५८
उचिताचा काळ । साधावया युक्तिबळ ।
आपले सकळ । ते प्रसंगीं पाहिजे ॥१॥
नेम नाही लाभ हानि । अवचित घडती दोनी।
विचारूनि मनीं । पाहिजे ते प्रयोजावे ॥२॥
जाळ जाळा काळे । करपो नेदावे आगळे ।
जेविता वेगळे | ज्याचे त्याचे तेथे शोभे ॥३॥
पाळी नांगर पाभारी । तन निवडूनि सोंकरी ।
तुका म्हणे घरीं । सेज जमा सेवटी ॥४॥
(अ.क्र. ३६८०)
काळ अथवा वेळ हे सृष्टीमधील एक मूलभूत आणि अत्यंत महत्वाचं परिमाण आहे. तसं पाहिलं, तर काळ हा काही ज्ञानेंद्रियांना प्रत्यक्षरीत्या जाणता येईल असा पदार्थ नव्हे. आपण डोळ्यांनी त्याला पाहू शकत नाही; कानांनी ऐकू शकत नाही; त्वचेला त्याचा स्पर्श जाणवत नाही; जिभेला त्याची चव कळत नाही आणि नाकानं त्याचा गंधही अनुभवता येत नाही. अशा रीतीनं ज्ञानेंद्रियांच्या कक्षेत येत नसल्यामुळं जणू काही त्याला अस्तित्वच नाही, असं वाटण्यासारखं त्याचं स्वरूप आहे. तरी देखील अवघ्या सृष्टीतील अणुरेणूंवर त्याची सत्ता चालत असल्याचं दिसतं. प्राण्यांच्या जीवनावर तर त्याचा विलक्षण प्रभाव असतो. जन्मापासून मृत्यूपर्यंत प्राण्यांना जे काही अस्तित्व लाभलेलं असतं, त्या अस्तित्वामधे क्षणाक्षणाला परिवर्तन होत असल्याचं आढळतं. तात्पर्य, प्रत्यक्षरीत्या ज्याच्या अस्तित्वाविषयीच संशय निर्माण होतो, तो काळ कमालीचा सामर्थ्यशाली आहे, हे जीवनातील उलथापालथी पाहता अप्रत्यक्षरीत्या आपल्या ध्यानात येतं.
सृष्टीमधील सर्वच पदार्थ आणि त्यातही खास करून सर्व प्राणी हे काळाच्या माध्यमातून आपल्या अस्तित्वाचा वा जीवनाचा प्रवास करीत असतात. यांपैकी प्राण्यांच्या प्रवासाचं एक मोठं वैशिष्ट्य आहे. ज्या प्राण्याला योग्य काळी योग्य कृती करण्याचं भान असतं, तो प्राणी जीवनामधे कमालीचा यशस्वी होतो. बाह्य सृष्टीवर अथवा आपल्याशी स्पर्धा करणाऱ्या इतर प्राण्यांवर मात करण्यात तर तो सफल होतोच, पण अशा बाह्य घटकांशी संबंध नसलेल्या स्वरूपाची, स्वतःच्या आंतरिक विकासाची प्रक्रिया घडत असतानाही तो सफलतेचं अत्युच्च शिखर गाठू शकतो. याचा अर्थ वेळेचं अचूक भान असणं आणि योग्य वेळी योग्य कृती करणं, हा प्राण्यांच्या जीवनातील यशाला कारणीभूत होणारा एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे.
काळ आणि वेळ यांच्या संबंधातील हा विचार संत तुकारामांनी वरील अभंगात मार्मिक रीतीनं मांडला असून त्यासाठी त्यांनी दिलेला शेतीच्या क्षेत्रातील दाखला म्हणजे एक श्रेष्ठ दर्जाचं 'कृषिसूत्र'च आहे, असं म्हणता येतं. प्राचीन भारतात बरंचसं लेखन सूत्रशैलीत होत असे. अल्पाक्षर, असंदिग्ध आणि सारयुक्त असणं, हे सूत्राचं खास लक्षण असतं. तुकारामांनी प्रस्तुत अभंगातील शेवटच्या चरणामधे शेतात कराव्या लागणाऱ्या प्राथमिक मशागतीपासून ते मळणी करून घरात धान्याची रास आणेपर्यंत ज्या ज्या क्रिया कराव्या लागतात, त्यांपैकी प्रमुख अशा बहुतेक क्रियांची सूत्रशैलीमधे नोंद केली असून त्या सर्व क्रिया योग्य वेळी योग्य क्रमानं केल्या, तरच घरात धान्याची रास येऊ शकते, हे स्पष्ट केलं आहे.
