Sunday, 18 September 2022

संत तुकारामांचे अभंगशतक ( शुद्धता ७५)

                   (शुद्धता  ७५)

         माणसाचं स्वत:चं वर्तन अशुद्ध, सदोष, अनैतिक असलं, की त्याला बाकीचं सगळं जगही तसंच असल्यासारखं वाटतं. हे सांगताना तुकाराम म्हणतात,

७५ 
आंधळ्यासि जन अवघे चि आंधळे । आपणासि डोळे दृष्टी नाही ॥१॥ 
रोग्याविषतुल्य लागे हे मिष्टान्न । तोंडासि कारण चवी नाही ।।२।। 
तुका म्हणे शुद्ध नाही जो आपण । तया त्रिभुवन अवघे खोटे ।।३।। 
(अ.क्र. ३०२)

        आंधळ्या माणसाला स्वत: ला दृष्टी नसते. त्यामुळं त्याला सगळं जगही आंधळं असल्यासारखं वाटतं. जो रोगी असतो, त्याच्या तोंडाला रोगामुळे चव नसते आणि त्यामुळे त्याला मिष्टान विषासारखं लागतं. माणसाचंही तसंच आहे. जो स्वतः शुद्ध नसतो, त्याला सगळं त्रिभुवन खोटं असल्यासारखं वाटतं.

डॉ. आ.ह. साळुंखे सर
(संग्राहक: संजय दत्तात्रय सोमवंशी पाटील)
९४२२३४५३६८

संत तुकारामांचे अभंगशतक ( शुद्धता ७४ )

                     (शुद्धता  ७४)

जगात ज्या गोष्टी वाईट असतात, ज्या गोष्टी आपल्याला आवडत नाहीत, त्या देखील आपल्यावर उपकार करतात, असा एक आगळा विचार तुकारामांनी एका अभंगात मांडला आहे. ते म्हणतात,

७४ 
वाइटाने भले हीनें दाविले चांगले ।।१।। एकाविण एका कैचे मोल होते फुका ।।२।।
विधे दाविले अमृत कडू गोड घाते हित ॥३॥
काळिमेने ज्योती दिवस कळो आला राती ॥४॥
उंच निंच गारा हिरा परिस मोहरा ॥५॥
तुका म्हणे भले ऐसे नष्टांनी कळले ॥६॥ 
(अभंग.क्र. १७२२)

जे वाईट आहे, त्याचा अनुभव घेतला, की जगात चांगलं काय आहे ते कळतं. म्हणजे वाईट गोष्टच आपल्याला चांगल्या गोष्टीची ओळख करून देते. जे हिणकस आहे, त्याच्याकडं पाहिलं, की दर्जेदार आणि अस्सल काय असतं, ते खऱ्या अर्थानं कळतं. जगात वाईट गोष्ट असल्याशिवाय चांगल्या गोष्टीची किंमत कळत नाही. ती गोष्ट अतिशय मौल्यवान असूनही फुकट मिळण्यासारखी आहे, असं लोकांना वाटतं. विषामुळे अमृताचं मोल कळतं, कडू पदार्थामुळं गोड पदार्थाची किंमत कळते घात करणारी गोष्ट अनुभवली, की हितकारक गोष्टीचं महत्त्व समजतं. काळिमा लावणाऱ्या गोष्टीमुळे ज्योतीचं खरं स्वरूप कळतं. रात्रीमुळे दिवसाचं महत्व समजतं. ओबडधोबड गारगोटीमुळं हिरा, परीस, मोहरा यांचं महत्त्व कळतं. अशा रीतीनं दुर्जनांमुळं सज्जनांचं महत्त्व कळतं.

डॉ. आ. ह. साळुंखे सर
(संग्राहक: संजय दत्तात्रय सोमवंशी पाटील)
९४२२३४५३६८

संत तुकारामांचे अभंगशतक ( शुद्धता ७३ )

                    (शुद्धता  ७३)

         आपलं वर्तन विशुद्ध असावं, चारित्र्य निर्दोष असावं, यावाबतीत तुकाराम अतिशय आग्रही होते. एका अभंगात ते म्हणतात,

७३ 
शुद्धबीजा पोटीं । फळे रसाळ गोमटी ।।१।।
मुखीं अमृताची वाणी । देह वेचावा कारणीं ॥२॥ 
सर्वांग निर्मळ । चित्त जैसे गंगाजळ || ३ ॥
तुका म्हणे जाती । ताप दर्शनें विश्रांती ।। ४ ।। (अभंग. क्र. ६२)

