Saturday, 3 March 2018

संत तुकारामांचे अभंगशतक (शेती ५३)

शेती हा संत तुकारामांचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय होता. शेतीच्या बाबतीत अक्षरशः असंख्य तपशील त्यांनी शेती करण्याच्या स्वानुभवातूनच मिळविले होते. शेती करणाऱ्यांसाठी त्यांनी आपले हे अनुभव पुनःपुन्हा सांगितले आहेत. त्याबरोबरच, शेतीमधील अनुभव सांगता सांगता जीवनाच्या सर्व क्षेत्रातून उपयोगी पडणारी व्यापक मार्गदर्शक तत्त्वे विपुल प्रमाणात आपल्या हाती दिली आहेत.

     पिकाची राखण करण्यासाठी शेतकऱ्यानं किती काळजी घेतली पाहिजे, याविषयी तुकाराम एका अभंगात म्हणतात,

५३

सेत आले सुगी सांभाळावे चारी कोण ! पिका आले परी केले पाहिजे जतन !!१!!
सोंकरी सोंकरी विसावा तोवरी ! नको खाऊ उभे आहे तों !!२!!
गोफणेसी दिंडी घाली पागोऱ्याच्या नेटें ! पळती हाहाकारें अवघी पाखरांची थाटे !!३!!
पेटवूनि आगटी राहे जागा पालटूनि ! पडिलिया मान बळ बुद्धि व्हावी दोनी !!४!!
खळे दानें विश्व सुखी करी होता रासी ! सारा सारूनिया ज्याचे भाग देई त्यासी !!५!!
तुका म्हणे मग नाही आपुले कारण ! निज आले हातां भूस सांडिले निकण !!६!!
                    (अभंग क्र. ११४९)

