Sunday, 12 March 2017

संत तुकारामांचे अभंगशतक (संसार ५०)

श्रम न करता कोणाकडून फसवून वा लुबाडून काही घेणं आणि या मार्गानं श्रीमंत बनणं वा आपला संसार समृद्ध करणं तुकारामांना मान्य नव्हतं. एका अभंगात ते म्हणतात,
५०

चाकरीवाचून ! खाणे अनुचित वेतन !!१!!
धणी काढोनिया निजा ! करील ये कामाची  पूजा !!२!!
उचितावेगळे ! अभिलाषे तोंड काळे !!३!!
सांगे तरी तुका ! पाहा लाज नाही लोकां !!४!!
                 (अभंग क्र. २२१३)

ज्या कामासाठी वेतन घ्यायचं, ते काम न करता वेतन घेणं हे अनुचित होय. कुणीही कामचुकारपणा करू नये, हे समाजव्यवस्थेच्या निकोप धारणेसाठी आवश्यक असतं. परंतु अनेकदा समाजामधे वेगळं चित्र दिसतं. अनेकांना कष्ट नको असतात आणि सुखोपभोग मिळविण्याची मोठी लालसा मात्र असते. व्यक्तिगतदृष्ट्या हे अनैतिक असतं आणि समाजहिताच्या दृष्टीनंही घातक असतं. तुकारामांनी या अभंगाद्वारा तमाम लोकांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून दिली आहे. मालकाला जे काम करून घ्यायचं असतं, ते काम झाल्यानंतर तो काम करणाऱ्याच्या कामाची पूजा करतो. परंतु, जो या उचित पद्धतीपेक्षा वेगळं करतो आणि काम न करता वेतनाची अभिलाषा करतो, त्यांचं तोंड काळं होय. याचा अर्थ कामचुकारपणा करून वेतन घेणाऱ्याची अखेरीस अपकीर्तीच होते, तो लोकांच्या नजरेतून उतरतो, लोक त्याला ऐतखाऊ म्हणतात आणि खरं काम करण्याचा जो आनंद असतो, त्या आनंदालाही तो मुकतो. तुकाराम हे आग्रहानं सांगत असतानाही काही लोकांवर त्यांचा योग्य परिणाम होत नव्हताच, त्यांचा अनुकूल प्रतिसाद मिळत नव्हताच, त्यांच्यामधे परिवर्तन होत नव्हतंच. कितीही सांगितलं, तरी त्याकडं लक्ष न देणाऱ्या या लोकांना तुकाराम काहीशा त्राग्यानं निलाजरे म्हणतात.

(संग्राहक: संजय दत्तात्रय सोमवंशी-पाटील)
९४२२३४५३६८

Saturday, 11 March 2017

संत तुकारामांचे अभंगशतक (संसार ४९)

काम टाळण्याची प्रवृत्ती असलेले लोक कशा प्रकारे सबबी सांगतात, ते काहीशा विनोदी पद्धतीनं तुकारामांनी एका अभंगात पुढीलप्रमाणे नोंदविलं आहे:

४९
ढालतलवारें गुंतले हे कर ! म्हणे मी जुंझार कैसा झुंजो !!१!!
पेटी पडदळे सिले टोप ओझे ! हे तो जाले दुजे मरणमूळ !!२!!
बैसविले मला येणें अश्वावरी ! धावू पळू तरी कैसा आता ? !!३!!
असोनि उपाय म्हणे हे अपाय ! म्हणे हायहाय काय करू !!४!!
तुका म्हणे हा तो स्वयें परब्रह्म ! मूर्ख नेणे वर्म संतचरण !!५!!
                       (अभंग क्र. ४३४८)

         स्वतःला पराक्रमी समजणारा एक योद्धा म्हणतो, "मी झुंजार आहे, परंतु माझे हे हात ढाल आणि तलवार धरण्यात गुंतले आहेत, मग मी कसा झुंजू ? पोटावर तलवार अडकवण्यासाठी पट्टा आहे, हत्यारं आहेत, डोक्यावर जिरेटोप आहे. हे ओझं तर मरणाचं दुसरं कारण झालं आहे. यानं मला घोड्यावर बसविलं आहे. मी आता धावू-पळू तरी कसा ?" अशा रीतीनं उपाय ठरणाऱ्या गोष्टींना तो अपाय म्हणत आहे. तो 'हाय हाय, मी काय करू ?' असं म्हणत आहे. तुकाराम म्हणतात, "खरं तर हा स्वतः परब्रह्म आहे. परंतु, हे कळण्यासाठी संतांच्या चरणाजवळ बसलं पाहिजे, हे रहस्य या मूर्खाला कळत नाही."
         ज्या गोष्टी यशाचं साधन बनू शकतात, त्या गोष्टीच आपल्या यशाच्या मार्गातील अडथळा आहेत, असं सांगून काम टाळणाऱ्या लोकांचं हे वर्णन वरवर पाहता अतिशयोक्तीचं वाटलं, तरी प्रत्यक्षात अशा सबबी सांगण्याची प्रवृत्ती आपल्याला सर्रास आढळते. माणसाकडं मोठमोठी कामं करण्याची प्रचंड शक्ती असते. परंतु अनेकदा त्याला स्वतःकडं असलेल्या त्या शक्तीचं भान नसतं. तो प्रेरणा देणाऱ्या लोकांच्या सहवासात राहिला असता, त्याला आपल्या या शक्तीचं भान येऊ शकतं. तो त्यांच्याकडून स्फूर्ती घेवू शकतो. परंतु लोक अशी स्फूर्ती घेण्याऐवजी काम टाळण्यासाठी कुठली ना कुठली निमित्तं सांगत बसतात. त्यामुळं ती स्वतःचंच सुख गमावून बसतात. संत तुकारामांनी कामचुकार लोकांच्या विशिष्ट प्रवृत्तीवर अचूक बोट ठेवलं असून ती प्रवृत्ती दूर ठेवण्याची दृष्टी दिली आहे.

(संग्राहकसंजय दत्तात्रय सोमवंशी-पाटील )
९४२२३४५३६८