका सांगे मूढजना ! देहीं देव का पाहाना !!६!!
                      (अभंग क्र. ४४८२)

देव आपल्या शरीरातच असतो, याचा अर्थ आपल्या ठिकाणी जे सद्गुण असतात, जे चांगले आचारविचार असतात, त्यांच्यामधेच ईश्वराचं अस्तित्व असतं. कित्येकदा माणसाला हे कळत नाही. तो ईश्वराचा शोध घेण्यासाठी उगाचच बाहेरच्या जगात फिरत असतो. स्वतःच्या ठिकाणी असलेल्या सर्वश्रेष्ठ वैभवाचं भान नसलेला हा मनुष्य दुर्दैवीच म्हणावा लागेल. देव त्याच्या अंतर्यामीच असतो, परंतु तो त्याचा शोध घेण्यासाठी उगाचच तीर्थक्षेत्रं धुंडाळत असतो. त्याचं हे वागणं कस्तुरीमृगासारखं असतं. त्या मृगाचा नाभीमधेच कस्तुरी असते. परंतु तो तिचा शोध घेण्यासाठी सगळ्या वनामधे उगाचच हिंडत राहतो. खरं म्हणजे ऊस हेच जसं साखरेचं उगमस्थान असतं, साखर सत्त्वरूपानं मूलतः उसातच असते, तसा देव माणसाच्या देहातच असतो. लोणी दुधातच असतं, परंतु त्या दुधाचं दही बनवावं आणि त्याचं मंथन करून लोणी मिळवावं, हे ज्याला कळत नाही, तो इतर मार्गांनी कितीही प्रयत्न केले, तरी लोणी मिळवू शकत नाही. आपल्या आत डोकावून न पाहणाऱ्या, स्वतःच्या अस्तित्वाचा नीट शोध न घेणाऱ्या लोकांविषयी तुकाराम करुणेपोटीच नाराजी व्यक्त करतात. तुम्ही असे कसे मूढ आहात, स्वतःच्या शरीरात तुम्ही देवाला का पहात नाही, असा वेडेपणा का करीत आहात, असा प्रश्न त्यांनी लोकांना अगदी तळमळीनं विचारला आहे. ईश्वराच्या अस्तित्वाचा, स्वरूपाचा आणि स्थानाचा शोध कसा घ्यावा, याविषयीचं तुकारामांनी केलेलं हे मार्गदर्शन सत्यही आहे आणि सुंदरही आहे.

(संग्राहकसंजय दत्तात्रय सोमवंशी-पाटील)
९४२२३४५३६८
 

Saturday, 11 February 2017

संत तुकारामांचे अभंगशतक (चमत्कार ४५)

तुकारामांनी शुभ आणि अशुभ यांच्या संदर्भात आपल्याला एक अतिशय आश्वासक संदेश दिला आहे. एवढ्या महान संतानं दिलेला हा संदेश आपण ध्यानात घेतला नाही, तर आपल्यासारखे करंटे आपणच, असं म्हणावं लागेल. ते म्हणतात,

४५

शुभ जाल्या दिशा अवघा चि काळ ! अशुभ मंगळ मंगळाचे !!१!!
हातीचिया दीपें दुराविली निशी ! न देखिजे कैसी आहे ते ही !!२!!
सुख दुःखाहूनि नाही विपरीत ! देतील आघात हितफळे !!३!!
तुका म्हणे आता आम्हांसी हे भले ! अवघे चि जाले जीव जंत !!४!!
                                (अभंग क्र. २००३)