          जे बीज शुद्ध असतं, त्याचा वंशविस्तार झाल्यानंतर त्याला येणारी फळंही तशीच शुद्ध असतात, रसाळ आणि सुंदर असतात. म्हणून माणसानं आपल्या तोंडी अमृताची वाणी असू द्यावी. याचा अर्थ लोकांशी बोलताना जे हिताचं असेल, कल्याणाचं असेल आणि मधुरही असेल, ते बोलावं, आपला देह, आपलं सगळं जीवन हे कारणी लावावं, चांगल्या कामासाठी खर्ची घालावं. मन गंगेच्या पाण्याप्रमाणं सर्व बाजूंनी निर्मळ ठेवावं. आपलं अवघं जीवन असं बनलेलं असलं, म्हणजे आपल्या सहवासात येणाऱ्या लोकांची सगळी दुःख दूर होतात. आपल्या भेटीनं त्यांचे ताप नाहीसे होतात, त्यांना विसावा मिळतो, मनःशांती मिळते, त्यांचे जीव सुखावतात.

डॉ. आ. ह. साळुंखे सर
(संग्राहक: संजय दत्तात्रय सोमवंशी पाटील)
९४२२३४५३६८

Friday, 2 September 2022

संत तुकारामांचे अभंगशतक ( सत्य ७२ )

                      सत्य ७२

            सगळी माणसं माणूस म्हणून समान असली, तरी चारित्र्य, शील, कर्तृत्व इ. कारणांनी त्यांच्यामधे योग्य तो फरक करणं, हेच विवेकाचं लक्षण असतं. काही उदाहरणांच्या द्वारे हे स्पष्ट करताना तुकाराम म्हणतात,

७२ 
दह्याचिया अंगीं निघे ताक लोणी । एका मोलें दोन्ही मागो नये ॥१॥ 
आकाशाचे पोटीं चंद्र तारांगणे । दोहींशी समान पाहो नये ।।२।। 
पृथ्वीचा पोटीं हिरा गारगोटी । दोहोंसी संसाटी करू नये ।।३।।
तुका म्हणे तैसे संत आणि जन । दोहींसी समान भजू नये ॥४॥

(अभंग. क्र. २४९२)

            एकाच दह्यामधून ताक आणि लोणी निघतं. ते एकाच ठिकाणाहून निघालं आहे. एवढ्या कारणानं त्या दोन्ही पदार्थांना एकाच किमतीत मागू नये. आकाशामधे चंद्र आणि तारांगणं असतात. परंतु दोघांकडं समान दृष्टीनं पाहू नये. पृथ्वीच्या पोटी हिराही सापडतो आणि गारगोटीही सापडते, परंतु दोहोंना समान मानू नये. त्याच पद्धतीनं संत परोपकार, करुणा, शील इ. कारणांनी सर्वसामान्य लोकांपेक्षा अधिक उन्नत असतात. म्हणून, त्या दोघांना समान मानू नये. उलट, सामान्य माणसांनी संतांच्या जीवनाचा आदर्श आपल्या नजरेसमोर ठेवून आपल्या जीवनाची वाटचाल करावी. आपल्याला प्रेरणा देणाऱ्या सर्व महामानवांच्या बाबतीत आपला हाच दृष्टिकोण असावा.

डॉ. आ. ह. साळुंखे सर

(संग्राहक: संजय दत्तात्रय सोमवंशी पाटील)
९४२२३४५३६८

संत तुकारामांचे अभंगशतक ( सत्य ७१ )

                ‌‌     सत्य ७१

माणसानं जीवनाच्या प्रवासात निर्भेळ सत्य मिळवावं, हे सांगताना ते म्हणतात, 

७१ 
थोडे परी निरे । अविट ते घ्यावे खरे ॥ १॥
घ्यावे जेणें नये तुटी । बीज वाढे बीजा पोटीं ॥२॥
चित्त ठेवी ग्वाही । आणिकांशी चाड नाही ॥३॥
आपले ते हित फार । तुका म्हणे खरे सार ॥४॥

 (अभंग. क्र.५७८)

माणसानं जे विशुद्ध आणि खरं असेल, ते घ्यावं. ते थोडं असलं, तरी त्याची गोडी अबीट असते. तेच हितकारक असतं. ज्यामुळं नुकसान होणार नाही, ते घ्यावं. ते थोडं असलं, तरी आपोआप वाढत जातं. एका बीजाच्या पोटी वाढता वाढता असंख्य बीजं निर्माण होतात. सत्यही असंच वाढत जातं. आपण जे स्वीकारतो, ते सत्य आहे अशी आपल्या मनानं ग्वाही देणं, हे खरं महत्त्वाचं असतं. इतर लोक काय म्हणतात, याची पर्वा करण्याची गरज नसते. सारभूत सत्य प्राप्त होणं, हे आपलं खरं हित असतं. आपण त्याच्यावरच लक्ष केंद्रित करावं.

