संसार
संसार यशस्वी कसा करावा, याचं अगदी व्यावहारिक आणि तरीही सैद्धांतिक स्वरूपाचं वर्णन करणारा त्यांचा एक अभंग अतिशय विख्यात आहे. त्यामधे ते म्हणतात,
४७
जोडोनिया धन उत्तम वेव्हारें ! उदास विचारें वेच करी !!१!!
उत्तम चि गती तो एक पावेल ! उत्तम भोगील जीव खाणी !!२!!
परउपकारी नेणे परनिंदा ! परस्त्रिया सदा बहिणी माया !!३!!
भूतदया गाईपशूचे पालन ! तान्हेल्या जीवन वनामाजी !!४!!
शांतिरूपे नव्हे कोणाचा वाईट ! वाढवी महत्त्व वडिलांचे !!५!!
तुका म्हणे हे चि आश्रमाचे फळ ! परमपद बळ वैराग्याचे !!६!!
(अभंग क्र. २८६४)
उत्तम व्यवहार करून धन जोडावं. याचा अर्थ ते गैरमार्गानं मिळवू नये. कुणाला फसवून, कुणाला लुबाडून मिळवू नये. दुसऱ्याच्या कष्टाचं फळ आपण ओरबडून घेऊ नये. कष्ट करावेत. राबावं. घाम गाळावा. शहाणपणानं नेटका, निर्दोष व्यवहार करावा आणि या पद्धतीनं धन मिळवावं. समृद्धी उभी करावी. अशा नैतिक मार्गानं मिळवलेलं जे धन असेल, त्याच्या मोहात मात्र अडकू नये. त्याची आसक्ती धरू नये. त्याचा योग्य उपयोग जरूर करावा, पण तो काहीसा तटस्थपणानं, अलिप्त वृत्तीनं करावा. संपत्तीच्या बाबतीत अत्यंत संतुलित भूमिका तुकारामांनी इथं मांडल्याचं आढळतं. जो मनुष्य इतक्या विचारी पद्धतीनं वर्तन करील, तो उत्तम गतीच प्राप्त करील. त्याचं कल्याण होईल. इथं परंपरागत पद्धतीनं पारलौकिक गतीही तुकारामांना अभिप्रेत असली, तरी ते ऐहिक गतीलाही अचूकपणे लागू पडतं, यात शंका नाही.
वर्तनाचे आणखीही काही नियम तुकारामांनी इथं सांगितले आहेत. माणसानं दुसऱ्यावर उपकार करावा. अडीअडचणीत असलेल्या, गोरगरीब, दुःखीकष्टी माणसांना मदत करावी. या उपदेशानुसार वागणारा हा मनुष्य दुसऱ्याची निंदाही करीत नाही. याचा अर्थ दुसऱ्याचा मत्सर करण्याची, द्वेष करण्याची त्याची वृत्ती नसते. परस्त्रियांना तो मायबहिणींप्रमाणं मानतो. याचा अर्थ तो आपलं शील जपतो. पत्नीची अवहेलना करीत नाही. तिच्याशी सुखसमाधानानं संसार करतो. त्याच्या अंगी भूतदया असते. प्राणिमात्रांविषयी कणव असते. आपलेपणा असतो. त्यांच्या सुखदुःखांत सहभागी होण्याची वृत्ती असते. तो गाईंचं व इतर गुरांचं नीट पालन करतो. त्यांची काळजी घेतो. त्याद्वारे घरात दूधदुभतं भरपूर मिळेल, अशी व्यवस्था करतो. रानावनात कोणी तहानलेला असेल, तर त्याला पाणी देतो. याचा अर्थ कोणी संकटात असला, तर त्याला मदतीचा हात देतो. त्याच्याशी बेपर्वाईनं वागत नाही. त्याची उपेक्षा करीत नाही. त्याच्याशी आपलं काय देणं-घेणं आहे, अशी भूमिका घेत नाही. तो आपली मनःशांती ढळू देत नाही. माणसाच्या जीवनात अनेकदा अस्वस्थ होण्यासारखे प्रसंग येतात. संकटांचे आघात होतात. निंदा-टीका पचवण्याचे प्रसंग येतात. परंतु हे सर्व शांतपणे झेलण्याची मनोवृत्ती त्यांच्याकडं असते. तो अशा प्रसंगांमुळं खचून जात नाही. आपला तोल जाऊ देत नाही. मनःशांती ढळू देत नाही. तो कुणाचंही वाईट चिंतत नाही. दुसऱ्याचं नुकसान व्हावं, म्हणून त्यांच्या मार्गात काटे पेरण्याचा दुष्टावा करीत नाही. अशा प्रकारच्या वर्तनामुळं तो आपल्या वडिलांचं महत्त्व वाढवतो. आपल्या वाडवडिलांचा, पूर्वजांचा लौकिक वाढवतो. अमुक-अमुक दांपत्याचा मुलगा असा विवेकी, निःस्पृह, संयमी, समंजस, कर्तबगार आहे, असं लोक म्हणतात, तेव्हा त्याच्या आईवडिलांचा गौरव होतो. अशा प्रकारचं अत्यंत समाधानी, तृप्त, निरामय जीवन हेच गृहस्थाश्रमाचं फळ होय. संसार करायचा, तो अशा प्रकारचं आनंदी जीवन भोगण्यासाठीच होय. संपत्तीची हाव धरून, त्यासाठी अनिष्ट मार्ग पत्करून, इतरांना लुबाडून, अन्याय करून वैभव उभं करणं आणि विलासात, सुखोपभोगात लोळणं, हे काही गृहस्थाश्रमाचं प्रयोजन नव्हे. संसारात राहून संयत जीवन जगणं, ही खरं तर वैराग्याची सर्वोच्च अवस्था म्हटली पाहिजे, हे वैराग्याचं सामर्थ्य म्हटलं पाहिजे. वैराग्य अनुभवण्यासाठी बैरागी होण्याची वा संन्यास घेण्याची गरज नाही. संसारात राहून, संयमपूर्वक अनुरागी बनूनही वैराग्याचा अनुभव घेता येतो, यात शंका नाही.
(
संग्राहक: संजय दत्तात्रय सोमवंशी-पाटील)
९४२२३४५३६८