शेतकऱ्याला सदैव जागरूक राहण्याचा, नित्य सावध राहण्याचा सल्ला देणारा हा अभंग शब्दरचना आणि आशय या दोहोंच्या विलक्षण लावण्यानं नटला आहे. आपलं जीवन सुखीसमाधानी व यशस्वी करू इच्छिणाऱ्या सर्वच व्यक्तींच्या दृष्टीनं तो आस्वाद्य बनला आहे.
एखाद्यानं अपार कष्ट करून एखाद्या सुंदर गोष्टीची निर्मिती केली आणि नंतर तिचं रक्षण करण्याच्या बाबतीत हलगर्जीपणा केला, तर निर्माण केलेलं सगळं गमावून बसण्याचा धोका निर्माण होतो. तसं घडू नये, म्हणून तुकारामांनी अत्यंत तळमळीनं सोंकरीला चार गोष्टी सांगितल्या आहेत. सोंकरी म्हणजे राखण करणारा. मशागत करून, खोल ओलीला बी टाकणारी पेरणी करून, योग्य वेळी पुनःपुन्हा पाणी देऊन आणि तन काढून पिकाची सर्व प्रकारे काळजी घेतल्यानंतर पीक कणसांनी बहरून येतं. कणसं दाण्यांनी काठोकाठ भरतात. शेतावर नजर टाकली, की शेतकऱ्याचा ऊर अभिमानानं भरून येतो. सुगी झाल्यावर घरामधे जणू काही ऋद्धि-सिद्धी नांदू लागणार, असं वाटून पुढच्या वर्षभरात काय-काय करायचं, याची मधुर स्वप्नं त्याच्या डोळ्यात तरळू लागतात. पण हीच वेळ जागं राहण्याची असते. थोडासा बेसावधपणा झाला, तर डोळ्यांपुढं चमकणारं सगळं वैभव लुटलं जाण्याचा धोका असतो. म्हणून शेत सुगीवर आलं, पीक पक्व झालं, की शेतकऱ्यानं चारी कोपऱ्यांनी शेताची राखण करण्याची व्यवस्था केली पाहिजे. सर्व बाजूंनी ते सांभाळलं पाहिजे. शेतात समृद्ध पीक आलं आहे हे खरं, पण त्याचं काळजीपूर्वक जतन केलं पाहिजे.   'सोंकरी सोकरी विसावा तोंवरी ! नको खाऊ', या रचनेतील नादमाधुर्य जितकं हृद्य आहे, तितकंच त्याचं अर्थसौंदर्यही मनोज्ञ आहे. जोपर्यंत पीक शेतात उभं आहे, मळणी हिउन धान्य घरात आलेलं नाही, तोपर्यंत शेतकऱ्यानं विसावा घेता कामा नये. कणसं दाण्यांनी भरल्याचं पाहून त्यांच्यावर झडप घालण्यासाठी पाखरांचे थवेच्या थवे शेतावर घिरट्या घालू लागतात. त्या वेळी शेतकऱ्यानं हातात गोफण घेऊन नेटानं त्या पाखरांवर दगड मारले, म्हणजे पाखरांचे थवे घाबरून उडून जातात. त्यांना घाबरवण्यासाठी शेतकऱ्यानं आगटीही पेटवावी. सतत एकाच जागेवर थांबल्यास पाखरं दुसऱ्या बाजूनं हल्ला करण्याची शक्यता असते, म्हणून आलटून-पालटून वेगवेगळ्या ठिकाणी उभं राहून गोफण चालवावी. गरज पडेल, त्यानुसार बळ आणि बुद्धी या दोहोंचा वापर करावा. पाखरांप्रमाणेच चोर-लुटारुंपासूनही शेताचं रक्षण करावं लागतं. अशा वेळी कधी बळाचा प्रयोग करावा लागतो, तर कधी  बुद्धी वापरून संकटावर मात करावी लागते. अशा रीतीने सर्व प्रकारे काळजी घेतली, की मग खळ्यामधे धान्याच्या राशी तयार होतात. खळ्यामधे तयार झालेली धान्याची एक-एक रास त्याच्या सगळ्या आशा-आकांक्षा पूर्ण करून टाकते. तो ते धान्य उपणतो. धान्याचे कण त्याच्या हाती येतात. तो कणांचा अभाव असलेले भूस बाजूला सारतो. मग त्याला सर्व प्रकारचं सुख मिळतं. तो सरकारचा साराही भरू शकतो. बलुतेदार, सावकार, अतिथी वगैरेंना त्यांचा त्यांचा योग्य वाटाही देऊ शकतो. त्याच्या शेतीवर जे जे लोक अवलंबून असतात, त्या सर्वांना तर तो तृप्त करतोच, पण त्यांना तृप्त करून झाल्यावर त्याच्या घरात त्याच्या स्वतःच्या कुटुंबाला पुरून उरेल इतकं शिल्लक राहतं. आता त्याला काळजीचं कारण रहात नाही. त्याच्या घरामधे आनंद ओसंडून वाहू लागतो.

(संग्राहक: संजय दत्तात्रय सोमवंशी-पाटील)
 ९४२२३४५३६८


Tuesday, 4 April 2017

संत तुकारामांचे अभंगशतक (संसार ५२)



    कित्येकदा खूप सुखं आपल्या वाट्याला येऊ लागल्याचं जाणवतं, परंतु ती आपल्या पदरात पडेपर्यंत अनेक अडचणी येतात आणि मग ज्यांची चाहूल लागलेली असते, अशी कित्येक सुखं आपल्यापर्यंत पोचतच नाहीत. या वास्तवाचं भान असलं, की माणसाला अपेक्षाभंगाचं दुःख भोगावं लागत नाही. झाडाला येणाऱ्या मोहराचं उदाहरण देऊन तुकारामांनी हे अतिशय अर्थपूर्ण रीतीनं समजावलं आहे. ते म्हणतात,

५२
महुरा ऐसी फळे नाही ! आली काही गळती !!१!!
पक्वदशे येती थोडी ! नास आढी वेचे तों !!२!!
विरळा पावे विरळा पावे ! अवघड गोवे सेवटाचे !!३!!
उंच निंच परिवार देवी ! धन्या ठावी चाकरी !!४!!
झळके तेथे पावे आणी ! ऐसे क्षणीं बहु थोडे !!५!!
पावेल तो पैल थडी ! म्हणो गडी आपुला !!६!!
तुका म्हणे उभाऱ्याने ! कोण खरे मानितसे ? !!७!!
              (अभंग क्र. १२९०)