डॉ. आ. ह. साळुंखे सर

(संग्राहक: संजय दत्तात्रय सोमवंशी पाटील)
९४२२३४५३६८

संत तुकारामांचे अभंगशतक ( सत्य ७० )

                        सत्य ७०

असत्याचा प्रसार करणाऱ्या दुष्टांसारखं आपलं वर्तन नाही, हे तुकारामांनी आवर्जून सांगितलं आहे. ते म्हणतात,

७० 
नव्हे खळवादी मता च पुरता । सत्याची हे सत्ता उपदेश ॥ १॥ 
साक्षत्वेसी मना आणावी उत्तरे । परिपाकी खरे खोटे कळे ॥२॥
नव्हे एकदेशी शब्द हा उखता । ब्रह्मांडापुरता घेईल त्यासी ॥३॥
तुका विनवणी करी जाणतिया । बहुमतें वाया श्रमो नये ॥४॥

(अभंग. क्र. १४६४) 

          एखादा मनुष्य आपली दुष्टपणाची मतं मांडत असतो. त्याचं सगळं बोलणं आपली या प्रकारची मतं मांडण्यापुरतंच मर्यादित असतं. मी या माणसासारखा नाही, माझा उपदेश हा सत्याची सत्ता प्रस्थापित करण्यासाठी आहे, असं स्पष्ट आत्मनिवेदन तुकारामांनी केलं आहे. सत्य-असत्य यांच्या बाबतीत साक्षच काढायची असेल, तर दुष्टाचं बोलणं आणि माझं बोलणं यांची तुलना करावी, म्हणजे अखेरीस खरं काय आणि खोटं काय ते कळू शकेल, असं ते म्हणतात. माझा शब्द, माझं बोलणं, माझा उपदेश एकांगी वा संकुचित नाही, जो कोणी त्याला समजून घेईल त्याच्या दृष्टीनं तो विश्वव्यापक आहे, असंही ते म्हणतात. आत्मविश्वासानं आणि निर्धारानं हे नोंदविल्यानंतर ते जाणत्या लोकांना एक विनवणी करतात. दुष्ट माणसं आपली जी खूप काही मतं मांडत असतात, त्यांच्या नादी लागून आपले श्रम वाया घालवू नयेत, ही त्यांची विनंती आहे. एकीकडून आत्मविश्वास आणि दुसरीकडून विनम्रता, हा त्यांच्या या अभंगाचा खास वेगळेपणा आहे.

डॉ. आ. ह. साळुंखे सर

(संग्राहक: संजय दत्तात्रय सोमवंशी पाटील)
९४२२३४५३६८

संत तुकारामांचे अभंगशतक (सत्य ६९ )

                      सत्य ६९

          तुकारामांनी आयुष्यभर आपल्या अभंगांतून सत्याचा गौरव केल्याचं आढळतं. ते म्हणतात,

६९ 
जाणावे ते सार । नाही तरी दगा फार ।।१।।
डोळे झांकिलिया रवि । नाही ऐसा होय जेवी ॥२॥ 
बहुथोड्या आड निवारिता लाभ जाड ।।३।।
तुका म्हणे खरे । नेले हातीचे अंधारें ।।४।।

(अभंग. क्र. २०८७)

        जे सारभूत आहे, यथार्थ सत्य आहे, ते जाणावं. नाही तर माणसाची मोठी फसवणूक होते. असत्याच्या पाठीमागं धावणाराला मोठा फटका बसतो. सत्य कधी लपून रहात नसतं. ते सूर्याप्रमाणं स्वयंप्रकाशी असतं. सूर्य प्रकाशत असतानाही आपण डोळे मिटून घेतले, तर सूर्य जणू काही अस्तित्वात नाही, असा भास होऊ शकतो. सत्याच्या बाबतीतही अशीच स्थिती असते. आपण सत्याकडं डोळेझाक केली, तरी सत्याचं अस्तित्व लोप पावत नाही. सत्याच्या आड येणारे जे काही थोडे बहुत अडथळे असतात ते दूर केले, की आपल्याला मोठा लाभ प्राप्त होतो. याउलट, आपण अज्ञानाच्या अंधारालाच चिकटून बसलो, तर सत्य आपल्याला दुरावतं. असं घडू नये, म्हणून आपण सावध रहावं.

डॉ. आ. ह. साळुंखे सर

(संग्राहक: संजय दत्तात्रय सोमवंशी पाटील)
९४२२३४५३६८