योग्य वेळ साधण्यासाठी आपलं सर्वं युक्तिबळ आपण वापरलं पाहिजे, असं तुकाराम म्हणतात. युक्तिबळ म्हणजे युक्तीचं बळ असंही म्हणता येईल किंवा युक्ती आणि बळ असंही म्हणता येईल. ते कसंही असो; विशिष्ट कार्य करण्याच्या बाबतीत योग्य वेळ साधण्यासाठी आपण आपलं सर्वस्व पणाला लावलं पाहिजे, असं तुकारामांच्या या वचनाचं तात्पर्य आहे. जीवनाच्या प्रवासात, काळाच्या ओघात केव्हा काय घडेल, ते सांगता येत नाही. काळाच्या उदरात काय काय लपलेलं आहे, ते आधी समजू शकत नाही. अकस्मात एखादी लाभाची गोष्टही घडू शकते आणि एखादं संकट कोसळल्यामुळं हानीही होऊ शकते. हे सगळं ध्यानात घेऊन माणसानं आपल्या आयुष्याच्या प्रत्येक पावलावर सावध रहावं. ज्या वेळी जी गोष्ट करणं आवश्यक असतं, त्या वेळी ती गोष्ट न चुकता करावी. आळस करू नये. हलगर्जीपणा करू नये. विलंब लावू नये, हे स्पष्ट करण्यासाठी त्यांनी स्वैंपाकाचं उदाहरण दिलं आहे. एखादा पदार्थ शिजत घातल्यानंतर तो शिजण्यासाठी त्याला योग्य वेळी आवश्यक ती उष्णता दिली पाहिजे. ज्या वेळी चुलीमधे जाळ देणं आवश्यक आहे, त्या वेळी तो दिला पाहिजे. त्याबरोबरच पदार्थ शिजल्यानंतर योग्य वेळी जाळ थांबविलाही पाहिजे. तसा तो थांबविला नाही, तर शिजत घातलेला पदार्थ करपून जाऊ शकतो. जाळ देण्याच्या वेळी जाळ दिला आणि जाळ थांबविण्याच्या वेळी तो थांबविला, तरच शिजविलेल्या पदार्थाचा खरा आस्वाद घेता येतो. उत्तम भोजनाचा आनंद प्राप्त करता येतो.
वेळेचं औचित्य अशा पद्धतीनं स्पष्ट करता करता तुकारामांनी शेतीचं एक उदाहरण दिलं आहे. शेतकरी आधी आपल्या शेताची मशागत करतो. काही वेळा तो शेत नांगरण्याऐवजी नुसती कुळवाची पाळी देतो. काही वेळा तो जमिनीची नांगरट करतो. जमिनीचा पोत, आधी घेतलेलं पीक, पाऊसकाळ, शेतामधे वाढणारं तण इ. गोष्टींचा विचार करून तो या बाबतीतील निर्णय घेतो. . कुळवण, नांगरट यांसारखी मशागत करून सज्ज झाल्यावर तो पावसाची वाट पाहतो. मग पावसाळ्यात योग्य वेळ साधून पेरणी करतो. पुढं पीक जसं वाढू लागतं, तसं त्यामधे तणही वाढू लागतं. मग योग्य वेळी तो तण काढण्याचं काम करतो. पुढं पीक जोमानं वाढून त्याच्या कणसांमधे दाणे भरतात, तेव्हा तो पाखरं वगैरेंपासून पिकाची राखण करतो. क्रमानं हे सगळं करीत गेल्यानंतर अखेरीस मळणी करून घरामधे धान्याची रास आणतो. ही रास प्राप्त करणं हे त्याचं ध्येय असतं. ते त्यानं पाहिलेलं हळुवार स्वप्न असतं. पण ते स्वप्न साकार होण्यासाठी उन्हाळ्यात केलेल्या मशागतीपासून क्रमश: शेतीची सर्व कामं वेळेवर करणं आवश्यक असतं. भारताचा सर्वश्रेष्ठ व्याकरणकार पाणिनी आपल्या एकेका सूत्रामधे हजारो शब्दांचे नियम सांगून टाकतो. जणू काही त्याच पद्धतीनं संत तुकारामांनी आपल्या अभंगाच्या या एका चरणामधे एका सूत्रामधे शेतकऱ्याला त्याच्या वर्षभराच्या कालखंडात कराव्या लागणाऱ्या सर्व कामांची संक्षेपानं नोंद केली आहे.
डॉ. आ. ह. साळुंखे सर
(संग्राहक: संजय दत्तात्रय सोमवंशी पाटील)
९४२२३४५३६८