    माणसाच्या मनामधे स्वप्नं निर्माण करण्याची अपार क्षमता असली, तरी त्यानं निर्माण केलेल्या असंख्य, अनंत स्वप्नांपैकी मोजकी स्वप्नंच वास्तवात साकार होत असतात, हा एक कठोर, निर्दय अनुभव तुकारामांनी या अभंगात मांडला आहे.
    झाडावर मोहर जितका येतो, तितकी फळं येत नाहीत. मोहराच्या बाबतीत अनेकदा मनामधे असा विचार येऊन जातो, की निसर्ग हा फार उधळपट्टी करणारा आहे. झाडाची फांदी न् फांदी, डहाळी न डहाळी जेव्हा मोहरून येते, तेव्हा असं वाटतं, की त्यानं ओंजळी भरभरून फळांचे बीजभूत अणुरेणू त्या झाडावर विनाकारण उधळले आहेत. इतक्या मोहराची गरज नव्हती, असंही वाटतं. पण बारकाईनं पाहिलं, की त्याच्या या उधळपट्टीचं रहस्य समजतं. मोहरल्यापासून फलधारणेपर्यंतच्या प्रवासात जे अनंत आघात होतात, त्याचा अनुभव असल्यामुळंच तो ही स्वैर उधळण करीत असतो. अशी प्रचंड उधळण केल्यावर त्या अनंत मोहरकणांपैकी मोजके का होईना सर्व आघातांमधून, सर्व अपघातांमधून वाचून फळांमधे रूपांतरित होतील, हे ओळखून त्यानं असं केलेलं असतं. वादळवारं, गारांचा वर्षाव, कीड इ. प्रकारची अनेक संकटं वाटेत येतात. त्यांना झुकांडी देऊन, त्यांची नजर चुकवून, त्यांचे वार झेलून, त्यांचं प्रतिकार करून काही मोहरकण त्यांच्या तडाख्यातून निसटतात आणि त्यांची फळं बनतात. बाकीचे असंख्य कण गळून जातात, आघातांपुढं शरणागती पत्करतात, प्रवासाच्या प्रारंभीच आपली जीवनयात्रा संपवितात. यानंतरचा प्रवासही सुखरूप नसतो. मोहराची जी फळं बनलेली असतात, त्यापैकी काही फळं लहान असतानाच गळतात. त्यालाही अशाच प्रकारची काही संकटं कारणीभूत होतात. त्यातून जी वाचतात, त्यापैकी थोडीच पक्वदशेला येतात, पाद लागेपर्यंत टिकतात. पाडाला आल्यानंतर शेतकरी फळं झाडावरून उतरवून घेतो आणि चांगली पिकविण्यासाठी त्यांची आढी लावतो. ती फळं पिकत घालतो. पण जितकी फळं आढीला लावली जातात, तितकी सगळी उत्तम रीतीनं पिकून तयार होत नाहीत. काही नासतात. काही इतर कारणांनी खराब होतात. झाडावरून काढताना जमिनीवर आपटलेली वा फुटलेली फळं नीट पिकत नाहीत. उष्णता वगैरेंचं प्रमाण योग्य साधलं नाही, तर काही फळं नासतात. आणि एवढं सगळं घडून गेल्यावर बाकीची फळं आस्वाद घेण्याला योग्य म्हणून तयार होतात. शेतकरी त्यांतील काहींचा आपल्या कुटुंबियांसह आस्वाद घेतो. काही शेजाऱ्यापाजाऱ्यांना व आप्तेष्टांना देतो. काही बाजारात विकतो.
