शेती हा संत तुकारामांचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय होता. शेतीच्या बाबतीत अक्षरशः असंख्य तपशील त्यांनी शेती करण्याच्या स्वानुभवातूनच मिळविले होते. शेती करणाऱ्यांसाठी त्यांनी आपले हे अनुभव पुनःपुन्हा सांगितले आहेत. त्याबरोबरच, शेतीमधील अनुभव सांगता सांगता जीवनाच्या सर्व क्षेत्रातून उपयोगी पडणारी व्यापक मार्गदर्शक तत्त्वे विपुल प्रमाणात आपल्या हाती दिली आहेत.
पिकाची राखण करण्यासाठी शेतकऱ्यानं किती काळजी घेतली पाहिजे, याविषयी तुकाराम एका अभंगात म्हणतात,
५३
सेत आले सुगी सांभाळावे चारी कोण ! पिका आले परी केले पाहिजे जतन !!१!!
सोंकरी सोंकरी विसावा तोवरी ! नको खाऊ उभे आहे तों !!२!!
गोफणेसी दिंडी घाली पागोऱ्याच्या नेटें ! पळती हाहाकारें अवघी पाखरांची थाटे !!३!!
पेटवूनि आगटी राहे जागा पालटूनि ! पडिलिया मान बळ बुद्धि व्हावी दोनी !!४!!
खळे दानें विश्व सुखी करी होता रासी ! सारा सारूनिया ज्याचे भाग देई त्यासी !!५!!
तुका म्हणे मग नाही आपुले कारण ! निज आले हातां भूस सांडिले निकण !!६!!
(अभंग क्र. ११४९)
शेतकऱ्याला सदैव जागरूक राहण्याचा, नित्य सावध राहण्याचा सल्ला देणारा हा अभंग शब्दरचना आणि आशय या दोहोंच्या विलक्षण लावण्यानं नटला आहे. आपलं जीवन सुखीसमाधानी व यशस्वी करू इच्छिणाऱ्या सर्वच व्यक्तींच्या दृष्टीनं तो आस्वाद्य बनला आहे.
एखाद्यानं अपार कष्ट करून एखाद्या सुंदर गोष्टीची निर्मिती केली आणि नंतर तिचं रक्षण करण्याच्या बाबतीत हलगर्जीपणा केला, तर निर्माण केलेलं सगळं गमावून बसण्याचा धोका निर्माण होतो. तसं घडू नये, म्हणून तुकारामांनी अत्यंत तळमळीनं सोंकरीला चार गोष्टी सांगितल्या आहेत. सोंकरी म्हणजे राखण करणारा. मशागत करून, खोल ओलीला बी टाकणारी पेरणी करून, योग्य वेळी पुनःपुन्हा पाणी देऊन आणि तन काढून पिकाची सर्व प्रकारे काळजी घेतल्यानंतर पीक कणसांनी बहरून येतं. कणसं दाण्यांनी काठोकाठ भरतात. शेतावर नजर टाकली, की शेतकऱ्याचा ऊर अभिमानानं भरून येतो. सुगी झाल्यावर घरामधे जणू काही ऋद्धि-सिद्धी नांदू लागणार, असं वाटून पुढच्या वर्षभरात काय-काय करायचं, याची मधुर स्वप्नं त्याच्या डोळ्यात तरळू लागतात. पण हीच वेळ जागं राहण्याची असते. थोडासा बेसावधपणा झाला, तर डोळ्यांपुढं चमकणारं सगळं वैभव लुटलं जाण्याचा धोका असतो. म्हणून शेत सुगीवर आलं, पीक पक्व झालं, की शेतकऱ्यानं चारी कोपऱ्यांनी शेताची राखण करण्याची व्यवस्था केली पाहिजे. सर्व बाजूंनी ते सांभाळलं पाहिजे. शेतात समृद्ध पीक आलं आहे हे खरं, पण त्याचं काळजीपूर्वक जतन केलं पाहिजे. 'सोंकरी सोकरी विसावा तोंवरी ! नको खाऊ', या रचनेतील नादमाधुर्य जितकं हृद्य आहे, तितकंच त्याचं अर्थसौंदर्यही मनोज्ञ आहे. जोपर्यंत पीक शेतात उभं आहे, मळणी हिउन धान्य घरात आलेलं नाही, तोपर्यंत शेतकऱ्यानं विसावा घेता कामा नये. कणसं दाण्यांनी भरल्याचं पाहून त्यांच्यावर झडप घालण्यासाठी पाखरांचे थवेच्या थवे शेतावर घिरट्या घालू लागतात. त्या वेळी शेतकऱ्यानं हातात गोफण घेऊन नेटानं त्या पाखरांवर दगड मारले, म्हणजे पाखरांचे थवे घाबरून उडून जातात. त्यांना घाबरवण्यासाठी शेतकऱ्यानं आगटीही पेटवावी. सतत एकाच जागेवर थांबल्यास पाखरं दुसऱ्या बाजूनं हल्ला करण्याची शक्यता असते, म्हणून आलटून-पालटून वेगवेगळ्या ठिकाणी उभं राहून गोफण चालवावी. गरज पडेल, त्यानुसार बळ आणि बुद्धी या दोहोंचा वापर करावा. पाखरांप्रमाणेच चोर-लुटारुंपासूनही शेताचं रक्षण करावं लागतं. अशा वेळी कधी बळाचा प्रयोग करावा लागतो, तर कधी बुद्धी वापरून संकटावर मात करावी लागते. अशा रीतीने सर्व प्रकारे काळजी घेतली, की मग खळ्यामधे धान्याच्या राशी तयार होतात. खळ्यामधे तयार झालेली धान्याची एक-एक रास त्याच्या सगळ्या आशा-आकांक्षा पूर्ण करून टाकते. तो ते धान्य उपणतो. धान्याचे कण त्याच्या हाती येतात. तो कणांचा अभाव असलेले भूस बाजूला सारतो. मग त्याला सर्व प्रकारचं सुख मिळतं. तो सरकारचा साराही भरू शकतो. बलुतेदार, सावकार, अतिथी वगैरेंना त्यांचा त्यांचा योग्य वाटाही देऊ शकतो. त्याच्या शेतीवर जे जे लोक अवलंबून असतात, त्या सर्वांना तर तो तृप्त करतोच, पण त्यांना तृप्त करून झाल्यावर त्याच्या घरात त्याच्या स्वतःच्या कुटुंबाला पुरून उरेल इतकं शिल्लक राहतं. आता त्याला काळजीचं कारण रहात नाही. त्याच्या घरामधे आनंद ओसंडून वाहू लागतो.
(संग्राहक: संजय दत्तात्रय सोमवंशी-पाटील)
९४२२३४५३६८