(आईवडील) अभंग ३
लागलिया मुख स्तनां | घाली पान्हा माऊली ||१||
उभयतां आवडी लाडें |कोडें कोड पुरतसे ||२||
मेळविता अंगे अंग | प्रेमें रंग वाढतो ||३||
तुका म्हणे जड भारी | अवघे शिरीं जननीचे ||४||
(अभंग क्र. ८३१)
(आईवडील) अभंग ४
न लगे मायेसी बाळें निरवावे |
आपुल्या स्वभावें ओढे त्यासी ||१||
मज का लागला करणे विचार ? |
ज्याचा त्याचा भार त्याचे माथां ||२||
गोड धड त्यासी ठेवी न मागता |
समाधान खाता नेदी मना ||३||
खेळता गुंतले उमगूनी आणी |
बैसोनिया स्तनीं लावी बळें ||४||
त्याच्या दुःखेपणें आपण खापरीं |
लाही तळीं वरी होय जैसी ||५||
तुका म्हणे देह विसरे आपुला |
आघात तो त्याला लागो नेदी ||६||
(अभंग क्र. १२३३)
दूध पिण्यासाठी मूल आईच्या छातीला तोंड लावतं आणि आईला पान्हा फुटतो, हा मुलाचं मूलपण आणि आईचं आईपण तृप्त करणारा एक उदात्त आनंदसोहळा असतो. तुकाराम महाराजांनी इथं त्या सोहळ्याचं चित्रच आपल्या डोळ्यांपुढं उभं केलं आहे. आई मुलाचे जे लाड करते, त्यामुळं उभयतांना आनंद होतो. ती कौतुकानं त्याला अंगावर पाजतो, तेव्हा मायलेकरांना होणारा एकमेकांचा स्पर्श हा वात्सल्याला उत्कट बनविणारा असतो. खरं तर आई आणि मूल यांचं नातंच असं आहे, की मुलाला कशाचीही चिंता करावी लागत नाही. जे काही जड जाणारं असेल, भारी पडणारं असेल, त्याची देखील त्याला काळजी नसते. त्या सगळ्याचा भार आईनं आनंदानं आपल्या डोक्यावर घेतलेला असतो.
विठ्ठलाने आपला म्हणजे तुकारामांचा भार स्वतःच्या मस्तकावर घ्यावा, त्यांना स्वतःला कसली काळजी करायला लावू नये, असं त्याला विनवताना तुकाराम आईचं उदाहरण देतात. आपल्याला अमुक एक गोष्ट हवी, असं मुलानं आईला सांगण्याची वेळ देखील येत नाही. आई आपल्या आईपणाच्या स्वभावानंच त्याला जवळ ओढून घेते. खरं तर मूल तिच्या गर्भात असतं, तेव्हापासूनच तिनं त्याचा भार आपल्या मस्तकावर घेतलेला असतो. त्यानं काही मागितलेलं नसताना ती त्याच्यासाठी गोडधोड ठेवते. त्यानं पोट भरुन खाल्लं, तरी तिचं समाधान होत नाही, त्यानं आणखी खावं असं तिला वाटत राहतं. ते खेळण्यात गुंतलेलं असलं, तरी ती त्याला समजावून आणते आणि जबरदस्तीनं त्याला अंगावर पाजते. त्याला काही दुःख झालं, तर लाह्या भाजण्याच्या खापरावर लाही जशी वरखाली होते, तसा तिचा जीव वरखाली होतो. ती आपलं शरीर विसरुन जाते, परंतु त्याला कसलाही आघात पोचू देत नाही. आईच्या प्रेमाची निरपेक्षता आणि समर्पणशीलता खरोखरच पराकाष्ठेची असते.