     मोहरापासून सुरु झालेला प्रवास आस्वाद्य अवस्थेच्या अंतिम टप्प्यापर्यंत पूर्ण करणारी फळं थोडीच असतात. प्रचंड प्रमाणात निर्माण झालेला मोहर बघून शेतकऱ्याच्या मनात जी अनंत स्वप्नं निर्माण झालेली असतात, त्यांपैकी कित्येकांचा चुराडा झाल्याचं त्याला पहावं लागतं. शेतकऱ्याच्या जीवनात येणाऱ्या स्वप्नभंगाच्या या वेदना कमालीच्या क्लेशकारक असतात. इतर क्षेत्रांतील कोणा व्यक्तींच्या वाट्याला अशा वेदना क्वचितच येत असतील. उत्तम मशागत करावी, तर पेरणीसाठी पाऊस वेळेवर पडत नाही. पाऊस वेळेवर पडून पेरणी उत्तम झाली, तर नंतर पाऊस ओढ देतो आणि आलेले अंकुर कोमेजून जातात. पुढं तण वगैरे काढून पीक जोमात आल्यामुळं मन हरखून जावं, तोवर टोळधाड वा किडीचा प्रादुर्भाव होतो. त्यातून वाचून कणसं छानपैकी फुलोऱ्यावर आली, तर धोधो पाऊस पडून फुलोरा झडतो आणि पिशा उरतात. प्रत्येक पिकाच्या बाबतीत केव्हा ना केव्हा असंच काही तरी घडतं. किती वेळा स्वप्नं हिरवळतात आणि पुन्हा कोमेजतात. आपण जेवढी स्वप्नं पाहतो, तेवढी कधीही सफल होत नसतात; म्हणून स्वप्नं पहायचं बंदही करायचं नाही आणि स्वप्नभंग झाला म्हणून खचायचंही नाही, हे चित्त स्थिर ठेवण्याचं तत्त्वज्ञान समाजाच्या सर्व घटकांना शेतकऱ्याकडून शिकता येतं. तुकारामांनी ते या अभंगात अतिशय प्रभावी रीतीनं मांडलं आहे.
    मोहरापासून अखेरच्या उत्तम अवस्थेपर्यंत जशी थोडीच फळं पोचतात, तसंच मानवी जीवनात हाती घेतलेलं काम मधे येणाऱ्या सर्व संकटांवर मात करून तडीला नेणारे लोकही विरळेच असतात. अनेक जण वाटेत अडखळतात, मरगळतात, थकतात आणि हार मान्य करून प्रवास थांबवतात. शेवटचं 'गोवे' म्हणजे ठिकाण वा मुक्काम गाठणारे बहाद्दर फार थोडे असतात. त्या मुक्कामापर्यंत पोचणं हे फार अवघड असतं. देवाजवळ उच्च, नीच अशा सर्व लोकांचा परिवार असतो. पण सगळे जण सारखी भक्ती करणारे नसतात. खरी भक्ती करणारे, भक्तीचा अत्युच्च टप्पा गाठणारे मोजकेच असतात. एखाद्या धन्याकडं अनेक जण चाकरी करीत असतात. पण त्यांतील प्रामाणिक कोण आणि अप्रामाणिक कोण, हे त्या धन्याला कळत असतं. जो आपल्या कर्तृत्वानं, निष्ठेनं, प्रामाणिकपणानं झळकतो, त्याच्याजवळच मालक जातो, त्याला जवळ करतो. परंतु असे लोक फार थोडे असतात.
     कोणत्याही क्षेत्रात वाटचाल करताना येणाऱ्या सर्व अडथळ्यांना ओलांडून पैल थडीला पोचणारा एखादाच असतो. तो खरा आपला गडी होय. तो खरा कर्तृत्ववान, पराक्रमी, शूर होय. पिकून तयार होणारं फळ हे जसं खरं फळ, तसा हा खरा माणूस होय. असं कर्तृत्व नसताना नुसती बाह्य उभारी दाखविणारे, उसनं अवसान आणणारे, फुशारकी मारणारे लोक हे कसोटीवर टिकत नाहीत. त्यांना कोणी खरा मान देत नाही.