या अभंगात सर्व दिशा आणि काळ शुभ झाले, एवढेच सांगून ते थांबत नाहीत. सर्वसामान्य माणसं ज्यांना अशुभ म्हणतात, त्या गोष्टी आमच्या दृष्टीनं मंगलातील मंगल, शुभातील शुभ म्हणजे सर्वांत शुभ झाल्या आहेत, असं म्हणतात. तुकारामांवर अपार प्रेम करणाऱ्या लोकांनी त्यांच्या या वृत्तीचा अंगीकार केला पाहिजे, असं मला वाटतं. माणसांमधे आरपार बदल करून टाकण्याचं सामर्थ्य त्यांच्या या विचारात आहे. याच अभंगात त्यांनी पुढं काढलेले उद्गार कसे आत्मविश्वासानं ओतप्रोत भरलेले आहेत. हातात घेतलेल्या दिव्यामुळं रात्र दुरावली आहे आणि ती कशी आहे, ते दिसतही नाही इतकी दुरावली आहे, असं ते म्हणतात. हा दिवा विचारांचा आहे. विवेकाचा आहे. ज्ञानाचा आहे. मानसिक सामर्थ्याचा आहे. अज्ञानाची आणि दुबळेपणाची रात्र कुठल्या कुठं पळून गेली आहे. ते केवळ एक आत्मनिष्ठ अनुभव म्हणून ते सांगत आहेत, असं नाही. आपल्या तमाम भावंडांनी हा विचार पचवावा, हे सामर्थ्य प्राप्त करावं, अशीच त्यांची भावना आहे. असं सामर्थ्य प्राप्त झालं, की अशुभाचंही शुभात रूपांतर होतं. आघात देखील हितकारक फळं देतील, याचा अर्थ संकटं नुसती दूर होतील वा नष्ट होतील असं नाही, तर त्या संकटांचंच हितकारक, कल्याणकारक गोष्टींमध्ये रूपांतर होईल. स्वतःचं आंतरिक विश्व बदललं, की बाहेरचं अवघं विश्वही बदलेल. मग कुणी अशुभ, अपवित्र आहे, ही भावना राहणार नाही. सगळे प्राणीही भले वाटू लागतील. चांगले वाटू लागतील. या अभंगाच्या अखेरीस तुकाराम म्हणतात, की सर्व जीवजंतू हे आता त्यांच्या दृष्टीनं भले झाले आहेत. मनाची उत्कट प्रसन्नतेनं फुललेली ही अवस्था आपल्याला लाभावी, असं कुणालाही वाटावं, इतकं मोठं वैभव या उद्गारात आहे.

(संग्राहक:  संजय दत्तात्रय सोमवंशी-पाटील)
९४२२३४५३६८
 

संत तुकारामांचे अभंगशतक (चमत्कार ४४)

काही लोक आपल्याकडं विशिष्ट प्रकारच्या शक्ती आहेत, इतरांकडं नसलेलं ज्ञान आहे, असं भासवून सर्वसामान्य लोकांची फसवणूक करतात. तुकाराम अशा लोकांवर टीका करतात, याचा अर्थ सर्वसामान्य लोकांनी अशा ढोंगी लोकांपासून सावध रहावं, असंच सांगू इच्छितात. एका अभंगात त्यांनी म्हटलं आहे,

४४

सांगो जाणती शकुन ! भूत भविष्य वर्तमान !!१!!
त्यांचा आम्हांसी कंटाळा ! पाहो नावडती डोळां !!२!!
रिद्धीसिद्धींचे साधक ! वाचासिद्ध होती एक !!३!!
तुका म्हणे जाती ! पुण्यक्षयें अधोगती !!४!!
                          (अभंग क्र. १५०१)

आपल्याला शकुन-अपशकुनांची फळं कळतात, आपण अंतर्ज्ञानानं, भूत-भविष्य-वर्तमान अशा तिन्ही काळांतील घटना सांगू शकतो, असे काही लोक म्हणत असतात. ज्योतिषी, मांत्रिक वगैरे लोकांचा यांच्यामधे अंतर्भाव होतो. परंतु या लोकांकडं प्रत्यक्षात असं कोणतंही सामर्थ्य नसतं, हे तुकाराम निःसंदिग्धपणे जाणत होते. म्हणूनच, आपल्याला असं सांगणाऱ्यांचा कंटाळा आहे. आपल्या डोळ्यांनी त्यांच्याकडं पाहणं देखील आपल्याला आवडत नाही, असं तुकाराम अगदी ठणकावून सांगतात. आपल्याला रिद्धीसिद्धी नावाच्या अलौकिक शक्ती प्राप्त झाल्या आहेत, असं काही जण सांगतात. काही जण आपण 'वाचासिद्ध' आहोत, असं म्हणतात. म्हणजेच, आपण जे जे बोलतो, ते ते घडतं, असं ते भासवतात. अशा प्रकारचे लोक पुण्याचा क्षय होऊन अधोगतीला जातात, असं तुकाराम म्हणतात. याचा अर्थ, लोकांची अशा प्रकारे फसवणूक करणाऱ्यांनी पूर्वी जरी काही सत्कर्म केलेली असली, तरी तीही वाया जातात. जे निष्पाप लोकांची वंचना करतात, त्यांचा स्वतःचाही अधःपात होतो, मग ते इतरांचं कल्याण करतील ही शक्यताच नाही. म्हणून, लोकांनी त्यांच्यापासून सावध रहावं, त्यांच्यावर विश्वास ठेवू नये वा विसंबून राहू नये, असं तुकाराम महाराज सुचवत आहेत.

(संग्राहक:  संजय दत्तात्रय सोमवंशी-पाटील)
९४२२३४५३६८