(संग्राहक: संजय दत्तात्रय सोमवंशी-पाटील)
९४२२३४५३६८
 

Sunday, 2 April 2017

संत तुकारामांचे अभंगशतक (संसार ५१)

मानवी जीवनात सतत चढ-उतार होत असतात. माणसानं अशा गोष्टींना संतुलित वृत्तीनं सामोरं जावं, हा संदेश तुकारामांनी एका अतिशय सुरेख अभंगात दिला आहे. ते म्हणतात,

५१

कैं वाहावे जीवन ! कैं पलंगीं शयन !!१!!
जैसी जैसी वेळ पडे ! तैसे तैसे होणे घडे !!२!!
कैं भौज्य नानापरी ! कैं कोरड्या भाकरी !!३!!
कैं बसावे वहनीं ! कैं पायी अन्हवाणी !!४!!
कैं उत्तम प्रावर्णे ! कैं वसने ती जीर्णे !!५!!
कैं सकळ संपत्ती ! कैं भोगणे विपत्ती !!६!!
कैं सज्जनाशी संग ! कैं दुर्जनाशी योग !!७!!
तुका म्हणे जाण ! सुख दुःख ते समान !!८!!
                 (अभंग क्र. २८१९)

कधी सेवक बनून पाणी वाहून नेण्याचं काम करावं, तर कधी धनवंत बनून पलंगावर झोपण्याचं सुख भोगावं. माणसाच्या जीवनात येणारे हे परस्परविरोधी प्रसंग असतात. आपल्यावर जशी वेळ येईल, तसं तिला सामोरं जावं. कधी नाना प्रकारच्या पक्वान्नांचं भोजन करायला मिळतं, तर कधी कोरड्या भाकरी खाण्याचा प्रसंगही अनुभवावा लागतो. कधी वाहनात बसून आरामशीर प्रवास करण्याची संधी मिळते, तर कधी अनवाणी पायी चालण्याची वेळ येते. कधी उत्तम वस्त्रं परिधान करायला मिळतात, तर कधी जुने, फाटके कपडे वापरावे लागतात. कधी सर्व प्रकारची संपत्ती लाभते, तर कधी संकटांचे भोग भोगावे लागतात. कधी सज्जनांची संगत लाभते, तर कधी दुर्जनांचा सामना करावा लागतो. जीवन हे असं आहे. या प्रवासात सुखंही वाट्याला येतात आणि दुःखंही भोगावी लागतात. विवेकी माणूस सुखांच्या काळात हुरळून जात नाही, उद्दाम होत नाही आणि दुःखांच्या काळात खचून जात नाही, वैफल्यग्रस्त होत नाही. दोन्ही प्रकारच्या अवस्थांमधे जो आपल्या मनाचं संतुलन राखतो, त्याचंच जीवन खऱ्या अर्थानं कृतार्थ होतं.

(संग्राहक:  संजय दत्तात्रय सोमवंशी-पाटील)
९४२२३४५३६८

Sunday, 12 March 2017

संत तुकारामांचे अभंगशतक (संसार ५०)

श्रम न करता कोणाकडून फसवून वा लुबाडून काही घेणं आणि या मार्गानं श्रीमंत बनणं वा आपला संसार समृद्ध करणं तुकारामांना मान्य नव्हतं. एका अभंगात ते म्हणतात,
५०

चाकरीवाचून ! खाणे अनुचित वेतन !!१!!
धणी काढोनिया निजा ! करील ये कामाची  पूजा !!२!!
उचितावेगळे ! अभिलाषे तोंड काळे !!३!!
सांगे तरी तुका ! पाहा लाज नाही लोकां !!४!!
                 (अभंग क्र. २२१३)

ज्या कामासाठी वेतन घ्यायचं, ते काम न करता वेतन घेणं हे अनुचित होय. कुणीही कामचुकारपणा करू नये, हे समाजव्यवस्थेच्या निकोप धारणेसाठी आवश्यक असतं. परंतु अनेकदा समाजामधे वेगळं चित्र दिसतं. अनेकांना कष्ट नको असतात आणि सुखोपभोग मिळविण्याची मोठी लालसा मात्र असते. व्यक्तिगतदृष्ट्या हे अनैतिक असतं आणि समाजहिताच्या दृष्टीनंही घातक असतं. तुकारामांनी या अभंगाद्वारा तमाम लोकांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून दिली आहे. मालकाला जे काम करून घ्यायचं असतं, ते काम झाल्यानंतर तो काम करणाऱ्याच्या कामाची पूजा करतो. परंतु, जो या उचित पद्धतीपेक्षा वेगळं करतो आणि काम न करता वेतनाची अभिलाषा करतो, त्यांचं तोंड काळं होय. याचा अर्थ कामचुकारपणा करून वेतन घेणाऱ्याची अखेरीस अपकीर्तीच होते, तो लोकांच्या नजरेतून उतरतो, लोक त्याला ऐतखाऊ म्हणतात आणि खरं काम करण्याचा जो आनंद असतो, त्या आनंदालाही तो मुकतो. तुकाराम हे आग्रहानं सांगत असतानाही काही लोकांवर त्यांचा योग्य परिणाम होत नव्हताच, त्यांचा अनुकूल प्रतिसाद मिळत नव्हताच, त्यांच्यामधे परिवर्तन होत नव्हतंच. कितीही सांगितलं, तरी त्याकडं लक्ष न देणाऱ्या या लोकांना तुकाराम काहीशा त्राग्यानं निलाजरे म्हणतात.

(संग्राहक: संजय दत्तात्रय सोमवंशी-पाटील)
९४२२३४५३६८

Saturday, 11 March 2017

संत तुकारामांचे अभंगशतक (संसार ४९)

काम टाळण्याची प्रवृत्ती असलेले लोक कशा प्रकारे सबबी सांगतात, ते काहीशा विनोदी पद्धतीनं तुकारामांनी एका अभंगात पुढीलप्रमाणे नोंदविलं आहे:

४९
ढालतलवारें गुंतले हे कर ! म्हणे मी जुंझार कैसा झुंजो !!१!!
पेटी पडदळे सिले टोप ओझे ! हे तो जाले दुजे मरणमूळ !!२!!
बैसविले मला येणें अश्वावरी ! धावू पळू तरी कैसा आता ? !!३!!
असोनि उपाय म्हणे हे अपाय ! म्हणे हायहाय काय करू !!४!!
तुका म्हणे हा तो स्वयें परब्रह्म ! मूर्ख नेणे वर्म संतचरण !!५!!
                       (अभंग क्र. ४३४८)

         स्वतःला पराक्रमी समजणारा एक योद्धा म्हणतो, "मी झुंजार आहे, परंतु माझे हे हात ढाल आणि तलवार धरण्यात गुंतले आहेत, मग मी कसा झुंजू ? पोटावर तलवार अडकवण्यासाठी पट्टा आहे, हत्यारं आहेत, डोक्यावर जिरेटोप आहे. हे ओझं तर मरणाचं दुसरं कारण झालं आहे. यानं मला घोड्यावर बसविलं आहे. मी आता धावू-पळू तरी कसा ?" अशा रीतीनं उपाय ठरणाऱ्या गोष्टींना तो अपाय म्हणत आहे. तो 'हाय हाय, मी काय करू ?' असं म्हणत आहे. तुकाराम म्हणतात, "खरं तर हा स्वतः परब्रह्म आहे. परंतु, हे कळण्यासाठी संतांच्या चरणाजवळ बसलं पाहिजे, हे रहस्य या मूर्खाला कळत नाही."
         ज्या गोष्टी यशाचं साधन बनू शकतात, त्या गोष्टीच आपल्या यशाच्या मार्गातील अडथळा आहेत, असं सांगून काम टाळणाऱ्या लोकांचं हे वर्णन वरवर पाहता अतिशयोक्तीचं वाटलं, तरी प्रत्यक्षात अशा सबबी सांगण्याची प्रवृत्ती आपल्याला सर्रास आढळते. माणसाकडं मोठमोठी कामं करण्याची प्रचंड शक्ती असते. परंतु अनेकदा त्याला स्वतःकडं असलेल्या त्या शक्तीचं भान नसतं. तो प्रेरणा देणाऱ्या लोकांच्या सहवासात राहिला असता, त्याला आपल्या या शक्तीचं भान येऊ शकतं. तो त्यांच्याकडून स्फूर्ती घेवू शकतो. परंतु लोक अशी स्फूर्ती घेण्याऐवजी काम टाळण्यासाठी कुठली ना कुठली निमित्तं सांगत बसतात. त्यामुळं ती स्वतःचंच सुख गमावून बसतात. संत तुकारामांनी कामचुकार लोकांच्या विशिष्ट प्रवृत्तीवर अचूक बोट ठेवलं असून ती प्रवृत्ती दूर ठेवण्याची दृष्टी दिली आहे.

(संग्राहकसंजय दत्तात्रय सोमवंशी-पाटील )
९४२२३४५३६८
 

Saturday, 25 February 2017

संत तुकारामांचे अभंगशतक (संसार ४८)

मनुष्य कोणता का व्यवसाय करीत असेना, तो जर प्रामाणिकपणे कष्ट करीत असेल, तर धनसंपत्ती त्याच्याकडं आपोआप चालून येते, हे व्यापाराचं उदाहरण देऊन तुकारामांनी एका अभंगात स्पष्ट केलं आहे. ते म्हणतात,

४८

धनवंता घरीं ! करी धन चि चाकरी !!१!!
होय बैसल्या व्यापार ! न लगे सांडावे चि घर !!२!!
रानीं वनीं द्वीपीं ! असती ती होती सोपी !!३!!
तुका म्हणे मोल ! देता काही नव्हे खोल !!४!!
                  (अभंग क्र. २७९९)

ज्यानं प्रयत्न करून धन मिळवलेलं असतं, त्याच्या घरी धनच चाकरी करू लागतं. व्यापाराचं उदाहरण घेतलं, तरी हे स्पष्ट होतं. व्यापार घरबसल्या होत असतो. ग्राहक व्यापाऱ्याकडं येत असल्यामुळं व्यापाऱ्याला घर सोडावं लागतच नाही. मनुष्य रानात असो, वनात असो अथवा बेटावर असो, त्याच्याकडं धन असलं, की त्याची सगळी कामं सोपी होतात. त्याला जे काही हवं असतं, त्याची किंमत मोजली, की त्याला सर्व काही मिळतं, त्याच्या दृष्टीने काही अवघड रहात नाही. संसार सुखाचा करू इच्छिणाऱ्या माणसानं धनाचा द्वेष करू नये, कोणता ना कोणता उद्योग नीट करून धन मिळवावं आणि त्याच्या आधारे आपलं जीवन सफल करावं, हा तुकारामांचा मोलाचा सल्ला आहे.

(संग्राहक संजय दत्तात्रय सोमवंशी-पाटील)
९४२२३४५३६८
 

Saturday, 18 February 2017

संत तुकारामांचे अभंगशतक (संसार ४७)

संसार
      संसार यशस्वी कसा करावा, याचं अगदी व्यावहारिक आणि तरीही सैद्धांतिक स्वरूपाचं वर्णन करणारा त्यांचा एक अभंग अतिशय विख्यात आहे. त्यामधे ते म्हणतात,

४७

जोडोनिया धन उत्तम वेव्हारें ! उदास विचारें वेच करी !!१!!

उत्तम चि गती तो एक पावेल ! उत्तम भोगील जीव खाणी !!२!!

परउपकारी नेणे परनिंदा ! परस्त्रिया सदा बहिणी माया !!३!!

भूतदया गाईपशूचे पालन ! तान्हेल्या जीवन वनामाजी !!४!!

शांतिरूपे नव्हे कोणाचा वाईट ! वाढवी महत्त्व वडिलांचे !!५!!

तुका म्हणे हे चि आश्रमाचे फळ ! परमपद बळ वैराग्याचे !!६!!
                          (अभंग क्र. २८६४)

            उत्तम व्यवहार करून धन जोडावं. याचा अर्थ ते गैरमार्गानं मिळवू नये. कुणाला फसवून, कुणाला लुबाडून मिळवू नये. दुसऱ्याच्या कष्टाचं फळ आपण ओरबडून घेऊ नये. कष्ट करावेत. राबावं. घाम गाळावा. शहाणपणानं नेटका, निर्दोष व्यवहार करावा आणि या पद्धतीनं धन मिळवावं. समृद्धी उभी करावी. अशा नैतिक मार्गानं मिळवलेलं जे धन असेल, त्याच्या मोहात मात्र अडकू नये. त्याची आसक्ती धरू नये. त्याचा योग्य उपयोग जरूर करावा, पण तो काहीसा तटस्थपणानं, अलिप्त वृत्तीनं करावा. संपत्तीच्या बाबतीत अत्यंत संतुलित भूमिका तुकारामांनी इथं मांडल्याचं आढळतं. जो मनुष्य इतक्या विचारी पद्धतीनं वर्तन करील, तो उत्तम गतीच प्राप्त करील. त्याचं कल्याण होईल. इथं परंपरागत पद्धतीनं पारलौकिक गतीही तुकारामांना अभिप्रेत असली, तरी ते ऐहिक गतीलाही अचूकपणे लागू पडतं, यात शंका नाही.
           वर्तनाचे आणखीही काही नियम तुकारामांनी इथं सांगितले आहेत. माणसानं दुसऱ्यावर उपकार करावा. अडीअडचणीत असलेल्या, गोरगरीब, दुःखीकष्टी माणसांना मदत करावी. या उपदेशानुसार वागणारा हा मनुष्य दुसऱ्याची निंदाही करीत नाही. याचा अर्थ दुसऱ्याचा मत्सर करण्याची, द्वेष करण्याची त्याची वृत्ती नसते. परस्त्रियांना तो मायबहिणींप्रमाणं मानतो. याचा अर्थ तो आपलं शील जपतो. पत्नीची अवहेलना करीत नाही. तिच्याशी सुखसमाधानानं संसार करतो. त्याच्या अंगी भूतदया असते. प्राणिमात्रांविषयी कणव असते. आपलेपणा असतो. त्यांच्या सुखदुःखांत सहभागी होण्याची वृत्ती असते. तो गाईंचं व इतर गुरांचं नीट पालन करतो. त्यांची काळजी घेतो. त्याद्वारे घरात दूधदुभतं भरपूर मिळेल, अशी व्यवस्था करतो. रानावनात कोणी तहानलेला असेल, तर त्याला पाणी देतो. याचा अर्थ कोणी संकटात असला, तर त्याला मदतीचा हात देतो. त्याच्याशी बेपर्वाईनं वागत नाही. त्याची उपेक्षा करीत नाही. त्याच्याशी आपलं काय देणं-घेणं आहे, अशी भूमिका घेत नाही. तो आपली मनःशांती ढळू देत नाही. माणसाच्या जीवनात अनेकदा अस्वस्थ होण्यासारखे प्रसंग येतात. संकटांचे आघात होतात. निंदा-टीका पचवण्याचे प्रसंग येतात. परंतु हे सर्व शांतपणे झेलण्याची मनोवृत्ती त्यांच्याकडं असते. तो अशा प्रसंगांमुळं खचून जात नाही. आपला तोल जाऊ देत नाही. मनःशांती ढळू देत नाही. तो कुणाचंही वाईट चिंतत नाही. दुसऱ्याचं नुकसान व्हावं, म्हणून त्यांच्या मार्गात काटे पेरण्याचा दुष्टावा करीत नाही. अशा प्रकारच्या वर्तनामुळं तो आपल्या वडिलांचं महत्त्व वाढवतो. आपल्या वाडवडिलांचा, पूर्वजांचा लौकिक वाढवतो. अमुक-अमुक दांपत्याचा मुलगा असा विवेकी, निःस्पृह, संयमी, समंजस, कर्तबगार आहे, असं लोक म्हणतात, तेव्हा त्याच्या आईवडिलांचा गौरव होतो. अशा प्रकारचं अत्यंत समाधानी, तृप्त, निरामय जीवन हेच गृहस्थाश्रमाचं फळ होय. संसार करायचा, तो अशा प्रकारचं आनंदी जीवन भोगण्यासाठीच होय. संपत्तीची हाव धरून, त्यासाठी अनिष्ट मार्ग पत्करून, इतरांना लुबाडून, अन्याय करून वैभव उभं करणं आणि विलासात, सुखोपभोगात लोळणं, हे काही गृहस्थाश्रमाचं प्रयोजन नव्हे. संसारात राहून संयत जीवन जगणं, ही खरं तर वैराग्याची सर्वोच्च अवस्था म्हटली पाहिजे, हे वैराग्याचं सामर्थ्य म्हटलं पाहिजे. वैराग्य अनुभवण्यासाठी बैरागी होण्याची वा संन्यास घेण्याची गरज नाही. संसारात राहून, संयमपूर्वक अनुरागी बनूनही वैराग्याचा अनुभव घेता येतो, यात शंका नाही.

(संग्राहक: संजय दत्तात्रय सोमवंशी-पाटील)
९४२२३४५३६८